राजधानी मुंबई : आमदारसंख्येची झाकली मूठ, राष्ट्रवादी’तला वाढता संशयकल्लोळ

अजित पवारांचे राजकारण हा महाराष्ट्राच्या राजकारणातला केंद्रीय भाजपच्याही दृष्टीने कळीचा मुद्दा आहे.
Ajit Pawar and Amit Shah
Ajit Pawar and Amit Shahsakal
Updated on

अजित पवारांचे राजकारण हा महाराष्ट्राच्या राजकारणातला केंद्रीय भाजपच्याही दृष्टीने कळीचा मुद्दा आहे. त्यांच्याकडे आमदार किती या प्रश्नाइतकाच महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जनता त्यांना कशी स्वीकारते हा होय.

अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशेजारी जाहीर व्यासपीठावर सहकारी या नात्याने विराजमान झाले. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरचा दोघांचा हा पहिलाच कार्यक्रम. ‘अजितदादा, तुम्ही योग्य जागी आला आहात’, अशा शब्दांत भारतीय राजकारणाचे ‘इलेक्शन मशीन’ चालविणारे असे ज्या अमित शहा यांना म्हटले जाते, त्यांनी काढलेले हे उद्‍गार. ‘पण जरा उशीरच केलात’, असा चिमटाही त्यांनी काढला.

म्हणजे अजित पवार ‘देर आए’ हे झालेच; पण ‘दुरुस्त आये क्या?’ हे अजून उरले आहेच. दादा नेमके किती लोक घेऊन आले आहेत? धर्मनिरपेक्षतेचा विचार मानण्याची परंपरा असलेला पश्चिम महाराष्ट्र खरोखरच हिंदुत्ववादी वळण स्वीकारणार आहे का, हे प्रश्न बाकी आहेत.

अजित पवार सरकारमध्ये स्वत:साठी नवे स्थान शोधणार असतील, तर त्यांना आणखी आमदार,भक्कम जनाधार आपल्या पाठीशी असल्याचे भाजपनेत्यांना दाखवून द्यावे लागेल. हे शक्य आहे का, ते येणारा काळ सांगेल. सध्या तर अजित पवार यांच्यामागे आमदार किती ही संख्याही स्पष्ट नाही.

‘देर कर दी’ या आशयाच्या अमित शहा यांच्या वाक्यांवर दादा मंद, विनयशील हसत होते; अन् त्यांच्या समकक्ष उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हसत होते, अगदी तोंड भरुन! बरेच झाले उशीर केला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनातल्या मनात म्हणाले असणार हे निश्चित, हे वेगळे सांगायची गरज नाही.

दादा लवकर पुरेशा संख्याबळासह आले असते तर शिंदेंचा इतिहास वेगळा राहिला असता अन् शिवसेनेचाही. पण तो वेगळा विषय. दादांनी १०/१२ वर्षांपूर्वीच स्वतंत्र अस्तित्व दाखवणे योग्य ठरले असते, असे त्यांच्या खंद्या समर्थकांना वाटते. अजित पवार यांची खरेच तशी तयारी होती का ?

‘सन २००९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने कॉंग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या असतानाही मुख्यमंत्रीपद श्रेष्ठींनी हकनाक घालवले’ असे त्यांचे जे म्हणणे आहे, ते स्वत:ला त्या जागी ठेवून का? डावलल्याची खंत त्यांच्या मनाला तेव्हापासूनच डाचते आहे काय? कदाचित कालांतराने या प्रश्नांची उत्तरे कळतीलही; पण एक वर्षापूर्वी दादांनी सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला असता तर महाराष्ट्राचा इतिहास वेगळा झाला असता हे खरेच आहे.

एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून उदय व्हायच्या आधीच दादा संख्याबळ दाखवून पक्षात फूट घडवू शकले असते तर उपमुख्यमंत्री तर नक्कीच झाले असते. खरे तर तसे झालेही होते. सर्वांना गाफील ठेवून सरकार स्थापन केले गेलेही होते. ते सगळेच फसले. ते महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपसाठी फार महत्वाची व्यक्ती झाले असते. पहाटेचा औटघटकेचा शपथविधी पुन्हा अस्तित्वात आला असता पण ते त्यांच्या नशिबी नव्हते अन फडणवीसांच्याही !

मुख्यमंत्री शिंदे सावरले

एकनाथ शिंदेंच्या नशिबात मुख्यमंत्रिपद लिहिलेले असावे. इर्शाळवाडीसारख्या दुर्घटनाग्रस्त भागात डोंगरावर चढणारे शिंदे यांची प्रतिमा काही अंशी जनतेच्या मनातही उंचावली आहे. त्यांच्यातला कार्यकर्ता ही त्यांची आजवर मर्यादा वाटे; पण ती आता त्यांना साथ देताना दिसते. हिंदुत्वाच्या समान धाग्यामुळे भाजपच्या मतदाराला शिंदेंचा दु:स्वास वाटत नाही.

अजित पवार यांच्या सत्ताप्रवेशाने गोधळलेले शिंदे आता सावरले आहेत. ते स्वत:ची लोकप्रियता वाढवण्याचे प्रयत्न करत असतात. त्यांचे समर्थक आमदार अद्याप चाचपडत असले तरी शिंदे प्रयत्नात कसूर सोडत नाहीत. फडणवीस तर १०५ आमदारांचे नेते आहेत.उपमुख्यमंत्रीपद ते ही अर्धेमुर्धे हे वास्तव असले तरी मध्यमवर्गीयांना त्यांच्यावर नियतीने अन्याय केला आहे असे वाटते .‘व्हिक्टिम कार्ड’ ते उत्तम रीतीने खेळतील काय ते पाहायचे.

‘त्रिशुला’तला प्रश्न उरतो तो अजित पवारांचा. अन् तो महाराष्ट्राच्या राजकारणातला केंद्रीय भाजपच्याही दृष्टीने कळीचा मुद्दा आहे. त्यांच्याकडे आमदार किती या प्रश्नाइतकाच महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जनता त्यांना कशी स्वीकारते आहे? दादांनी थेट आव्हान दिले आहे ते त्यांचे काका अन् महाराष्ट्राच्या राजकारणात गेली चार दशके कायम केंद्रस्थानी राहिलेल्या शरद पवार यांना.

शरद पवार त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला प्रारंभ करणार आहेत. या दौऱ्याला किती आणि कसा प्रतिसाद मिळतो, यावर बरेच आमदार निर्णय घेतील. दादांच्या प्रशासकीय क्षमतेबद्दल भरभरून बोलणारे आमदारही त्याच दमात ‘पण मते खेचायची ताकद साहेबांमध्ये आहे’ असे म्हणतात. सातारा हा शरद पवार यांच्यावर श्रद्धा ठेवणारा जिल्हा.

‘तिथे साहेब निवडणुका फिरवू शकतात’, असे म्हणता म्हणता मकरंद पाटील यांच्यासारखे वाईचे लोकप्रिय आमदार अजित पवार यांच्या राहुटीत येऊन बसतात. नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर हे जिल्हे कुणाकडे आहेत? मराठवाडयात माहोल काकांचा की पुतण्याचा,असे प्रश्न आहेतच.

विधिमंडळ काळात ‘राष्ट्रवादी’च्या दोन्ही गटांचे आमदार एकमेकांना टाळ्या देत होते, एवढेच नव्हे तर एकत्र सहभोजन करत मिठ्याही मारत होते. प्रफुल्ल पटेल ,सुनील तटकरे आणि स्वत: अजित पवार शरद पवारांच्या गटातील प्रत्येक आमदाराशी संपर्क साधत असतात. त्यांनीही ‘विकासयात्रे’त सहभागी व्हावे, असा प्रयत्न करतात. बरेच आमदार हजेरीपटावर स्वाक्षरी करत होते; पण सभागृहात फिरकतच नव्हते.

आमदार पक्ष फोडून सत्ताधारी गटात गेले खरे; पण ते नेमके किती आहेत हेच कळत नाहीये. काही पक्षफुटी जनतेसमोर चर्चिल्या जातात, तर काही बाबतीत झाकली मूठ सव्वालाखाची मानली जाते. ‘माझ्या समर्थक आमदारांचा आकडा मला कळूच द्यायचा नाही असे समजा ना’ असे दादा म्हणाले.

हा आकडा न कळणे हे लोकशाहीव्यवस्थेत बसते तरी कसे? पण कुणालाच काही प्रश्न धसास लावायचे नसतात हेच खरे. केंद्रातल्या भाजपला या अनिर्णित संख्याबळाच्या संशयाचा लाभ मिळतो आहे.जनतेला हे असले खेळ कितपत आवडताहेत, ते यथावकाश कळेलच. जयंत पाटील यांच्याबाबतही दर दोन तासांनी नवी चर्चा सुरु होते.

पश्चिम महाराष्ट्र बळकट व्हायला त्यांची मदत होईल, शिवाय प्रदेशाध्यक्षच गळाला लागला तर पक्षावर ताबा मिळवणे सहजसोपे ठरेल. या चर्चा विराम घेत नसल्याने ‘राष्ट्रवादी’ संदर्भातला संशयकल्लोळ वाढला आहे. त्याचा लाभ घेण्याची ताकद विरोधी बाकावरल्या कॉंग्रेसमध्येतरी आहे का ते न कळे !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()