आश्रमशाळांसाठी आता रेशन दुकानातून मिळणार बाजरी! रेशनधान्य दुकानांमधूनही बाजरीची विक्री; ई-केवायसीची मुदत आज संपणार, त्यानंतर स्वस्तात धान्य मिळणे कठीण
सोलापूर : मिलेट वर्षाच्या निमित्ताने भरड धान्यांचे उत्पादन वाढावे, भारत भरड धान्य उत्पादनात जागतिक केंद्र बनावे म्हणून बाजरी, ज्वारी, राळ, भगर, राजगिरा अशा भरड धान्यांची विक्री रेशन दुकानांमधून करण्यात येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर आश्रमशाळांना बाजरी दिली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात ९७ तर राज्यात सुमारे ९१५ आश्रमशाळा असून तेथील विद्यार्थ्यांना चपातीपेक्षा बाजरीच्या भाकरी जास्त देण्यावर भर दिला जाणार आहेत.
भारतात भरड धान्यांचे १७० लाख टनापेक्षा जास्त उत्पादन होते. विशेष म्हणजे भरडधान्यांचे आशिया खंडातील ८० टक्के पेक्षा जास्त उत्पादन भारतात घेतले जाते, त्यात पहिल्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे. आशिया व आफ्रिका खंडातील सुमारे आठ कोटी लोकांच्या पारंपारिक आहारात भरड धान्यांचा समावेश आहे. भरड धान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, भगर (वरई), राळ, राजगिरा, कुटकी, सेंद्री, बर्टी, सावा, कोदो, छाना व कंगनी ही ११ भरड धान्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्चित केली असून त्यातील नऊ भरड धान्यांचे भारतात उत्पादन घेतले जाते.
नव्या धोरणाच्या निमित्ताने भारताने भरड धान्याच्या उत्पादनाचे जागतिक केंद्र बनण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी रेशनधान्य दुकानांमधून बाजरी विकली जाणार आहे, पण तुर्तास प्रायोगिक तत्वावर राज्यातील आश्रमशाळांमध्ये बाजरी दिली जाणार आहे. त्यानंतर रेशनधान्य दुकानांमधूनही भरड धान्यांची विक्री होईल. त्याची सुरवात १ डिसेंबर २०२४ किंवा १ जानेवारी २०२५ पासून होईल, असे अन्नधान्य पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
भरड धान्यांचे फायदे...
लोह, प्रथिने, फायबर, कॅल्शिअम मिळते
झिंक, आयोडिन, खनिजे अशी जीवनसत्त्वे असतात
प्लुट्रेनमुक्त धान्य, मधुमेह, हृदयविकार, ॲनिमिया, उच्च रक्तदाबरोधक आहे
रोगप्रतिकारशक्ती वाढते, कुपोषण टाळता येते
पचनास हलकी असल्याने लहान मुलांच्या आहारात समावेश करता येतो
ई-केवासी करणे बंधनकारक
रेशनधान्य दुकानांमधून बाजरी, ज्वारी विक्री करण्याचे राज्य स्तरावर नियोजन सुरु आहे, पण कधीपासून सुरवात होईल हे निश्चित झालेले नाही. दरम्यान, आता प्रत्येक रेशनधान्य लाभार्थींनी ई-केवायसी करणे बंधनकारक असून त्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. ई-केवायसीमुळे बोगस लाभार्थी राहणार नाहीत, धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता येईल हा त्यामागील हेतू आहे.
- संतोष सरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.