Maratha Reservation : मराठा आंदोलकांवर ५२१ गुन्ह्यांची टांगती तलवार; सरसकट गुन्हे मागे नाहीच

मराठा आंदोलनात आंदोलकांवर आतापर्यंत दोन टप्प्यांत दाखल झालेल्या ७९८ गुन्ह्यांपैकी केवळ १५७ गुन्हे मागे घेण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
Crime
Crimesakal
Updated on

मुंबई - राज्यात जालना येथील अंतरवाली सराटीसह राज्यभरात झालेल्या मराठा आंदोलनात आंदोलकांवर आतापर्यंत दोन टप्प्यांत दाखल झालेल्या ७९८ गुन्ह्यांपैकी केवळ १५७ गुन्हे मागे घेण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. तर ५३ गुन्हे अजिबात मागे घेतले जाऊ नये, अशी शिफारस यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा पातळीवरील पोलिस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समितीने केली आहे. अद्यापही दोन्ही टप्प्यातील ५२१ गुन्हे मागे घेण्याबाबत राज्य सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने आंदोलकांवर अटकेची टांगती तलवार आहे.

पहिल्या टप्प्यात दाखल झालेल्या ३४८ गुन्ह्यांपैकी १५७ गुन्हे मागे घेण्याची शिफारस करण्यात आली असली तरी दुसऱ्या टप्प्यातील ४५० गुन्ह्यांपैकी एकही गुन्हा मागे घेण्यात आलेला नसून त्यासाठी कोणतीही शिफारसही गृह विभागाने केलेली नाही.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाला सामोरे जाताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ जानेवारी २०२४ रोजी आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र मराठा आंदोलकांवरील सरसकट सर्व गुन्हे मागे घेतले जात नसल्याबद्दल आंदोलकांमध्ये अस्वस्थता आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट २०२३ पासून राज्यात जनआक्रोश आंदोलन व बेमुदत उपोषण सुरू होते. पोलिसांनी लाठीहल्ला केल्यानंतर सप्टेंबरपासून हे आंदोलन चिघळले गेले. विशेष करून मराठवाड्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. अनेक ठिकाणी हे आंदोलन हिंसक झाले.

पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करुन आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. दोन टप्प्यात आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत ३४८ गुन्हे तर १ फेब्रुवारी २०२४ पासून ४५० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील गुन्हे तपासून मागे घेण्याचे आश्वासन दिले असले, तरी दुसऱ्या टप्प्यातील ४५० गुन्ह्यांबाबत राज्य सरकारने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तसेच हे गुन्हे मागे घेण्यासाठी राज्य सरकारने समितीला शिफारस केलेली नाही.

हिंसक आंदोलन

मराठा आंदोलकांवर भारतीय दंडसंहितेच्या ३०७, ३५३, ३३२, ३३६, ३३७, ३४१, ४३५, १४३, १४४, १४५, १०९, ११४ या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश देखील आहे.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात पुणे शहर, सोलापूर शहर, कोल्हापूर, सांगली, अमळनेर, यवतमाळ, धाराशीव, नांदेड, परभणी, जालना, अहमदनगर या ठिकाणी शासकीय वाहनांवर दगडफेक, एसटी गाड्यांवर दगडफेक, घनसावंगी हद्दीत पंचायत समिती कार्यालय पेटवून देणे, तसेच विविध ठिकाणी जाळपोळ करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याच्या घटना घडल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.