माथेरान : वनसंपदेची निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या माथेरानमध्ये (Matheran) तब्बल ७०० हेक्टरवर जंगल (Forest) आहे. या अलौकिक ठेव्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय (Matheran tourism) बहरला. आता तो टिकवण्यासाठी ‘एक हात मदतीचा’ (Helping hand campaign) उपक्रमांतर्गत वन विभागाकडून जनजागृती (People Awareness), वणवे (Conflagration) आणि शिकार रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
माथेरानमध्ये वन वणवे प्रामुख्याने नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यामध्ये लागतात. ते रोखण्यासाठी कर्जत तालुक्याच्या काही महत्त्वाच्या वनक्षेत्र भागामध्ये गावातील वन व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यामार्फत गावामध्ये जनजागृती सुरू केली. नागरिकांना मुख्यत्वे आदिवासी बांधवांना वनांचे महत्त्व याविषयी माहिती दिली जात आहे. वन वणव्यापासून होणाऱ्या नुकसानीमुळे किती मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होतो, याबाबत देखील सांगितले जात आहे. ‘फायर ब्लॉअर’च्या माध्यमातून आगीवर नियंत्रण कसे मिळवावे याबाबत सांगितले जात आहे. तसेच वनरक्षक व वनपाल यांच्या बिटनुसार गस्तही होणार आहेत. ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमानुसार हे कार्य सुरू आहे.
वनपाल शंकर पवार यांनी सांगितले की, माथेरान या नावातच समृद्ध जंगल अधोरेखित आहे. त्यामुळे इतर पर्यंटन स्थळांपेक्षा माथेरान हे अतिशय वेगळे आहे. जंगलातून चालणे याचा वेगळा अनुभव येथे आल्यावरच कळतो. येथील उंच झाडे ही फक्त माथेरानमध्येच दिसतात. त्यावर बागडणारे पक्षी, प्राणी यामुळे हे माथेरान आणखी खुलून दिसते. मात्र हे सर्व अबाधित राखण्यासाठी स्थानिकांसोबतच पर्यटकांनीही हे जंगल आपले समजून त्याची आपलेपणाने जोपासना करायला पाहिजे.
तब्बल १५० वनस्पतींचा ठेवा
माथेरानमध्ये शेकडो वर्षांपासून असलेली हिरवीगार मोठमोठी वृक्षसंपदा हा अलौकिक नैसर्गिक अनमोल ठेवा आहे. माथेरानच्या जंगलात जवळपास १५० प्रकारचे वृक्ष आढळतात. विविध जातीच्या वनस्पतीही आढळतात. हे जंगल सदाहरित व निमसदाहरित प्रकारात मोडते. त्यामुळे जास्त पर्जन्यमानाला अनुकूल जांभूळ, पारजांभूळ, अंजन, पिसा, आंबा, उंबर, फणशी, बोकाडा, मळा, नांद्रुक, हिरडा, बेहडा, खैर, पांढरी इत्यादी झाडे दिसतात. याव्यतिरिक्त दिंडा, कारवी, नेचा या वनस्पती आढळतात.
शेकरू, रानमांजराचा वावर
माथेरानमध्ये आढळणाऱ्या प्राणीवर्गात सर्वात जास्त प्रमाण आहे ते माकडांचे. माकडांप्रमाणेच काळ्या तोंडाचे वानर, शेकरू, रानमांजर, रानडुक्कर, खार, भेकर, ससे, घोरपड, मुंगूस व विविध जातीचे सरपटणारे प्राणी आहेत. क्वचित बिबट्याचे दर्शनही होते. इथल्या पक्षी सृष्टीत बऱ्याच प्रमाणावर बुलबुल, कुटूरुक, पावशा, दयाळ, लार्क, तांबट, किंगफिशर, राखी धनेश, रॉबिन, बॉर्बेट, सुतार पक्षी आदी पक्षी जंगलात बागडताना दिसतात.
वन विभागाच्या मदतीने माथेरानमध्ये शिकार आणि वन वणवे रोखण्यासाठी जनजागृती करणार आहोत. खासकरून आदिवासी बांधवांमध्ये याची गरज मोठ्या प्रमाणात आहे. माथेरानचे जंगल स्थानिकांनी अबाधित ठेवले आहे. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, वृक्षजतन याबाबत माहिती देण्यात येते. वन्य पशू-पक्ष्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी वन व्यवस्थापन समिती काम करणार आहे.
- योगेश जाधव, अध्यक्ष, वन व्यवस्थापन समिती, माथेरान.
माथेरानमध्ये महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू दिसतो. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉन बागडताना दिसते. राज्यवृक्ष आंब्याची झाडे आहेत. वाघ नसला तरी बिबट्या आहे. इतके सारे असताना आपण स्थानिक, पर्यटक आणि वन विभाग यांनी एकत्र येऊन ही वनसंपदा अबाधित ठेवली पाहिजे.
- उमेश जंगम, वनक्षेत्रपाल
माथेरानचे वन विभाग अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करताना दिसतात. या परिसरातील पाणवठे व नैसर्गिक जलस्रोत पुनरुजीवन उपक्रमात आम्ही वन विभागाला सहकार्य करणार आहोत. आतापर्यंत वणवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही वणव्याच्या संवेदनशील भागात जाळरेषा काढल्या आहेत. त्यामुळे वणवे रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल म्हणावे लागेल.
- पवन गडवीर, अध्यक्ष, निसर्ग मित्र संस्था, माथेरान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.