अमरावती : विदर्भात यावर्षी मॉन्सून उशिराने येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे पेरण्यांना प्रारंभ होऊ शकलेला नसून बियाणे बाजार थंड आहे. बिपोरजॉय वादळाच्या प्रभावामुळे ही स्थिती आली असल्याचे हवामान खात्याने म्हटले असले तरी गतवर्षीही मॉन्सूनचे आगमन १९ जूनला झाले होते.
विलंबाने येण्याची यावर्षीची पहिली वेळ नसून यापूर्वी २००९ मध्ये जूनच्या अखेरीस २८ जूनला त्याचे आगमन झाले होते. यावर्षी २२ जूनच्या आसपास आगमन होण्याची शक्यता आहे.
यावर्षी अद्याप खरीप हंगामास सुरवात झाली असून शेती तयार असली तरी मॉन्सून न बरसल्याने पेरण्यांना सुरवात होऊ शकलेली नाही. बियाणे व खतबाजार हंगामासाठी सज्ज झाला असला तरी पाऊस न बरसल्याने शेतकऱ्यांनी या बाजाराकडे अद्याप पाठ फिरवली आहे. सध्या बाजारात येत असलेला शेतकरी बियाणे व खतांची उपलब्धता तसेच दर याची चौकशी करीत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
गेल्या पंधरा वर्षात मॉन्सूनचे वेळापत्रक बिघडले आहे. विदर्भात साधारणतः मॉन्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सक्रीय होतो. वर्ष २०२१ व २०२० मध्ये तो १० जूनला तर २०१६ व २०१८ मध्ये ६ जूनला आगमन झाले होते. सर्वात विलंबाने मॉन्सूनचे आगमन वर्ष २००९ मध्ये २८ जूनला झाले होते, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. यावर्षी मॉन्सून २२ जूनच्या आसपास येणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याचे हवामान तज्ज्ञ प्रा. अनिल बंड यांनी सांगितले.
पेरणीची घाई करू नये
मॉन्सूनला विलंब होणार असल्याचे चित्र असले तरी शेतकऱ्यांनी थोडी प्रतीक्षा करणे लाभदायक ठरू शकणार आहे. पुरेसा पाऊस होईस्तोवर म्हणजे साधारणतः ७० ते १०० मी. मी. पाऊस होईस्तोवर पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.