पुणे : भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तुलना मागील वर्षी आलेल्या पहिल्या लाटेबरोबर करावी लागेल. महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर २०२० मध्ये दररोज सुमारे २५ हजार एवढी नवीन रुग्णाची संख्या होती. ती डिसेंबर २०२० पर्यंत कमी झाली. परंतु, लोकांच्या निष्काळजीपणामुळे २ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्रातील नवीन रुग्णांची संख्या ४४ हजार एवढी होती. असे असले तरी पहिल्या लाटेपासून दुसरी लाट वेगळी आहे. दुसऱ्या लाटेचा विषाणू हा पहिल्या लाटेपेक्षा कमी धोकादायक आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या लाटेमुळे कोरोना रूग्णांचा मृत्युदर पहिल्या लाटेपेक्षा कमी आहे.
महाराष्ट्रातील ३-४ जिल्हे सोडता इतरत्र मृत्युदर कमी आहे. वातावरण व हवामानातील बदल, महाराष्ट्राचा निरनिराळ्या देशांशी येणारा संपर्क, त्याचप्रमाणे राज्यातील जनतेची विशेषतः मोठमोठ्या शहरांतील लोकांची बेजबाबदार वृत्ती दुसऱ्या लाटेला कारणीभूत आहे. टाळेबंदीमुळे लाट तात्पुरत्या प्रमाणात थांबेल. दुसरी लाट थोपविण्यासाठी टाळेबंदी हा उपाय निश्चितच नाही.
त्यासाठी खालील गोष्टींचा अवलंब करणे योग्य आहे. १) समाजातील ज्या व्यक्तींमध्ये करोनाची लक्षणे दिसत नाहीत, अशा व्यक्तींना शोधून काढणे. २) त्याचप्रमाणे करोनामुळे आपल्या घरात विलगीकरण करुन उपचार घेत आहेत. त्या व्यक्तींची नियमित तपासणी करुन घेणे व चाचण्या करुन घेणे. ३) त्याचप्रमाणे देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तापाबद्दल उपचार देणारी आरोग्य केंद्रे व सुविधा केंद्रे वाढवणे ४) करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या चाचण्या करणे, हे प्रभावी उपाय होऊ शकतात.
दुसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरण (Vaccination) हा एक प्रभावी उपाय आहे. लसीकरणामुळे करोना विरुद्धची प्रतिकार शक्ती ज्यांच्या शरीरात निर्माण झाली आहे. अशा व्यक्तींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे लसीकरण हे वेगाने केले पाहिजे. Indian Council Of Medical Research यांच्या संशोधनानुसार भारतात अनेक ठिकाणी २०% व्यक्ती करोना संक्रमित झालेल्या आहेत. यासर्व व्यक्तिंमध्ये करोना विरुद्धची प्रतिकार शक्ती निर्माण झालेली आहे. परंतु ही संख्या आणखी वाढवायची असेल तर, त्यासाठी लसीकरण (Vaccination) हा प्रभावी उपाय आहे.
आपला देश हा १३८ कोटी लोकसंख्या असलेला देश आहे. या रोगाचा अभ्यास केला तर असे आढळून आले आहे की वृद्ध व्यक्तिंमध्ये त्याचप्रमाणे कॅन्सर, मधुमेह, बी.पी., टी.बी. इत्यादी सारखे विकार यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. अशा व्यक्तिंमध्ये करोनाचा संसर्ग लवकर होता. त्याचप्रमाणे जे करोना योद्धा आहेत (डॉक्टर, नर्सेस , वॉर्डबॉय इ.) त्यांच्या मध्येही करोनाचे संक्रमण लवकर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये वरील सर्व व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे लसीकरणानंतर प्रतिकारशक्ती किती प्रमाणात वाढते, लसीचे काही दुष्परिणाम होतात काय. लसीकरण कितपत सुरक्षित आहे, याबद्दलही अभ्यास चालू आहे. या सर्वाचा अहवाल पुढील १-२ महिन्यात येईल. त्याचप्रमाणे २ महिन्यात सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होतील एवढे डोसेस (Doses) भारतामध्ये मोठ्या प्रमाणात तयार होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे दोन महिन्यानंतर करोनाची लस ही भारतातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होईल, असे वाटते.
कोणतीही लस ही १००% परिणामकारक नाही. लस घेतल्यानंतर करोना होण्याचे प्रमाण कमी असले तरी, त्यानंतर करोना होऊ शकतो. त्याचप्रमाणे लसीकरणामुळे प्रतिकार शक्ती किती प्रमाणात वाढलेली आहे, ती किती दिवस टिकणार आहे. याबद्दलचे संशोधन चालू आहे. याचा अहवाल अद्यापही झालेला नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतरही सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे, साबणाने हात वारंवार धुणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे बंधनकारक आहे. अजून किती दिवस मास्क घालून बाहेर फिरावे लागेल याचे उत्तर देणे अवघड आहे. अनेक गोष्टींवर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे.
१) लसीकरणाचे प्रमाण,
२) करोना व्हायरसची नवीन आवृत्ती (Variant) कितपत उपद्रवी आहे,
३) लसीकरणामुळे प्रतिकार शक्ती किती प्रमाणात वाढली आहे, ती किती दिवस टिकणार आहे, इत्यादी.
सध्या मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि इतर प्रतिबंधात्मक उपाय करणे हे प्रत्येक व्यक्तीला बंधनकारक आहे.
दुसरी लाट आलेली असताना शाळा-महाविद्यालये चालू करणे योग्य नाही. कारण शाळा-महाविद्यालये चालू केल्यास करोनाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. शाळा-महाविद्यालयामध्ये शिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्याची आवश्यकता आहे. दहावी, बारावी या परीक्षांच्या निकालावर विद्यार्थ्यांचे भविष्य ठरत असल्यामुळे, ते वर्ग सर्व प्रतिबंधक उपायांचा अवलंब करुन चालू ठेवणे संयुक्तिक राहील. या काळामध्ये सर्व शिक्षक-शिक्षकेतरांची करोना विषयक चाचणी करुन घेणे अतिशय आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅन्सर, बी.पी, मधुमेह, टी.बी. इत्यादी विकार आहेत अशा कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने करुन घेणे, अतिशय महत्त्वाचे आहे. एका वेळेस शाळा-महाविद्यालयांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
लसीकरण -
सध्या देशामध्ये दोन प्रकारच्या लसी (Vaccine) उपलब्ध आहेत.
१) Covishield आणि
२) Covaccine
या दोन्हीही लसी (Vaccine) सुरक्षित आहेत. या दोन्हीही लसींचे दोन डोस घेणे प्रत्येक व्यक्तीला बंधनकारक आहे.
Covishield लसीचा दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर सुमारे ६ ते ८ आठवड्यांनी घेण्यात यावा. Covaccine ह्या दोन डोसांमधील अंतर किमान ४ आठवडे असावे. पहिले दोन डोस घेतल्यानंतर ज्या व्यक्तींना Comorbidities आहेत उदा. मधुमेह, बी.पी., कॅन्सर इत्यादी त्यांनी तिसरा डोस ६ महिन्यांच्या अंतराने घेण्यात यावा असे नुकतेच संशोधनाने सिद्ध झाले आहे.
लसीकरणानंतर बारीक ताप येणे, अंगदुखी होणे, सर्दीखोकला होणे इ. गोष्टी होण्याची शक्यता आहे. यासर्व गोष्टींना पूर्णपणे विश्रांती घेणे आणि डॉक्टर ज्या उपाययोजना सुचवतील त्यांचे पालन करणे हा उपाय आहे. ९९% व्यक्तींना करोनाच्या लसीकरणानंतर कोणताही मोठा त्रास होत नाही. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी (वय वर्षे ७२), महाराष्ट्रातील नेते माननीय खासदार श्री शरद पवार साहेब (वय वर्षे ८०), भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांची Angio Plasty झालेली आहे इ. अशा सर्वांनी लसीकरण करुन घेतलेले आहे. यासर्व व्यक्तींना लसीकरणानंतर कोणताही त्रास झालेला नाही. रक्त पातळ होण्यासाठी Aspirin किंवा Clopidogrel ही औषधे वापरली जातात ह्रदयविकार असलेल्या व्यक्तींना ही औषधे बंधनकारक आहेत . अशा व्यक्तींसाठी लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे. अशा व्यक्तींचे Blood Pressure normal असेल तर लसीकरणानंतर कोणताही त्रास होत नाही. ‘मधुमेह’ असलेल्या व्यक्तींनी पुढील काळजी घ्यावी.
१) ‘मधुमेह’ पूर्णपणे नियंत्रित हवा
२) लसीकरण करण्याआधी मधुमेह असलेल्या व्यक्तींनी काहीतरी खाणे आवश्यक आहे.
देशातील एकूण रुग्णांच्या ६२% रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, बदलते तापमान, लोकांची बेजबाबदार वृत्ती, मुंबई, पुणे इ . शहरांमध्ये येणारे परप्रांतीयांचे लोंढे, मुंबईमधील लोकलमधील प्रचंड गर्दी, महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांची संख्या इ. मुळे आपल्या देशात करोनाच्या बाततीत ‘महाराष्ट्र’ अग्रेसर आहे.
टाळेबंदी (Lock Down) -
टाळेबंदी (Lock Down) करण्यापेक्षा काही गोष्टींवर कडक निर्बंध आणले तर फायदा होऊ शकतो.
१) सभा संमेलने पूर्णपणे रद्द करावी.
२) लग्न समारंभास परवानगी देताना केवळ २५-३० व्यक्तींची उपस्थितीत हे समारंभ होतील. याविषयी निर्बंध घालणे.
३) शाळा-महाविद्यालये पूर्णपणे बंद ठेवणे.
४) वेगवेगळ्या ठिकाणे नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्यांना २ पाळ्यांमध्ये नोकरीस बोलवणे.
५) सार्वजनिक स्वच्छतागृहे वारंवार साफ करणे.
६) ज्या व्यक्तींचे विलगीकरण केलेले आहे आणि जे घरीच उपचार घेता आहेत त्यांच्यावर कडक निर्बंध ठेवणे.
७) करोनाबाबत उपचार देणाऱ्या केंद्रांची संख्या वाढविणे.
८) अंत्यविधीच्या वेळेला केवळ १०-१५ व्यक्ती उपस्थित राहतील असे निर्बंध घालणे आवश्यक आहे.
९) शहरांतील सर्व आरोग्यसेवक, शाळा-महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, बॅंकांमधील कर्मचारी यांचे प्राधान्याने लसीकरण करून घेणे.
१०) ज्याठिकाणी गर्दी जमते उदा. भाजी मंडई, सिनेमाहॉल, मॉल्स, व्यायामशाळा इ. ठिकाणी ही गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जाणे आवश्यक आहे. या उपायांचा शासनाने अवलंब केल्यास करोनाची ही दुसरी लाट लवकरच नियंत्रित होईल, असे वाटते.
एखाद्या व्यक्तीला करोना झाल्यानंतर समजा १०२ दिवसात करोना झाला तर त्यास COVID Reinfection असे म्हणतात. हा करोना परत होण्याची कारणे अनेक आहेत. पण त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे लोकांची बेजबाबदार वृत्ती, मास्क न घालणे, दोन व्यक्तींमधील अंतर न ठेवणे, वैयक्तिक स्वच्छतेचे पालन न करणे.
करोनाची दुसरी लाट थांबवण्यासाठी देशातील १८ वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण वेगाने करण्याची आवश्यकता आहे. लसीकरणामध्ये सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. आपल्या देशामध्ये आजपर्यंत सुमारे साडे सहा कोटी जणांचे लसीकरण झालेले आहे. जेवढ्या वेगाने लसीकरण होईल आणि समाजातील व्यक्ती करोना विषयक नियमांचे पालन करतील तेवढ्या प्रमाणात करोनाची दुसरी लाट थांबण्यास मदत होईल. त्यामुळे करोनाची दुसरी लाट थोपवणे जसे सरकारचे कर्त्यव्य आहे तसेच ते लोकांच्या हातात देखील आहे.
- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.