ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे प्रकरण उघडकीस आल्यानं राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
मुंबई : भाजपचे (BJP) विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि बीड जिल्ह्यातील विधान परिषद आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यामागे पुन्हा एकदा मुंबै बँक घोटाळ्याचा (Mumbai Bank Scam) ससेमिरा लागला आहे. या प्रकरणाची आता खोलात जाऊन चौकशी होणार आहे. त्यामुळं दरेकर आणि आमदार धस यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बोगस दस्तावेजांच्या आधारे तब्बल 27 कोटींचं कर्ज वाटप केल्याप्रकरणी मुंबै बँकेचे (Mumbai Bank) माजी अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांच्यासह धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस (Prajakta Dhas) यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याच्या सहकार खात्यानं दिल्यानं खळबळ उडालीय. ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे प्रकरण उघडकीस आल्यानं यावरुन राजकारण पेटण्याची शक्यता आहे. मात्र, विरोधी पक्षनेते दरेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणातील प्रमुख आक्षेपाची बाब म्हणजे, धस यांच्या जयदत्त अॅग्रो इंडस्ट्रीज, अंभोरा (Jaydatta Agro Industries, Ambhora) आणि मच्छिंद्रनाथ ओव्हरसीज प्रा. लि., आष्टी या केवळ कागदोपत्री उद्योगांना हे कर्ज वाटप करण्यात आलं आहे. तसेच त्यासाठी बोगस दस्ताऐवज तयार करण्यात आले आहेत.
मुंबै बँकेनं या कर्जप्रकरणात मोठी अनियमितता केलेली असून सर्व आर्थिक व्यवहार संशयास्पद व आर्थिक गैरवापर करण्याच्या उद्देशानं केल्याचं दिसून येतंय. हितसंबंधित लोकांना कर्ज वाटप केलेलं आहे. त्यामुळं मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात मुंबै बँकेनं कार्यक्षेत्राबाहेर बीड जिल्ह्यात बनावट दस्तावेजांच्या आधारे 27 कोटी रुपयांचं कर्ज बेकायदेशीररित्या वाटप केल्यामुळं कर्ज देणार व घेणार यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणूक व अनियमितताअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहकार खात्याने दिले आहेत. हे कर्ज वाटप करण्यात आले, त्यावेळी प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे अध्यक्ष होते. विशेष म्हणजे, मुंबै बँकेचे वकील, ऑडिटर यांनी सर्च रिपोर्ट न देता, मालमत्तेची शहानिशा न करता, त्यांचा अभिप्राय न घेता हे कर्ज प्रकरण मंजूर करुन 27 कोटी अदा करण्यात आलेले आहेत. याप्रकरणी मुंबै बँकेने तत्कालीन अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्यासह मुंबै बँकेचे इतर पदाधिकारी, व्यवस्थापकीय संचालक आणि कर्जदार सुरेश धस व त्यांच्या पत्नी प्राजक्ता सुरेश धस यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे (Ram Khade) यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्याकडे तक्रार केली होती.
दरम्यान, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, मी अशा नोटिसींना घाबरत नाही. मुंबै बँकेने आमदार सुरेश धस यांच्या उद्योगांना सर्व कागदपत्रे तपासून नियमानुसार कर्ज वाटप केले आहे. सरकारनं हवी ती चौकशी करावी, यामध्ये कोणत्याही चुकीच्या गोष्टी झालेल्या नाहीत. राज्य सरकार केवळ राजकीय आकसातून कारवाई करीत आहे. तर, यासंदर्भात आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. धस यांच्या दूरध्वनीवर वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही. मुंबै बँकेने कार्यक्षेत्राबाहेर बीड जिल्ह्यात (Beed District) बनावट दस्तावेज (गहाणखत) तयार करुन ३१ ऑगस्ट २०१९ रोजी बेकायदेशीररित्या २७ कोटी रुपयांचं कर्ज डीड ऑफ मॉर्गेज करुन दिलं आहे. त्यामध्ये मोठ्या त्रुटी आहेत.
मुंबै बँकेच्या मुंबईतील ठाकूर व्हिलेज, कांदिवली, दामुनगर आणि अंधेरी पूर्व येथील शाखांमध्ये बनावट कर्ज घेतल्याची माहिती उघड झालीय. हे कर्ज वाटप करताना कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. प्रवीण दरेकर हे त्यावेळी मुंबै बँकेचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांचा या घोटाळ्याशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. बँकेच्या काही सदस्यांनी नाबार्डकडे या कर्ज वाटप प्रकरणाची तक्रार केली होती. त्यानंतर चौकशी करण्यात आली असता केवळ कांदिवली पूर्व आणि अशोक वनमधील शाखांमधूनच 55 बोगस कर्जप्रकरणे उघडकीस आली होती.
प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे 2000 पासून संचालक होते. 2010 पासून अध्यक्ष आहेत. या घोटाळ्याप्रकरणी 2015 मध्ये विवेकानंद गुप्ता यांच्या तक्रारीवरून प्रवीण दरेकर, शिवाजी नलावडे आणि राजा नलावडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. 1998 पासून 123 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं होतं. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर दरेकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.