राजधानी मुंबई : जागावाटपाचे तिढे सोडविण्याचे आव्हान

महाराष्ट्रातला लोकसभा निवडणुकीचा यावेळचा रणसंग्राम वेगळाच आहे. युती आणि आघाडी नव्याने झाली असल्याने जागावाटप कसे होणार, हा प्रश्‍न अत्यंत महत्त्वाचा आहे.
mahavikas aghadi
mahavikas aghadisakal
Updated on

महाराष्ट्रातला लोकसभा निवडणुकीचा यावेळचा रणसंग्राम वेगळाच आहे. युती आणि आघाडी नव्याने झाली असल्याने जागावाटप कसे होणार, हा प्रश्‍न अत्यंत महत्त्वाचा आहे. तो कशारीतीने सोडवला जातो, यावर बरेच काही अवलंबून असेल.

लोकसभेच्या निवडणुकांना जेमतेम १०० दिवस उरले आहेत. महाराष्ट्रातला लोकसभा निवडणुकीचा यावेळचा रणसंग्राम वेगळाच आहे. दोन्हीकडे प्रमुख तीन पक्ष आहेत. युती आणि आघाडी नव्याने झाली असल्याने जागावाटप कसे होणार, हा नवा विषय आहे अन् सगळेच नवे असल्याने तो नव्यानेच सोडवावा लागणार आहे. सत्ताधारी युतीत मोदी या नावाभोवती सगळे केंद्रित झाले असल्याने सूत्र स्पष्ट आहे.

शिंदे गटाचे किती खासदार यावेळी जिंकून येऊ शकतात, याचे भाजपने काही कोष्टक तयार केले असेल. ते सांगून तसे बदल करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाईल. ते बदल प्रत्यक्षात आणले जातील. शिंदे गट यथाशक्ती विरोध करुन पाहील; पण त्यामुळे फार काही पदरी पडेल असे नाही .

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकच खासदार संसदेत. प्रदेशाध्यक्ष असलेल्या खासदार सुनील तटकरे यांच्यासाठी रायगडची त्यांची जागा सोडली जाईल; शिवाय काही जागा त्यांना लढण्यास दिल्या जातील. मोदींना पंतप्रधान करणे हा एकमेव उद्देश असल्याने अन् महाशक्तीच्या ताकदीची नव्या मित्रांना पुरेपूर खात्री असल्याने जी काय खळखळ होईल ती चहाच्या पेल्यातले वादळ असेल.

राजकीय भविष्यावर डोळा ठेवून...

दोन्हीकडे नवा एकेक भिडू येण्याची चिन्हे आहेत. महायुतीशी ‘मनसे’ची मंडळी चर्चा करुन गेली आहेत; अन् इकडे महाआघाडीला वंचित बहुजन आपल्यात यावे असे वाटतेय. ‘मनसे’ हा तुलनेने सध्या छोटा पक्ष झालाय, तर वंचित बहुजन आघाडीला अजूनही मोठा पक्ष समजले जाते आहे. कॉँग्रेस सध्या सर्वाधिक आमदार असलेला विरोधातला पक्ष. पण हा पक्ष धक्क्यात आहे.

नांदेड आणि हिंगोली या दोन लोकसभा मतदारसंघांवर पगडा असलेले अशोक चव्हाण बाहेर पडून भाजपवासी झाले आहेत अन् महाविकास आघाडीत कोणतीच तयारी दिसत नसल्याने राजकीय भविष्य सुस्थिर करायला आपण मोदीमार्ग स्वीकारल्याचे त्यांनी सांगून टाकले आहे.

अशोक चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणावर तीन दशके प्रभाव टाकणाऱ्या शंकरराव चव्हाणांचे चिरंजीव. अशोक चव्हाण दोनदा मुख्यमंत्री झाले. नेमक्या कोणत्या कारणाने त्यांनी पक्ष बदलला, भाजपने दबाव टाकला म्हणून की अन्य कारणांनी, हे सांगता येत नाही. जे काय कॉंग्रेसने दिले ते सगळे भूतकाळात जमा करुन बाहेर पडले आहेत.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर अप्रत्यक्ष आक्षेप घेत आहेत. गावागावांत प्रवास करण्याच्या भाजपच्या प्रचारमोहिमेला धडाकेबाज सुरुवात झाली; पण कॉंग्रेसमध्ये काहीच हालचाल नाही, असा त्यांचा आक्षेप आहे. मराठा समाजातील हा नेता आपल्याकडे घेऊन भाजपने खेळी केली आहे.

खरेच कॉँग्रेसची नेमकी काय तयारी सुरु आहे? दोन फेब्रुवारीच्या जागावाटप बैठकीनंतर पुढे काहीही घडलेले नाही. उठता बसता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते कॉँग्रेसला नावे ठेवत सुटले आहेत. ही टीका कॉँग्रेसलाच मोठे करते आहे. दिल्लीत भाजप कार्यकर्त्यांना निवडणूकसज्ज करताना मोदी-शहांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले.

भाजपचे अधिवेशन होते लोकसभेच्या लढाईला सामोरे जाणाऱ्या पक्षसंघटनेला सज्ज करण्यासाठी. त्यासाठी लक्ष्य ठरवले गेले कॉंग्रेसला आणि महाराष्ट्रातील ज्या दोन पक्षांत उभी फूट पडली आहे, त्या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना. म्हणजे शरद पवार व उद्धव ठाकरे यांना. अश्वमेधाचा घोडा सोडलेल्या भाजपने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.

आता या तीन पक्षांनी एकत्र येऊन भाजपला उत्तर देण्याची वेळ आहे. हे उत्तर कसे असेल यावर महाराष्ट्राचा राजकीय कौल अवलंबून आहेच; शिवाय मोदींचे ४०० पारचे स्वप्नही ! मोदी सत्तेत परत येणार असा निष्कर्ष काढणाऱ्या सर्वेक्षण चाचण्या महाराष्ट्रात तीन पक्षांच्या महायुतीमागे निर्णायक बहुमत आहे, हे मान्य करायला तयार नाहीत.

उद्धव ठाकरे संकटातली संधी शोधत गावोगाव फिरत आहेत. खासदार- आमदारांना त्यांची भेट अप्राप्य असल्याची टीका होई.आता त्यांच्या घरी उद्धव ठाकरे जातीने हजेरी लावताहेत. संपर्कसभाही घेताहेत. शरद पवारही कार्यक्रम घेत आहेत. प्रचंड फिरताहेत. कॉंग्रेसने लोणावळ्यात चिंतनशिबीर घेतले. या शिबिराला तब्बल सात आमदारांनी दांडी मारली. सगळ्याच कार्यक्रमांना सगळे आमदार हजर रहातील, असे नाही.

मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री पक्ष त्यागून गेला असताना आमदारांची गैरहजेरी भुवया उंचावणारी आहे. त्याबाबत आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावणार आहेत. हे सगळे आवश्यक आहेच; पण महाविकास आघाडीतले तीन पक्ष जागावाटप कसे करणार? ‘वंचित’ला समवेत घेणार काय, याचे उत्तर देता येत नाही अशी स्थिती आहे. दहा दिवसांत भाजप उमेदवारयाद्या जाहीर करेल; पण महाविकास आघाडी अद्याप चर्चाच करते आहे.

जनतेसमोर पर्याय काय?

भूतकाळातील प्रकरणांचा सोयीने वापर करुन यंत्रणा दबाव टाकतात. गुन्हेगार ठरवले जाण्याऐवजी मग तो नेता भाजपचा उमेदवार ठरतो. हा आता अंगवळणी पडलेला प्रकार आहे; पण त्यावर जर तोडगा काढता येत नसेल तर जनतेने कुठला पर्याय निवडायचा? सध्या अगदी खालच्या स्तरावरचा प्रचार सुरु आहे.

व्यक्तिगत उणीदुणी काढली जात आहेत. जागोजागी राडे सुरु आहेत. ‘कार्यकर्ते तुमचा कचरा करतील’, असा शाप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे या भाषेला कसे उत्तर देतात, तेवढे बघायचे आहे. त्यांना ते निवडणुकीच्या मैदानात प्रत्यक्ष कामगिरीने द्यावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()