पाथर्डी (जि. नगर) - ‘अभी नही, तो कभी नही’ अशी परिस्थिती सध्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्माण झाली असून कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण माघार घेणार नाही,’ असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला.
तालुक्यातील आगासखांड येथे आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी मराठा समाजासह इतर समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी जरांगे म्हणाले, ‘राज्यात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या, तर नगर जिल्ह्यात सव्वादोन लाख कुणबी नोंदी आढळून आल्या.
मात्र तरीही सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही. आपल्याला आणखी वेळ द्यावा असे शासन म्हणत असले तरीही या पूर्वी सात महिन्यांचा अवधी देऊनही आमची मागणी अजून मान्य केलेली नाही व प्रमाणपत्रेही दिलेली नाहीत.’
‘मराठे कोणाला घाबरत नाहीत, हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. तुमच्यात एकी नाही असे ते म्हणत होते. मात्र आता मराठा समाज एकवटला असून तुम्हाला तुमची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. सरकारने कोणताही डाव टाकला तरीही तो आता यशस्वी होऊ देणार नाही.
तुमच्या आशीर्वादाच्या बळावरच मी मुंबईला चाललो असून परत येईन की नाही हे माहीत नाही. मला दगाफटका झाला तरीही तुम्ही आरक्षणाचे आंदोलन चालू ठेवा,’ असे जरांगे म्हणाले.
ते म्हणाले, ‘आपल्या मतांच्या जिवावर यांनी राजकारण केले. आता आरक्षण दिले नाही, तर यांना सळो की पळो करून सोडा व त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. तेवीस दिवस मी उपोषण केले असल्याने सध्या माझी तब्बेत बरी नाही. माझे संपूर्ण आयुष्य मी समाजासाठी घालवणार आहे. मी सरकारला ‘मॅनेज’ होत नसल्याने सरकारची अडचण झाली आहे. माझा जीव गेला तरीही बेहत्तर पण आरक्षण मिळाल्याशिवाय आता मी माघार घेणार नाही.’
आता गुलाल उधळायचा !
‘मराठा आरक्षणाचा निर्णय लावून आता आपल्याला गुलाल उधळायचा आहे. हा गुलाल उधळण्यासाठी आता सज्ज व्हा व माझ्या मुंबई येथील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा,’ असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.