नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर आता राजकीय वातावरण तापताना दिसत असून राज्यातील शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारवर विरोधकांकडून कडाडून टीका केली जात आहे. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून तीन तीन इंजिनं लागून उपयोग काय असा प्रश्न विचारला आहे.
नांदेडमधील रुग्णालयात २४ तासांत ६ मुले व ६ मुली या १२ बालकांसह सात स्त्रिया आणि पाच पुरुषांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान विरोधक या घटनेनंतर आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी मागणी केली आहे.
यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राज्यातील तीन पक्षांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
"नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे 'औषध पुरवून वापरा' असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत."
"तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय?"
"दुर्दैव असं की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं." असा सल्ला राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये राज्य सरकारला दिला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.