हे हिंदुत्व नाही, हा नामर्दपणा : शिवसेनाप्रमुख

दसरा मेळाव्यात भाजपवर ठाकरी भाषेत टीका
शिवसेनाप्रमुख
शिवसेनाप्रमुखsakal
Updated on

मुंबई : कोणाच्या कुटुंबावर, पत्नीवर आणि मुलांवर वैयक्तिक आरोप करणे, कोणाच्या तरी आडून लपून हल्ले करणे आणि तो मी नव्हेच, असे सांगणे हे हिंदुत्व नसून नामर्दपणा अन् षंढत्व आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर टीकास्त्र सोडले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी केंद्र सरकारलाही लक्ष्य केले. देशातील बंदरांच्या सीएसआरमधील ७५ टक्के निधी मोदी सरकारने गुजरातकडे वळवला, ही माहिती अधिकारातून मिळालेली माहिती सांगताना ‘वाचा आणि थंड बसा’ या ‘मार्मिक’च्या घोषवाक्याने त्यांनी शिवसैनिकांना डिवचले.

शिवसेनेचा दसरा मेळावा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मोजक्या शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडला. रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, परिवहन मंत्री अनिल परब आदींसह आमदार, नगरसेवक, महापौर, विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. आपल्या कामांची चित्रफीत दाखवत शिवसेनेने मेळाव्याच्या निमित्ताने मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची अनौपचारिक सुरुवात केली.

शिवसेनाप्रमुख
Video : धोनीची चूक जड्डूनं भरुन काढली; मॅच इथंच फिरली!

उद्धव ठाकरे यांनी ५० मिनिटांपेक्षा अधिक वेळ केलेल्या भाषणात केंद्रातील सत्तेपासून राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपपर्यंत सर्वांचा पुरेपूर समाचार घेतला. संघराज्यावर केंद्र सरकारकडून घाला घातला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून केंद्र व राज्यांना सार्वभौमत्व प्रदान केले आहे, याची आठवण ठाकरेंनी केंद्राला करून दिली. आणीबाणी, परकीय आक्रमण व विदेशी धोरण हे तीनच विषय केंद्राकडे आहेत. रोजच्या कारभारात केंद्राची लुडबूड होता कामा नये, असा थेट इशाराही ठाकरे यांनी केंद्राला देत इतर राज्य सरकारांनी राज्यांचे सार्वभौमत्व अबाधित राहावे, यासाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले.

आज उपटसुंभ नवहिंदूंपासून हिंदुत्व धोक्यात आहे. कारण हिंदुत्वाची शिडी करून वर चढलेले आता इंग्रजांची फोडा व झोडा नीती वापरत आहेत. त्यामुळे जात-पात-धर्म विसरून मराठी माणसाची एकजूट बांधा. मराठी-अमराठी हा भेदभाव गाडून हिंदूंची एकजूट बांधा, असे सांगत ठाकरे यांनी हिंदुत्वाशी असलेली आपली बांधिलकीही स्पष्ट केली. हिंदुत्वाच्या व्याख्येची भाषणात विस्तृत चर्चा करत ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आजच्या भाषणाचे दाखले देत भाजपला आरसा दाखवला. ते म्हणाले, की भागवत यांनी केलेल्या विधानानुसार आपले पूर्वज एक होते हे जर मान्य असेल, तर विरोधी पक्ष आणि दिल्लीत आंदोलन करणारे शेतकऱ्यांचे पूर्वज परग्रहावरून आलेत का? राज्यांवर वर्चस्व ठेवण्याच्या केंद्राच्या हल्लीच्या भूमिकेची कायदेपंडितांनी चिकित्सा करावी. केंद्राची भूमिका राज्यघटनेनुसार नसेल तर त्यांची राज्यांच्या कारभारात लुडबूड नको हे त्यांना राज्यांनी सांगायला हवे, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवरही हल्ला चढवला. एकीकडे खरे हिंदुत्व काय हे सांगतानाच बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी दिल्लीपुढे न झुकण्याची दाखवलेली जिद्द आपणही ठेवायला हवी, असे ते म्हणाले. हर हर महादेव ही घोषणा काय आहे, हे दिल्ली तख्ताला दाखवायची तयारी ठेवावी. तलवारी-हत्यारे घेऊन आलेले दिल्लीचे पार्सल ती हत्यारे तोडून परत पाठवायला हवे, अशा शब्दांत त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये भाजपशी दोन हात करण्यास तयार राहण्याचे आवाहनही शिवसैनिकांना केले.

आज महाराष्ट्राकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचा खून होतो, असा गळा काढला जातो; मग उत्तर प्रदेशात लोकशाहीचा मळा आहे का? अजमल कसाबचा हल्ला आपल्या अंगावर झेलणाऱ्या पोलिसांना माफिया म्हटले जाते व तो शिमगा करणाऱ्यांना पोलिसांनी अडवले, तर ते माफिया ठरतात. मग लखीमपूरला जाणाऱ्या प्रियांका-राहुल गांधी यांना अडवणारे उत्तर प्रदेशचे पोलिस भारतरत्न आहेत का, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

देशात जणू काही फक्त महाराष्ट्रातच गांजा-चरस यांचा वापर होतो, असे चित्र उभे केले जाते. केंद्रीय तपासयंत्रणांनी एक सेलिब्रिटी पकडला तर ढोल वाजवले जातात. मात्र, मुंबई पोलिस त्याहीपेक्षा मोठी कामगिरी करतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष होते. मुंद्रा बंदरात ड्रग्ज पकडले ते बंदर कोठे आहे, असा सूचक प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना विचारला.

शिवसेनाप्रमुख
वाकडच्या रणरागिणी पथकासाठी इलेक्ट्रिक बाईक

राज्यात अमली पदार्थ आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या छाप्यांबाबतही उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘सत्तेचे व्यसन अमली पदार्थ आहे. छापा टाकून काटा काढायचा, हे प्रकार जास्त दिवस चालू शकणार नाहीत. भाजपसोबत असले की गंगा, नाही तर गटारगंगा हा सुरू असलेला प्रकार जनतेलाही आता लक्षात येऊ लागला आहे.’ कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप हे हिंदुत्व नाही, तर षंढपणा असल्याची चीडही ठाकरे यांनी व्यक्त केली. मुंबईत गेल्या महिन्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेचा उल्लेखही ठाकरे यांनी केला. या प्रकरणातील गुन्हेगाराला लवकरच फासावर लटकवले जाईल, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

मत्सरातून राज्याच्या संस्कृतीवर हल्ले

हर्षवर्धन पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताज्या वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या सत्तापिपासूपणावरही टीका केली. त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवले असले, तर कदाचित मी राजकारणातूनही बाजूला झालो असतो. मी वचन पाळण्यासाठी मुख्यमंत्री झालो. मै फकीर हू... झोली फैला के बैठा हू, असे कर्मदरिद्री विचार आमचे नाहीत. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच, असे आव्हानही त्यांनी दिले. महाराष्ट्राची आगेकूच पाहून काहींच्या पोटात दुखत असल्याने महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी आपल्या संस्कृतीवर हल्ले होत आहेत. सत्ता घ्या हवीतर, पण आमच्यासारखे काम करून दाखवा, असेही ठाकरे यांनी बजावले.

मी मुख्यमंत्री आहे असे मला वाटत नाही!

राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते, असे विधान नुकतेच केले होते. त्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. ‘मी मुख्यमंत्री आहे, असे मला कधीच वाटत नाही, तर शिवसैनिकांच्या कुटुंबातील सदस्य आहे, भाऊ आहे, असे मला वाटत असते. पदे येतील, सत्ता येईल-जाईल; पण अहंपणा डोक्यात जाऊ देऊ नकोस, हा संस्कार माझ्यावर झाला आहे,’ असे सांगत त्यांनी फडणवीस यांना चपराक लगावली.

सावरकर-गांधी कळले का?

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्यावरून वक्तव्य करणारे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनाही उद्धव ठाकरे यांनी शालजोडीतले लगावले. आपल्याला सावरकर-गांधी कळले आहेत का, तेवढी आपली लायकी आहे का, असे वाद उकरणाऱ्यांनी देशासाठी काय केले, असे त्या दोघांनी विचारले तर आपण काय सांगणार? स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नाही, आंदोलनात भाग नाही... फक्त भारतमाता की जय, वंदे मातरम, अशी घोषणा दिली की काम झाले, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

गुजरातलाच निधी का?

केंद्रीय जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी देशातील बंदरांच्या सीएसआरपैकी ७५ टक्के निधी गुजरातकडे वळवला, जेएनपीटी बंदराच्या सीएसआरमधून संघ-भाजपच्या नेत्यांशी संबंधित संस्थांना खिरापत वाटण्यात आली, अशी माहिती अधिकारातून मिळालेली उदाहरणे उद्धव ठाकरे यांनी वाचून दाखवली. मोदी सरकार आल्यावर गुजरातला मिळणारा निधी साडेतीनशे टक्क्यांनी वाढल्याचा ‘कॅग’च्या अहवालातील उताराही त्यांनी वाचून दाखवला. महाराष्ट्र आणि इतर राज्ये ही देशाचा भाग नाहीत का, त्यांना निधी का मिळू नये, असा संतप्त सवालही त्यांनी केला.

ठळक मुद्दे

 ईडी, सीबीआयच्या माध्यामातून कारवाया करू नका, समोरासमोर या. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलो, तरी पोलिसांच्या मागे लपून कारवाया करत नाही. माझी ताकद शिवसैनिक आहे. त्यांच्या हिंमतीवरच मी तुमच्यासोबत लढेन. तुम्ही चिरकत राहा, पण माझा वाडा चिरेबंदी आहे.

 राज्यात दोन वर्षांत दोन पोटनिवडणुका झाल्या. दोन्ही पोटनिवडणकांत जगातल्या मोठ्या पक्षाकडे उपरे उमेदवार.

 हिंदुत्व आता धोक्यात आहे. हिंदुत्वाची शिडी करून जे वर चढले आहेत, त्यांच्यामुळे धोका निर्माण झाला आहे. मराठे, अस्पृश्य, घाटी, कोकणी आणि मराठी आणि अमराठी करून तुम्हाला वेगळे पाडले जाईल. हिंदुस्थान धर्म वाढवावा.

 हिंदुत्व आता खरे धोक्यात. म्हणून बंगालप्रमाणे तुमची तयारी आहे? मराठी-अमराठी भेद करू नका. मराठी म्हणून एक व्हा. मराठा तितुका मेळवावाप्रमाणे हिंदुत्वसुद्धा वाढवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.