MPSC Protest Pune
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) नव्या अभ्यासक्रमाचे अंमलबजावणी 2025 पासून करावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे बालगंधर्व चौकात आंदोलन सुरू असताना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या विद्यार्थ्यांची आंदोलन स्थळी जाऊन भेट घेतली.
हजारोंच्या संख्येमध्ये विद्यार्थी उपस्थित असताना या गर्दीमध्ये शरद पवार घुसले. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले यावेळी हा सर्व परिसर सुट्ट्या आणि टाळ्यांच्या आवाजाने दणाणून गेला होता.
'एमपीएससी'ने नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2023 म्हणजे चालू वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अचानक बदललेल्या अभ्यासक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने याची अंमलबजावणी 2025 पासून केली जावी अशी मागणी अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांची आहे. या विरोधात यापूर्वी दोन वेळा आंदोलने झालेली असताना एमपीएससी निर्णय बदलले नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आयोगाकडे या संदर्भात विनंती केली. त्यानंतर ही आयोगाची भूमिका ठाम आहे. आयोगाकडून निर्णय बदलला जात नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनी बालगंधर्व चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी हजारो विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत.
मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अचानक घटनास्थळी दाखल झाले. शरद पवार येणार याची माहिती विद्यार्थ्यांना लागतात चौकात प्रचंड गर्दी झाली. या गर्दीतून शरद पवार यांना वाट काढून देताना पोलिसांची व कार्यकर्त्यांची चांगली कसरत झाली. यावेळी 'एकच साहेब पवार साहेब' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
विद्यार्थ्यांशी संवाद असताना पवार म्हणाले, "अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2025 पासून करावी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक आयोजित केली जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मी स्वतः उपस्थित असेल.
आंदोलनाच्या ठिकाणावरून शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करून या संदर्भात चर्चा केली. शिंदे यांनी या विषयावर बैठक घेण्याचे आश्वासन पवारांना दिले आहे. ही घोषणा पवारांनी करताच विद्यार्थ्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून तसेच मोबाईलची टॉर्च लावून याचे स्वागत केले.
शरद पवार यांनी मंगळवारी रात्री विद्यार्थ्यांशी येऊन चर्चा केली. यामध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून उद्या सायंकाळी त्यांच्यासोबत बैठक आयोजित केलेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून शिष्टमंडळ देखील उपस्थित राहणार आहे. मात्र, आम्ही आंदोलन व उपोषण मागे घेतलेले नाही" अशी माहिती आंदोलक अक्षय जैन, प्रथमेश आबनावे, शिवराज मोरे, नितीन आंधळे, राहुल शिकसाट, प्रशांत बाहेती यांनी दिली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.