भुजबळ कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत. आम्ही तुमच्या शेपटावर पाय दिला नाही, तुम्ही आमच्या पायावर पाय देऊ नका.
सांगली : गोदावरी खोरे संपन्न असल्याने त्या भागात लोक विस्थापित होऊन राहायला येतात. मीही आलोय. मी सासऱ्याची भाकरी तोडतोय, अशी माझ्याबद्दल कुठल्यातरी माकडाने चुकीची माहिती छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना दिलीय; पण लोकांचे खाल्ल्यानेच भुजबळ जेलमध्ये जाऊन आले. त्यांना मराठ्यांचे आरक्षण खुपायला लागले आहे. समाजात दंगली घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा पलटवार मनोज जरांगे-पाटील यांनी येथे झालेल्या विराट सभेनंतर पत्रकारांशी बोलताना केला.
अंबड येथील ओबीसी एल्गार सभेत भुजबळांनी केलेल्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते (Manoj Jarange-Patil) म्हणाले, ‘‘मराठा ओबीसीत आला आहे, हे भुजबळांचा कळून चुकलंय. आता आम्ही चिडावे, यासाठी ते काहीपण बोलत आहेत. मी काय शिकलो, हे त्यांना काय करायचे? लोकांचे खाल्ल्याने ते जेलमध्ये जाऊन आले. तुम्ही लोकांचे पैसे खाता, रक्त पिता. आता भुजबळांचे वय झाले आहे, त्यामुळे ते बडबडत आहेत.
मराठ्यांची एकजूट त्यांना खपत नाही. आम्ही उत्तर द्यायला सक्षम आहोत, मात्र तुम्हाला उत्तर द्यायचे नाही. कारण तुम्ही किती खालच्या पातळीवरचे आहात, हे लोकांना कळून चुकले आहे. भुजबळ कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत. आम्ही तुमच्या शेपटावर पाय दिला नाही, तुम्ही आमच्या पायावर पाय देऊ नका. ओबीसी आरक्षणात येऊ नये म्हणून हा खटाटोप सुरू आहे. ओबीसी व मराठ्यांत वितुष्ट येणार नाही, वाद होणार नाही.’’
मराठा समाज हा कुणबी नाही, तो ओबीसी नाही, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह काही नेत्यांनी म्हटले आहे. त्यांना उत्तर देताना जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘कुणबी म्हणजे काय? तर शेतकरी. आम्ही शेती करतो, आम्ही शेतकरी. ज्यांना आपण कुणबी नाही, असे वाटते त्यांनी आपलं वावर विकून टाकावं. इथं कशाला राहता. गोरगरिबांचं कल्याण होताना तुम्ही वेगळी भूमिका का घेता?’’
एक डिसेंबरपासून गावागावांत साखळी उपोषण
नैराश्यातून कोणीही आत्महत्या करू नका
आरक्षणाचा फायदा घ्यायला पोरं नसतील तर लढ्याला अर्थ नाही.
आंदोलन शांततेतच करा, उद्रेक अजिबात नको
शांततेच्या आंदोलनाला गालबोट लागू नये
एकत्र या, गटातटात विखुरले जाऊ नका
आपल्या लेकरांचे वाटोळं होऊ देऊ नका
आरक्षण मिळालेले व न मिळालेले एक राहा
आधी लेकरांची भाकरी बघा, मग झेंडे उचला
ते म्हणाले,‘‘हा लढा मराठ्यांना स्वतःला लढायचा आहे. एकही नेता आपल्यासाठी पुढे येणार नाही. तुम्ही साहेबाला मोठं केलं, साहेबांच्या बापाला, आजोबाला मोठं केलं. त्यांनी तुमच्यासाठी काय केलं? त्यांचा पोरगा परदेशात जातो, शिकून येतो, आपली पोरं त्याला भय्या म्हणत्यात, त्यो आपल्या पोरास्नी नाम्या, तुक्या म्हणतो. आता शहाणं व्हा. आपल्या घरातलं मराठा पोरगं मोठं होऊ द्या. आधी लेकराच्या भाकरीचं बघा, नंतर कुणाचा झेंडा उचलायचा ते उचला. हीच वेळ आहे, आरक्षणाशिवाय सरकारला सुटी द्यायची नाही.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.