Fight with Corona : रोहित पवारांचा निर्धार, कर्जत-जामखेडकर कोरोनाला हद्दपार करणार!

NCP-Rohit-Pawar
NCP-Rohit-Pawar
Updated on

बारामती : सध्या देशभरात दहशत माजवलेल्या कोरोनाशी सामान्य माणसापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सगळेजण दोन हात करत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार, प्रशासन आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सरकार, प्रशासनाला मर्यादा पडत आहेत. 

या पार्श्वभूमीवर अनेक सेलिब्रिटी, खेळाडू, राजकीय व्यक्ती मदतीसाठी पुढे येत आहेत. राज्यातील सर्वात लोकप्रिय तरुण आमदार म्हणून ओळखल्या जात असलेले कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही आपल्या परीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. 

आमदार पवार हे त्यांचा मतदार संघ असलेल्या कर्जत-जामखेडमध्ये सतत सक्रिय असतात. तसेच सोशल मीडियावरही ते अॅक्टिव्ह असतात. हजारोंच्या संख्येत त्यांना फॉलोअर्स असल्याने आपण केलेल्या कामाची पोहोच सोशल मीडियातर्फे ते मतदारांपर्यंत पोहोचवत असतात. याच सोशल मीडियाचा प्रभावी वापर त्यांनी कोरोनाबाबतच्या जनजागृतीसाठी सुरू केला आहे. याद्वारे मतदारसंघातील सर्व लोकांना ते धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत.    

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊनची घोषणा केल्याने सध्या अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सतर्क यंत्रणा आणि इतर सोयीसुविधांमुळे शहरातील नागरिकांपर्यंत अडचणीच्या काळातही सेवा पुरविल्या जातात. मात्र, ग्रामीण भागात हे शक्य नसते. मात्र, आमदार पवार यांनी सोशल मीडियाद्वारे ग्रामीण भागातील तरुणांची एक मोट बांधली असून त्यांचे व्हॉट्सअॅप ग्रुप केले आहेत. तसेच फेसबुक, ट्विटर धारकांसाठीही ते विविध सूचना आणि आदेशाचे पालन करण्याचे आवाहन ते करत आहेत. 

ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्याकडील प्रसिद्धीसाठीचा निधी कोरोनाच्या जनजागृतीसाठी वापरावा. पत्रके, फ्लेक्स, बोर्ड, रेडिओ, टिव्ही या सर्व माध्यमातून जाहिरातीद्वारे जनजागृती करणे, तसेच पर्यायी हॉस्पिटल यंत्रणा उभारण्याबाबतही आमदार पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री  कार्यालयांना काही सूचना केल्या आहेत.

लॉक डाऊनच्या काळात गरिबांना 2 रु. किलो दराने गहू आणि 3 रु. किलो दराने तांदूळ देता यावा, यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी 1 लाख 70 हजार कोटी रुपयांची तरतूद केली, या निर्णयाचेही आमदार पवार यांनी स्वागत केले. भाजीपाला आणि किराणा याबाबत नागरिकांची आबळ होत असल्याने ही दुकाने सुरू ठेवावी. मात्र, मालाची भाववाढ करू नये, साठीबाजी करू नये, तसेच पोलिसांनी नागरिकांना मारहाण करू नये, तसेच शिस्त पालन करत शासनाला सहकार्य करावे, अशी विनंती आमदार पवार यांनी केली आहे.  

दरम्यान, रोहित पवार यांनी राज्यातील प्रमुख देवस्थानांनी पुढे येत दानपेट्या खुल्या करण्याचं आवाहन केलं आहे. लालबागचा राजा, सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट तसेच शिर्डी येथील साईबाबा मंदिर ट्रस्टने याआधीच कोरोनाग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानत इतर देवस्थानांनीही आपल्या दानपेट्या समाजासाठी खुल्या कराव्यात, अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.