नागपूर: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ज्या मोदीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं तो गावगुंड मोदी आज अखेर नागपूरात अवतरला. काँग्रेस समर्थित वकील सतीश उके यांनी या तथाकथित गावगुंड मोदीला पत्रकारांसमोर आणलं. मात्र, पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देताना या मोदीला चांगलाच घाम फुटला. भंडारा जिल्ह्याच्या गोंदी या गावातील हा गावगुंड मोदी दारू विकतो, पितो आणि त्यातूनच त्यानं नाना पटोले यांच्या विरोधात अपशब्द बोलले आणि त्यांच्या विरोधात प्रचार केला, असा दावा ऍड. सतीश उके यांनी केलाय. मुळात या मोदीचं मुळं नाव उमेश घरडे उर्फ मोदी असं आहे. अनेक लोकं त्याच्या मागे लागले त्यामुळं तो घाबरून आपल्या कडे आला आणि आपण त्याला माध्यमांसमोर आणल्याचं उके यांनी सांगितलं.
तथाकथित मोदी याला मात्र पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना चांगलाच घाम फुटला. आपण दारू विकत होतो, दारू पितो, पत्नी आपल्याला सोडून गेली, आपण नाना पटोले यांना दारूच्या नशेत शिव्या दिल्या आणि विरोधात प्रचार केला, असं सांगत 2020 पासून आपल्याला मोदी असं टोपण नाव पडल्याचं सांगितलं. मात्र, मोदी नाव कसं पडलं हे मात्र सांगण्यास नकार दिला. पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तर अर्ध्यावर सोडून या मोदीनं अक्षरशः पळ काढला. त्यामुळं खरंच नानांनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी हाच होता, की तो हाच आहे असा केविलवाणा प्रयत्न होता, असा प्रश्न निर्माण झाला.
पटोलेंचा 'मोदी' आता अटकेत
मात्र, भंडारा पोलिसांनी आता अथक प्रयत्नांनंतर त्या गावगुंड मोदीला पकडले असून चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कथित गावगुंड मोदीची चौकशी सुरु आहे. तसेच या गुंडाचे टोपण मोदी असे आहे. तर त्याचे पुर्ण नाव उमेश प्रेमचंद घरडे असे असून तो लाखनी तालुक्यातही गोंदी गावातील रहिवासी आहे. त्याला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी व संपूर्ण परिवार नागपूर येथे राहतात. उमेश दोन वर्षांपासून गावातच एकटाच राहतो, दारू पिवून गावकऱ्यांना शिवीगाळ करतो. मात्र असे असले तरी त्याच्या विरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये आतापर्यंत कोणताही गुन्हा किंवा तक्रार दाखल नाही.
मात्र आता पोलिसांनी जरी कथित मोदीला पकडला असला तरी त्याच्याविरुद्ध एकही गुन्हा किंवा तक्रार नोंद नाही. त्यामुळे त्याला गावगुंड म्हणायचे कसे असा सवाल पोलिसांपुढे आहे. याचसोबतच नाना पटोले यांनी कोणत्या मोदी विषयी भाष्य केले हा देखील संशोधनाचा विषय आहे. पालांदूर पोलिसांनी उमेश घरडे यांची चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविला आहे.
काय म्हणाले होते नाना पटोले?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मागच्या आठवड्यात प्रचार संपल्यानंतर काही कार्यकर्त्यांशी बोलताना "मी मोदीला मारूही शकतो, व शिव्याही देऊ शकतो" असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटले होते. नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध हे अक्षेपार्ह विधान केल्याचे म्हणत भाजपने पटोलेंच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी केली. नागपूरमध्ये त्यासाठी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन देखील झाले.
मात्र यानंतर नाना पटोले यांनी यु-टर्न घेत "मी देशाच्या पंतप्रधानांविषयी बोललो नाही तर 'मोदी' नावाच्या गावगुंडा विषयी बोललो" असे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर भाजपने संबंधित गुंड मोदीला समोर आणण्याचे आव्हान पटोलेंना दिले होते. तसेच भंडारा पोलिसांनाही यामुळे गुंड मोदी पकडण्याचे काम लागले होते. मात्र भंडारा पोलिसांनी आता अथक प्रयत्नांनंतर त्या गावगुंड मोदीला पकडले असून चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठांना पाठविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.