आंतरराष्ट्रीय पातळीवरही चौकशी करा! मुनगंटीवार यांचे मेनका गांधी यांना थेट आव्हान 

mungantiwar
mungantiwar
Updated on

मुंबई - यवतमाळच्या पांढरकवडा वनक्षेत्र परिसरात 'अवनी' वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी ट्विटरवरून महाराष्ट्राच्या वन्यमंत्र्यांना खडसावल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना आज त्याला चोख उत्तर दिले. मेनका गांधी यांनी जाहीरपणे भाष्य करण्यापूर्वी मला पन्नास पैसे खर्च करून फोनवरून माहिती घेतली असती तर बरे झाले असते. माहितीच्या अभावी त्यांनी असे भाष्य करणे योग्य नाही. "अवनी' ही वनकर्मचाऱ्यांची शत्रू नाही, तिला ठार मारण्याचा त्यांचा कोणताही उद्देश नव्हता, असे सांगतानाच या प्रकरणाची मेनका गांधी यांनी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशी करावी, असे थेट आव्हान देत मी त्यांना पत्र लिहिणार असल्याचे मुनगंटीवार यांनी आज सांगितले. 

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्र परिसरात "टी-1' (अवनी) वाघिणीने 13 जणांचा बळी घेतला होता. या वाघिणीला शुक्रवारी रात्री खासगी शार्पशूटरच्या मदतीने ठार करण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर वन्यप्रेमींनी राज्य सरकार व वन कर्मचाऱ्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यातच मेनका गांधी यांनीही जाहीरपणे ट्विट करीत "अवनी'ला गोळ्या घालणे म्हणजे ती एकप्रकारे हत्याच असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. या आरोपामुळे अस्वस्थ झालेल्या मुनगंटीवार यांनी आज पत्रकार परिषदेत वन विभागाची बाजू मांडली. 

मेनका गांधी यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्याला वनमंत्री म्हणून नियुक्तच कसे करतात, असा प्रश्‍न केला होता. यावर मुनगंटीवार म्हणाले, की "अवनी' काही वन कर्मचाऱ्यांची शत्रू नव्हती. तिला ठार मारण्याचा त्यांचा उद्देशही नव्हता. तिला बेशुद्ध करण्याचे इंजेक्‍शन मारण्याचा प्रयत्न केला; पण वाघिणीने हल्ला केला म्हणून शेवटी गोळी घातल्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही, असा दावा त्यांनी केला. माझ्या कार्यकाळात मी कधीही वाघाला मारण्याचे आदेश दिलेले नाहीत. 2017 मध्ये एका वाघाला बेशुद्ध करून जेरबंद केले होते, असे सांगत मंत्री किंवा सचिवाला वाघाला मारण्याचे आदेश देण्याचा अधिकार नसल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. 13 जणांचा बळी घेणाऱ्या "अवनी'ला गोळी घालून ठार मारण्यापूर्वी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केला होता. त्यामुळे या प्रकरणी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा कोणत्याही पातळीवर चौकशी करा; पण वन कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची करू नका. वन कर्मचारी हे व्याघ्रसंवर्धन व संरक्षणाचे काम करीत आहेत, असे ते म्हणाले. 

पिलिभितमध्ये शफाअत खानला प्रशस्तिपत्र 
मेनका गांधी यांच्या पिलिभित मतदारसंघातील एका नरभक्षक वाघिणीला शार्पशूटर शफाअत अली खान यांनीच गोळ्या घालून ठार केले, तेव्हा तेथील वन विभागाने शफाअत अली खान यांचे प्रमाणपत्र पाठवून अभिनंदन केले होते, याची आठवण मुनगंटीवर यांनी करून दिले. देशातील नऊ राज्यांत शफाअत अली खान यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली आहेय असा दाखला त्यांनी दिला. 

"मग सरकारला गोळ्या घालायच्या का?' 
हे एन्काउंटर आहे. मुंबईत गॅंगवॉर सुरू असताना पोलिस एन्काउंटर करीत. त्यामध्ये कधी खरे कधी खोटेपणा असे. हे एन्काउंटर आहे. याचा मी निषेध करतो. धिक्‍कार करतो. केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांचा मी आभारी आहे. याची चौकशीच नव्हे, तर त्यावर कारवाई केली जावी, असे मत व्यक्‍त करत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, की राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मग सरकारला गोळ्या घालायच्या का? 

मेनका गांधी यांनी जाहीरपणे भाष्य करण्यापूर्वी मला पन्नास पैसे खर्च करून फोनवरून माहिती घेतली असती तर बरे झाले असते. माहितीच्या अभावी त्यांनी असे भाष्य करणे योग्य नाही. 
- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.