पुणे - परदेशातील महोत्सवांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित होत असताना आता अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे थेट मराठी चित्रपट महोत्सवच आयोजित करण्यात आला आहे. उत्तर अमेरिकेत वास्तव्यास असणारे मराठी चित्रपट निर्माते अभिजित घोलप यांनी सुरू केलेल्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ (नाफा) यांच्यातर्फे प्रथमच या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथे २७ व २८ जुलैला हा महोत्सव होणार आहे. या चित्रपट महोत्सवात ५ फिचर चित्रपटांचे प्रिमिअर, दिग्गज कलाकारांचे सहा ‘मास्टरक्लास’, तीन परिसंवाद, नऊ लघुपटांचे प्रदर्शन अशी भरगच्च पर्वणी चित्रपटप्रेमींना मिळणार आहे.
विशेष म्हणजे ‘नाफा’ची निर्मिती असलेल्या ‘निर्माल्य’, ‘अथांग’ आणि ‘पायरव’ हे लघुपटही महोत्सवात दाखवले जातील. या लघुपटांचे चित्रीकरण अमेरिकेतच करण्यात आले असून तेथील कलाकारांनीच तयार केले आहेत.
या महोत्सवात अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. यात ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, अभिनेते व दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, मृणाल कुलकर्णी, सुप्रिया पिळगांवकर, अश्विनी भावे, अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर, गीतकार गुरू ठाकूर, अभिनेता सुबोध भावे, प्रसाद ओक, संगीतकार-दिग्दर्शक डॉ. सलिल कुलकर्णी, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आदींचा समावेश आहे.
‘नाफा’चे संस्थापक अभिजित घोलप यांनी ‘देऊळ’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुवर्ण कमळ मिळाले होते, तर अभिनेते गिरीश कुलकर्णी यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. घोलप हे सध्या अमेरिकेत उद्योजक म्हणून कार्यरत असून तेथे मराठी चित्रपटसृष्टी उभी करण्याचा त्यांचा मानस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.