मुंबई - स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी प्रचंड महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्याने अनेक उमेदवारांनी पक्षीय निष्ठा खुंटीला टांगली. आपल्या पक्षात उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात येताच अनेक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना थेट आवाहन देत पक्षांतर केले. त्यामुळे अनेक पक्षांत याबाबत खदखद निर्माण झाल्याने प्रचारादरम्यान मुंबई-ठाण्यासह राज्याच्या अन्य भागांत धुमश्चक्री होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेच्या अहवालात असल्याने निवडणूक आयोगाची डोकेदुखी वाढली आहे.
राज्यातील दहा महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर खळबळ उडाली. सर्वच पक्षांत इच्छुकांची संख्या प्रचंड असल्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच कालपर्यंत पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या रात्री उशिरापर्यंत जाहीर झाल्या नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काल नाशिक, तर आज मुंबई ठाण्याची यादी जाहीर केली. भाजप आणि शिवसेनेनेही अगदी शेवटच्या क्षणी याद्या जाहीर केल्या. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून गेला आठवडा पक्षांतरामुळे चांगलाच गाजला. काही जण शिवसेनेतून भाजपात, तर काही जण मनसेतून शिवसेनेत अशा नाटयमय घडामोडी घडल्या. शिवसेनेचे परेल येथील नगरसेवक नाना आंबोले, अणुशक्ती नगर येथील बबलू पांचाळ आणि प्रभाकर शिंदे यांचे पक्षांतर शिवसनेच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे हे विभाग संवेदनशील झाले आहेत.
युती तुटल्यापासून शिवसेना भाजपच्या नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात जहरी प्रचार सुरू केल्याने तणाव वाढला आहे. भाजप नेत्यांकडून थेट मातोश्रीवर आरोप करण्यास प्रारंभ केल्याने शिवसेना नेते खवळले आहेत. मुंबईतील पक्षांतर आणि ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचे पडसाद निवडणुकीच्या प्रचारात उमटणार आहेत. त्यामुळे काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मारामाऱ्या, राडेबाजी होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेणे वर्तवल्याचे गृह विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईत 327 बूथ संवेदनशील असून ठाण्यातील आकडेवारी गृह विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाकडे अद्याप प्राप्त झाली नाही. मात्र या दोन्ही ठिकाणी शिवसेना आणि भाजपमधील तणाव वाढत जाणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर राज्यातील बीड, सोलापूर, धुळे, नाशिक आणि कोकणही संवेदनशील असल्याचे सांगण्यात आले.
निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. या संदर्भात योग्य सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जे. एस. सहारिया, राज्य निवडणूक आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.