Monsoon : राज्यात मॉन्सूनचे पुनरागमन; कोकण, ठाण्यात मुसळधार, नद्यांना पूर

मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. कोकण, घाटमाथ्यासह विदर्भातही अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
sakal
sakalRajapur Rain
Updated on

ठाणे/रत्नागिरी - मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. कोकण, घाटमाथ्यासह विदर्भातही अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. प्रदीर्घ वाट पाहण्याची प्रतीक्षा पूर्ण करत वरुणराजाने आज कोकणासह ठाण्यात जोरदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. तसेच, नवी मुंबईतही बरसलेल्या पावसाने फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची दैना उडाली.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, कल्याण आणि भिवंडी तालुक्यांत शनिवारी (ता. ६) रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे रविवारी जनजीवन विस्कळित झाले. दोन्ही तालुक्यांतील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. शहापूर तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास, भातसा, काळू आणि भारंगी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरलाही पुराचा वेढा पडला आहे.

शहापूर-किन्हवली रस्त्यावर पाण्याचे पाट वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मुरबाड आणि शहापूर तालुक्यांना जोडणाऱ्या चिखले गावाजवळील काळू नदीवरील पुलावरून शनिवारी (ता. ६) रात्रीपासून पाणी वाहू लागल्यामुळे वाहतूक बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. जिल्ह्यात एकूण ६५ मि.मी. पाऊस झाला असून, सर्वाधिक पावसाची नोंद भिवंडी तालुक्यात ९४.८ मि.मी एवढी झाली.

कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोहिली, मोहने येथील पाणीपुरवठा केंद्रांत पाणी घुसून पाणीपुरवठा बंद पडण्याची शक्यता असून मोहने-टिटवाळा परिसराला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या कठड्यांपर्यंत पाणी पोहोचले आहे. टिटवाळ्यातील सावरकरनगर भागातील वस्तीत पाणी घुसले आहे. कल्याणमधील दुर्गाडी परिसरातील बाजारपेठ, बैलबाजार भागात पाणी घुसण्याची शक्यता असून, खाडीकिनारचे रहिवासी, तबेलेधारकांनी स्थलांतराची तयारी सुरू केली आहे.

मुसळधार पावसाच्या पाश्‍वभूमीवर पालिकेची यंत्रणाही सज्ज झाली आहे. माहुली किल्ला परिसरात भारंगी नदी दुथडी भरून वाहत असून आसपासच्या वस्तीत पाणी शिरले आहे. भातसा, काळू नद्यांच्या पात्रात वाढ झाला आहे. शहापूरमध्ये भारंगी नदीच्या पुराचे पाणी इमारतीच्या पार्किंगमध्ये घुसल्याने गाड्या पाण्याखाली गेल्या. गुजराती बागेत पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचले होते. आटगाव-आसनगाव स्थानकादरम्यान झाड पडल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.

उद्या (ता. ८) कोकण, घाटमाथा विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीत कायम असून, राजस्थानच्या बिकानेरपासून, सिकर, ग्वाल्हेर, सिधी, बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीसाठी ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

शहापूरमध्ये १५० पर्यटकांची सुटका

शहापूर तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. मुंबईहून शहापूरच्या वासिंद भातसई येथे एका फॉर्महाऊसवर पावसाळी सहलीसाठी आलेले १५१ जण अडकले होते. त्यांची ठाणे येथील ‘एनडीआरएफ’च्या पथकाने सुखरूप सुटका केली.

चिपळुणात जोर, महामार्गावर पाणी

चिपळुणात पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे. उत्तरोत्तर पावसाचा जोर अधिक वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक मंदगतीने सुरू होती. सायंकाळी रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता.

पावसाचा इशारा

ऑरेंज अलर्ट (मुसळधार) - सिंधुदुर्ग

येलो अलर्ट (जोरदार पाऊस) - रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

येलो अलर्ट (वादळी पाऊस) - धुळे, जळगाव, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर

राजापूरला पुराचा वेढा - राजापूर (जि. रत्नागिरी) - गेले आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी (ता. ७) दुपारनंतर जोर धरला. वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस रविवारी दिवसभर सुरूच आहे. शहरातून वाहणाऱ्या अर्जुना-कोदवली नद्यांना पूर आला असून, पुराच्या पाण्याने राजापूर शहराला वेढा घातला आहे.

मुंबईत रेल्वे विलंबाने - मुंबई : मेगा ब्लॉक, त्यात पहाटेपासून सुरू असणाऱ्या पावसाचा फटका उपनगरी रेल्वे वाहतुकीला बसला. मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावरील वाहतूक पावसामुळे विलंबाने धावत असल्याने फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना गर्दीला सामोरे जावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.