नाशिक : "हे तर पाचवीलाच पूजलेलं..'असं काहीसं गंमतीनं म्हटलं जातं असलं तरी नाशिकच्या जिल्हा रूग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता बेबी वॉर्मरच्या(इन्क्युबेटर्स) कक्षात हे तंतोतंत खरं ठरले. या विभागातील इन्क्युबेटर्सचा कोंडवाडा,असुविधां हे नवजात बालकांच्या पाचवीलाच पूजलेलं होतं. त्यामुळेच गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एकाच महिन्यात 55 हुन अधिक बालके दगावल्याचे वास्तव "सकाळ'ने उजेडात आणले आणि आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. "सकाळ'ने पाठपुरावा करत आक्रमकपणे मांडलेला प्रश्न आणि आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी पुढाकार घेत केलेली भरीव तरतूद, यंत्रसामुग्री, वेळोवेळी दिलेल्या सरप्राईज व्हिजीटमुळे आशादायक चित्र उभे राहत शेकडो बालकांना जीवदान लाभले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या खुलणाऱ्या कळ्यांसाठी जणू निरोगी आरोग्याची पहाटच उगवली असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही.
राज्यातील आरोग्य विभाग नेहमीच या ना त्या कारणाने कायमच चर्चेत असतो. भरपूर टिका होते आणि मग निद्रीस्त आरोग्य यंत्रणा जागी होती आणि योग्य ती पाऊले उचलली जातात. नाशिक जिल्हा रूग्णालयही तर वर्षभर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. तेथील असुविधांबाबत कुणी बोलायलाच नको. पण आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी घातलेले लक्ष आणि "सकाळ'ने वर्षभर केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. याचेच फलीत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पहायला मिळाले. आज जिल्ह्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज असा राज्यातील एकमेव माता-नवजात बालक अतिदक्षता विभाग (एनआयसीयु) उभा राहतो आहे. एवढेच नव्हे तर नवजात बालक (कमी वजनाचे) मृत्युदर निम्म्यावर आणण्यात यश आल्या आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक अतिदक्षता कक्षाची (एसएनसीयु) पाहणी केल्यानंतर "सकाळ'शी बोलताना सांगितले.
गेल्या वर्षी ऑगस्ट 2017 मध्ये नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात दाखल 346 बालकांपैकी 55 बालके इन्क्युबेटर्सच्या अभावामुळे दगावली. "सकाळ'ने( 5 सप्टेंबर 2017) वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर राज्यभर एकच खळबळ माजली. थेट आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांनी नाशिक जिल्ह्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत सरप्राईज भेट दिली. टप्याटप्पयाने इन्क्युबेटर्स उपलब्ध करून देत नवजात बालक कक्षात तातडीच्या उपाययोजना केल्या. एवढ्यावरच न थांबता अधिकाऱ्यांशी मुंबईतून वेळोवेळी संपर्क साधत आढावा घेतला. या सुविधांच्या उपलब्धतेनंतर शेकडो बालकांचे प्राण वाचण्यास मदत झाली.
त्र्यंबकेश्वर,कळवणला सहा महिन्यात कक्ष
"सकाळ' चा पाठपुरावा व डॉ.सावंतच्या पुढाकाराने आज जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सुसज्ज व अद्यावत "माता-नवजात बालक अतिदक्षता विभाग (एनआयसीयु)' या स्वतंत्र विभागीय इमारतीचे काम सुरू झाले आहे. या विभागात दाखल होणाऱ्या नवजात बालकांवर उपचार करण्यासाठी "न्यु-न्युटॉलॉजिस्ट'सह उच्चप्रशिक्षित परिचारिकांचा स्टाफ नियुक्तीला शासनाने मंजुरी दिली. त्याचप्रमाणे नवजात बालक मृत्यु आणि अर्भक मृत्युदरात घट होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील नाशिक-मालेगाव व्यतिरिक्त त्र्यंबकेश्वर व कळवण या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये नवजात बालकांचा अतिदक्षता कक्ष (एसएनसीयु) येत्या सहा महिन्यात सुरू होतो आहे. कुपोषित बालकांवर उपचार करण्यासाठी मॅम-सॅमच्या धर्तीवर जिल्ह्यातील दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या 6 तालुक्यांमधील शासकीय रुग्णालयांमध्ये स्थिरीकरण युनिट (एनबीए) सुरू केले आहे.
महागडे इंजेक्शन
दिड किलो वा त्यापेक्षाही कमी वजनाच्या नवजात बालकाला बेबीवॉर्मरमध्ये (इन्क्युबेटर) ठेवले जाते. गेल्या वर्षभरात अशा कमी वजनाच्या बालकांच्या जीवावरील धोका टाळण्यासाठी 8 हजार रुपये किंमतीचे "सरफॅक्टन्ट' हे इंजेक्शन दिले जाते. ज्यामुळे त्या बाळाची (मॅच्युरिटी) वाढ होण्यास मदत होते. यापूर्वी हे उपचार फक्त सुपर स्पेशॉलिटी हॉस्पिटलमध्येच होते. मात्र डॉ. सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातही हे उपचार मिळत आहे. 70 दिवसांपूर्वी जन्मलेल्या अवघ्या 600 ग्रॅम वजनाच्या नवजात बालकाचे उपचारानंतर पावणे दोन किलो वजन झाल्याचे पाहून डॉ. सावंत यांनी नवजात अतिदक्षता कक्षाचे डॉक्टर व परिचारिकांचे विशेष कौतूकही केले.
बालमृत्युदरात घट
गेल्यावर्षी नाशिक जिल्ह्यात नवजात बालकांचा मृत्युदर 15 टक्केच्या जवळपास होता. त्यात गेल्या वर्षभरात उपाययोजनांमुळे निम्म्याने घट झाली. नवजात बालकांचा मृत्युदर 8.3 टक्क्यांवर आला आहे तर अर्भक मृत्युचा दर 19 टक्क्यांवर आहे.
गेल्या तीन महिन्यांतील प्रमाण
महिने दाखल नवजात बालक दगावल्याची टक्केवारी
मे 261 6.6
जून 257 5.3
जुलै 318 8.3
......
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात वर्षभरापूर्वी नवजात बालकांच्या मृत्युमुळे मोठा प्रश्न उभा राहिला होता. वर्षभरानंतर आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालयाच्या नवजात कक्षातील डॉक्टर्स, स्टाफने जे अथक परिश्रम घेतले, त्यामुळे नवजात मृत्युदर निम्म्याने घटला आहे. यासाठी स्वत: सातत्याने लक्ष देत वारंवार चर्चा केली. बेबीवॉर्मरची संख्या 18 वरून 51 वर गेली आहे. तसेच, काही दिवसात नवीन सुसज्ज असे एनआयसीयु उभे राहते आहे. मेळघाट, पालघरमधील नवजात व कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.