Monsoon Latest : राज्यात दिवसभरात पावसाची काय स्थिती होती? जाणून घ्या एका क्लीकवर

राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालंय.
Monsoon Latest Live Update
Monsoon Latest Live Update
Updated on

पुणे-मुंबई 'एक्स्प्रेस वे'वर पुन्हा कोसळली दरड

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर पुन्हा एकदा दरड कोसळल्याचं वृत्त आहे. मुंबईच्या बाजूला जाणाऱ्या कामशेत बोगद्याच्या तोंडाजवळ ही दरड कोसळली. यामुळं या मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. रात्री साडे आठच्या सुमारास ही दरड कोसळ्याची माहिती मिळते आहे.

डोंबिवलीतील खाडीच्या पाण्याची पातळी वाढली

डोंबिवली पूर्वेतील लोढा पलावा परिसरातील देसाई खाडीची पाण्याची पातळी जोरदार पावसामुळे वाढली आहे.

कोल्हापूरच्या कासारी धरण क्षेत्रात १८२ मिमी पावसाची नोंद

विशाळगड परिसरात गेली दोन दिवस मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कासारी धरण पाणलोट क्षेत्रात गत २४ तासात १८२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजअखेर २६१९ मिमी पाऊस बरसला असून गतवर्षी याच तारखेला २२८५ मिमी पाऊस झाला होता.

ठाण्यातील शाळांना उद्या सुट्टी

ठाण्यामध्ये आज पावसाने थैमान घातलं आहे. जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. उद्या ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

मुंबईतल्या 'वेस्टर्न एक्स्प्रेस वे'वरील मीरा रोड भागात पावसाचे थैमान

ठाण्यात स्टेशनबाहेर नागरिकांची गर्दी

ठाण्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. रेल्वे स्टेशनमध्ये मोठी गर्दी झालेली असून नागरिकांनी स्टेशनबाहेर बसमधून जाण्यासाठीही गर्दी केलीय.

मुंबई उपनगराला पावसाने झोडपले, बोरिवली पूर्व स्थानक परिसर जलमय

भारतीय हवामान खात्याने आज मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला होता. तो कुठेतरी खरा होताना पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने मुंबई आणि मुंबई उपनगराला झोडपले असून उपनगरातीलतील अनेक सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई उपनगरातील बोरिवली रेल्वे स्थानकाचा पूर्वेकडील परिसर जलमय झाला असून साधारणपणे अडीच ते तीन फुटापर्यंत पाणी या परिसरात साचल्याचे पाहायला मिळत आहे. साचलेल्या पाण्यात रस्त्यावरील मुले पोहण्याचा आनंद देखील घेताना पाहायला मिळत आहे.

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईतल्या काही भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली असून नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत.

सातारा जिल्ह्यात सरासरी 12.8 मि.मी. पाऊस

सातारा जिल्ह्यात सरासरी 12.8 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 362.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस एकूण सरासरीच्या 40.9 टक्के इतका आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा – 11.2 (373.6), जावली-मेढा – 23.4(667.1),

पाटण -27.2 (694.8), कराड – 9.6 (198.0), कोरेगाव – 4.5 (165.9), खटाव - वडूज – 6.1 ( 129.9), माण - दहिवडी -2.6 (115.4), फलटण – 2.1 (82.8), खंडाळा -2.5 (196.6), वाई -8.8 (278.5), महाबळेश्वर -64.7 (1914.5) या प्रमाणे पाऊस झाला आहे.

कोल्हापुरात उद्या पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज

स्थलांतरित झालेल्या नागरिकांना उद्या सकाळपासून घरी जाण्यास सांगितले असून उद्या पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

पण पंचगंगा नदीची पाणी पातळी एक-एक इंचाने वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून जाऊ नये, सतर्कता म्हणून आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात, असं प्रशासनाने म्हटलं आहे.

बोरिवली, ठाणे, भिवंडी परिसरात पुढच्या तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईतल्या मालाड, बोरिवली, भाईंदर, ठाणे, मुलूंड, भिवंडी या भागात पुढच्या तीन तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोलापूरमध्ये पावसाची संततधार सुरुच

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. सोलापुरात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत.

वसई, विरार, नालासोपारामध्ये दुपारनंतर जोरदार पाऊस

वसई, विरार, नालासोपारामध्ये दुपारनंतर पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावलीये. मागच्या 24 तासात वसई तालुक्यात 64 मिलिमीटर एवढा पाऊस झाला. तर पालघर जिल्ह्याला आजही ऑरेंज अलर्ट आहे.

राजाराम बंधारा पाणी पातळी 40 फुटांवर

आज दुपारी 1 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी 40ʼ07 (542.56m) आहे. 60276 क्यूसेकने विसर्ग सुरु आहे. (पंचगंगा नदी इशारा पातळी 39'00" व धोका पातळी - 43'00") एकूण 82 बंधारे पाण्याखालील आहेत.

बेळगाव जिल्ह्यात सर्व धबधब्यांवर पर्यटकांना बंदी

बेळगाव : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. धबधब्यांचा (Belgaum Waterfalls) परिसर अधिक धोकादायक बनला आहे. यामुळे गोकाक फॉल्ससह जिल्ह्यामधील सर्व धबधब्यांवर पर्यटकांना भेट देण्यावर बंदी घालण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. नीतेश पाटील यांनी दिली.

Monsoon Latest Live Update
Monsoon Update : 'या' जिल्ह्यात सर्व धबधब्यांवर पर्यटकांना जाण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला महत्वाचा आदेश

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत एनडीआरएफच्या 13 तुकड्या तैनात

मुसळधार पाऊस आणि पुराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या १३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती एनडीआरएफ मुंबई यांनी दिली आहे.

मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापुरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वीच खासबाग मैदानाजवळ एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आजरा येथे घराची भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आलीये. सुनिता अर्जुन बुडुळकर (वय ४५ वर्ष, राहणार किणे ता. आजरा) असे महिलेचे नाव आहे.

मुंबईसह उपनगरात अतिजोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून ४५-५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तसेच उद्या देखील मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार, चंद्रकांत पाटलांनी केलं नागरिकांना आवाहन

खडकवासला धरण परिसरात होणाऱ्या पावसामुळं धरण ९७ टक्के भरले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ होत असून आज संध्याकाळी ४.०० ते ६.०० वाजेदरम्यान खडकवासला धरणातून ८५६ क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये. वाहने नदीपात्रात लावू नयेत. सखल भागातील नागरिकांना सतर्क रहावे. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन ट्विटच्या माध्यमातून मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

मुंबईत मुसळधार; चर्चेगेट रेल्वे स्थानक परिसरात साचलं पाणी

मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरु असून चर्चेगेट रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचलं आहे. यामुळं नागरिकांसह वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Monsoon Latest Live Update
Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा तडाखा! अंधेरी सबवे, चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात साचले पाणी

रायगडला मुसळधार पावसाने झोडपले, २४ तासांत १५४ मिलीमीटर पावसाची नोंद

मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जिल्ह्यात २४ तासांत सरासरी १५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पेण तालुक्यात विक्रमी ३०३ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे.

चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम; धरणातून ६७८० क्युसेकने विसर्ग सुरू

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने चांदोली धरणातून आज, गुरुवारी (दि. २७) सकाळी पुन्हा विसर्ग वाढवला. विद्युत निर्मिती प्रकल्पातुन १६३० क्युसेक व वक्राकार दरवाज्यातून ५१५० क्युसेक विसर्ग असा एकूण ६७८० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रेड अलर्टनंतर मुंबईत पावसाची धुवांधार बॅटिंग

भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि आसपासच्या परिसराला पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. मागील आठवडाभरापासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाने धुवांधार बॅटिंग केली. काल रात्री पावसाने काही उसंत घेतली असतानाच, आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या रेड अलर्टनंतर आज मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सकाळपासूनच मुंबईच्या अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे.

Monsoon Latest Live Update
Mumbai-Thane Rain : मुंबईत मुसळधार! ठाण्यात चालकाचा आगाऊपणा; गाडी अडकली

मुंबई-गोवा महामार्गावरील निवळीत मोठी दरड कोसळली, मार्ग वाहतुकीसाठी बंद

रत्नागिरी : कोकणात मुसळधार पावसाचे थैमान सुरू असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी येथे मोठी दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी झालेले नाही. मात्र, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे सध्या मोठे जिकरीचे झाले आहे.

सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पाऊस-पाणीसाठा

सातारा : जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 88.89 अब्ज घन फूट पाणी साठा असल्याचे उपकार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी कळविले आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून सर्व आकडे अब्ज घन फूटमध्ये आहेत. कंसामध्ये धरणसाठ्याची टक्केवारी दिली आहे.

मोठे प्रकल्प -

कोयना - 59.06 (58.99), धोम - 7.34 (62.79), धोम - बलकवडी - 3.39 (85.61), कण्हेर – 5.26 (54.85), उरमोडी -5.02 (52.02), तारळी - 5.01 (85.79).

मध्यम प्रकल्प -

येरळवाडी - 0.01 (1.45), नेर - 0.08 (19.47), राणंद - 0.01 (0.42), आंधळी - 0.02(08.02), नागेवाडी - 0.06 (27.62), मोरणा - 0.89(68.23), उत्तरमांड - 0.40 (46.51), महू - 0.88 (81.10), हातगेघर - 0.11 (42.56), वांग (मराठवाडी) - 1.35 (49.63) या प्रमाणे पाणीसाठा आहे.

कोयना धरणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात 138 मि.मी. पावसाची नोंद झाली असून मोरणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्रात 20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच धोम - 8 मि.मी., धोम - बलकवडी - 42, कण्हेर - 16, उरमोडी - 18, तारळी - 26, येरळवाडी - 4, उत्तरमांड - 15, महू - 22, हातगेघर - 22, वांग (मराठवाडी) - 13, नागेवाडी- 6 मि.मी पाऊस झाला आहे.

नागपुरात आज पावसाची अशी आहे स्थिती

विमानतळ 164.0

पारडी 179.8

सीताबर्डी 177.4

एकूण 521.2

सरासरी 173.7

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठा

अप्पर वैतरणा - 78, 364 दशलक्ष लिटर

मोडक सागर - 1,17,956 दशलक्ष लिटर

तानसा - 1,44,475 दशलक्ष लिटर

मध्य वैतरणा - 1,36,997 दशलक्ष लिटर

भातसा - 3,77,737 दशलक्ष लिटर

विहार - 27,698 दशलक्ष लिटर

तुळशी - 8,046 दशलक्ष लिटर

'आलमट्टीच्या विसर्ग वाढीने कोल्हापुरातील महापुराचा धोका कमी होणार'

कोल्हापूर : कोल्हापुरातील पुराचा (Flood in Kolhapur) धोका टाळण्यासाठी आलमट्टी धरणातून (Almatti Dam) विसर्ग वाढवावा, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार सतेज पाटील तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली होती.

Monsoon Latest Live Update
Almatti Dam च्या पाण्यामुळं कोल्हापूरला महापुराचा धोका? कृष्णा समितीचं थेट मुख्यमंत्र्यांना साकडं

बारवी धरण काठोकाठ आले भरत; धरणकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बदलापूर : सतत सुरू असलेल्या पावसामुळे बारवी धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी 7 वाजता धरणाची पातळी 70.64 मी एवढी झाली असून धरण काठोकाठ भरले आहे. बारवी धरणाची पाणी पातळी 72.60 मीटर असून धरणावर स्वयंचलित दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे बारवी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तानसा, भातसा पाठोपाठ बारवी धरण देखील भरल्याने ठाणे जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटला आहे.

राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद

कोल्हापूर : येथील महापुराला कारणीभूत ठरणाऱ्या पंचगंगा नदीची (Panchganga River) पाणी पातळी अजूनही 40 फूट 5 इंचावर स्थिर आहे. यातच राधानगरी धरणाच्या (Radhanagari Dam) पाच पैकी एक दरवाजा बंद झाल्याने दिलासा मिळाला आहे. राधानगरी धरणाचे काल 26 जुलै 2023 रोजी 5 स्वयंचलित दरवाजे उघडल्यानंतर भोगावती नदीतून 8540 क्यूसेक पाण्याचा प्रवाह पंचगंगा नदीच्या दिशेने सुरू आहे.

Monsoon Latest Live Update
Kolhapur Rain : राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद; महापुराला कारणीभूत ठरणाऱ्या पंचगंगेची काय स्थिती?

रत्नागिरीत आज पावसाचा ‘रेड अलर्ट’, शाळेला सुट्टी

हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व माध्यमिक) विद्यालयांना गुरुवार, 27 जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिला.

चिपळूण, खेड, राजापुरात पूरस्थिती

रत्नागिरी : जिल्ह्याला (Ratnagiri Rain Update) पावसाने दाणादाण उडवून दिली. चिपळूण, खेड, राजापूरला पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही नद्यांनी इशारापातळी ओलांडली आहे. अतिवृष्टीमुळे कुंभार्ली घाटात (Kumbharli Ghat) दरड कोसळली. रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे, नेवरे, सोमेश्वर आदी गावांना फटका बसला. काही घरात पाणी शिरल्याने नागरिकांना स्थलांतरित केले. केळ्ये येथे रस्त्यावरून पाणी गेल्याने गावांचा संपर्क तुटला होता. अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले होते.

Monsoon Latest Live Update
Ratnagiri Rain : रत्नागिरीत पावसाने उडवली दाणादाण! चिपळूण, खेड, राजापुरात पूरस्थिती; आजही Red Alert

चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून सहा जणांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसादरम्यान वीज पडून पाच वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथे शेतातून परत येणाऱ्या गीता ढोंगे या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे शेतात रोवणीचे काम करणाऱ्या कल्पना झोडे आणि अंजना पूसतोडे या दोन महिलांचा मृत्यू झाला. कोरपना तालुक्यातील खैरगाव येथील पुरुषोत्तम परचाके या 25 वर्षीय शेतकऱ्याचा फवारणी करताना वीज पडून मृत्यू झाला तर गोंडपिपरी तालुक्यातील चिवंडा येथे वनविभागाच्या कामावर वृक्ष लागवड करणाऱ्या वनमजूर गोविंदा टेकाम याचाही वीज पडून मृत्यू झाला. याशिवाय पोंभूरणा तालुक्यात देखील अर्चना मडावी या 28 वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू झाला.

बेळगाव जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर

अतिवृष्टीमुळे खबरदारीसाठी बेळगाव जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांच्या आदेशानुसार, आज गुरुवार 27 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांना पुन्हा एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नागपुरात नऊ तासांत तब्बल १२१ मिलिमीटर

शहरात मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास विजांचे भयानक तांडव पहायला मिळाले. अनेक ठिकाणी विजा पडल्याची व वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे. नागपुरात पहाटे साडेपाचपर्यंत नऊ तासांमध्ये तब्बल १२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात आज रेड, ऑरेंज व यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Monsoon Latest Live Update
Nagpur : उपराजधानीत रात्रभर धुवांधार; 9 तासांत तब्बल 121 मिलिमीटर पावसाची नोंद, वीजपुरवठा खंडित, घरांत शिरले पाणी

कोल्हापूर : कडवी धरण ९१ टक्के भरले

शाहूवाडी तालुक्यातील परळे निनाई येथील कडवी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत १०५ मिली मीटर पाऊस बरसला. धरणात ९०.९१ टक्के पाणीसाठा संकलित झाला आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून कडवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. १ जून ते आजपर्यंत पाणलोट क्षेत्रात १८७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच दिवशी १९०१ मिमी पाऊस झाला होता. गतवर्षी १० ऑगस्टरोजी धरण १०० टक्के भरले होते.

नागपूरमध्ये मुसळधार, घरात पाणी शिरल्याने लोकांनी रात्र काढली जागून

नागपूर : नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. कादंबिनी विहार येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांनी रात्र जागून काढली. वस्तीत सध्या गुडघाभर पाणी आहे.

Nagpur Rain
Nagpur Rain

आलमट्टी धरणातून १५ हजार क्युसेक विसर्ग

बेळगाव : आलमट्टी धरणातून फक्त १४,६९० क्सुसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे. तर धरणात एक लाख ३८ हजार ४७३ क्सुसेक इतकी आवक होत आहे. यामुळे आलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवावा, अशी मागणी महाराष्ट्रातून केली जात आहे. हा विसर्ग कमी असल्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. याचा फटका महाराष्ट्राला बसत आहे.

कोयना धरणातून विसर्ग वाढणार

पाटण : कोयना धरणात ६२.४१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्याने आज (ता. २७) दुपारी चार वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातील दुसरे युनिट सुरू करण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट

Monsoon Latest Live Update : राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालंय. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असून संपूर्ण विदर्भात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()