Mumbai Local: मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर भरकटणाऱ्या मुलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये मुलांचे प्रमाण जास्त असून मुलींची संख्यादेखील लक्षणीय आहे. अशा भरकटणाऱ्या मुलांना रेल्वे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
१ जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान मुंबईतील १७ रेल्वे स्थानकांवर अशी १ हजार ९८५ मुले आढळली आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या कुर्ला स्थानकावरची आहे. एकट्या कुर्ला स्थानकावर १४७ मुले आणि ३४० मुलींना ताब्यात घेऊन चाइल्ड होममध्ये पाठवले आहे. यामध्ये काही अभ्यासाच्या भीतीने घर सोडून पळून आलेली आहेत तर काही गर्दीमुळे पालकांचा हात सुटल्याने स्थानकावर भरकटली असल्याचे सांगण्यात आले.
मुंबईतील १७ रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक रेल्वे स्थानकांवर १ जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत तब्बल १ हजार ९८५ मुले भरकटली आहेत. त्यात ६९० मुली आणि १ हजार २९५ मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील १ हजार ३३५ मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. तर ६५७ मुलांना पालकांअभावी चाइल्ड होममध्ये पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील १७ रेल्वे पोलिस ठाण्यातील पोलिसांनी आणि खास करून महिला पथकाने मुलांची ही शोध मोहीम यशस्वी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५८ मुली आणि १५९ मुले सापडली आहेत. त्यातील २१७ मुलांना चाइल्ड होममध्ये पाठवण्यात आले. दादर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ७७ मुली आणि १५५ मुले भरकटले असून त्यातील १७ मुलांना चाइल्ड होममध्ये तर २१५ मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. कुर्ला रेल्वे पोलिसांनी सर्वात जास्त म्हणजेच १४७ मुले आणि ३४० मुलींना ताब्यात घेत त्यातील ३०६ मुलांना चाइल्ड होममध्ये पाठवले. तर १८२ मुलांना पालकांच्या ताब्यात दिले.
ठाणे रेल्वे पोलिसांनी ५० मुली आणि ५८ मुलांना ताब्यात घेऊन त्यातील ९ मुलांना चाइल्ड होममध्ये तर ९९ मुलांना पालकांच्या ताब्यात दिले. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी ३२ मुली आणि २७ मुलांना ताब्यात घेऊन त्यातील १० मुलांना चाइल्ड होममध्ये तर ४९ मुलांना पालकांच्या ताब्यात दिले. कल्याण रेल्वे पोलिसांनी ५७ मुली आणि ६८ मुलांना ताब्यात घेऊन त्यातील ५५ मुलांची रवानगी चाइल्ड होममध्ये तर ७० मुलांना पालकांच्या ताब्यात दिले. कर्जत रेल्वे पोलिसांनी ११ मुली आणि १९ मुलांना ताब्यात घेत त्यातील ३ मुलांना चाइल्ड होममध्ये तर २७ मुलांना पालकांच्या ताब्यात दिले.
मुंबईत दिवसेंदिवस लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून कुर्ला, ठाणे आणि दादरकडे पाहिले जाते. या स्थानकांत रेल्वे प्रशासनाकडून गर्दीचे नियोजन होत नसल्याने अनेकदा चेंगराचेंगरी होत असते. त्यातच सुट्टीच्या दिवशी अनेकजण कुटुंबीयांसह रेल्वेचा प्रवास करतात. यामध्ये अनेकदा गर्दीमध्ये लहान मुले भरकटल्याच्या घटना घडत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.