Nana Patole : नाना पटोलेंमुळे कडूबाई खरातांना मिळाले हक्काचे घर

Nana Patole : लोकगायिका कडूबाई खरात यांचे घर अतिक्रमणात तोडल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये हक्काचे घर मिळवून दिले, ज्यामुळे त्या बेघर अवस्थेतून बाहेर पडल्या.
nana patole helps folk singer kadubai kharat
Nana patole
Updated on

महाराष्ट्राला लोकसंगीताची जुनी परंपरा लाभलेली आहे. यात विविध प्रकारच्या लोकसंगीताचा समावेश होतो. त्यात प्रामुख्याने गोंधळ, भारूड, भजन, लावणी आणि कोळीगीते आहेत. लोकगीते हा लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. ओव्यांपासून, अंगाई गीतांपर्यंत सगळ्या गोष्टी यात येतात. दैनंदिन जीवनात विरंगुळा मिळावा यासाठी लोकगीते आणि कार्यक्रमांमधून नृत्य, संगीत, नाट्य या गोष्टी पुढे येऊ लागल्या.

लोक पिढ्यानपिढ्या आपल्या लोकपरंपरेचे जतन करत आले आहेत. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही कला जाऊ लागली आणि पुढे प्रगती होत या कलांना एक रूप आले. यांचे कार्यक्रम गावागावात लोकांच्या मनोरंजनासाठी, जनप्रबोधनासाठी होऊ लागले.

तमाशा हा त्यापैकीच एक प्रकार आहे. पूर्वी या प्रकाराला फक्त मनोरंजनाचे स्वरूप होते. पण पुढील काळात याचेच रूपांतर 'आंबेडकरी जलशात' झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक विषमतेविरोधात बंड पुकारून तथाकथित मनुवादी समाजाला धडा शिकवला. बुरसटलेले विचार, रूढी, परंपरा यांना छेद देत त्यांनी नव्या महाराष्ट्राची उभारणी केली.

बाबासाहेबांच्या विचारांनी आणि आंदोलनांनी प्रेरित होऊन अनेक कार्यकर्ते, समाजसुधारक आणि लोककलावंत आंबेडकरी चळवळीकडे आकर्षित झाले. तमाशाचे स्वरूप पूर्णपणे बदलले. आंबेडकर जलशाचे स्वरूप सामान्य तमाशासारखेच होते. फरक एवढाच होता की तमाशात गणेशाला वंदन केले जायचे तर गणेशाऐवजी भीमरावांना वंदन करणारे वंदनगीत सादर करून आंबेडकरी जलसा उभा राहायचा. तमाशातील कलाकार आंबेडकरवादी विचारांचा प्रसार व प्रचार करू लागले.

या चळवळीत अनेक लोक एकत्र येऊ लागले आणि गल्लोगल्लीत आंबेडकरी जलशाचे कार्यक्रम होऊ लागले. १९९० नंतर आलेल्या जागतिकीकरणाने नवीन प्रश्न व नवीन आव्हाने आणली. नवीन समस्या दलित समाजापुढे उभ्या राहिल्या. अशा दुःखी आयुष्याला सकारात्मक दृष्टीने कसं बघायचं याचं सूत्र सांगणारा हा जलसा असतो.

अशाच वातावरणात लहानाची मोठी झालेली लोकगायिका म्हणजे कडूबाई खरात. कडूबाई खरात यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आईवडिलांचे बरेच वय झाले होते. त्यांनी कडूबाईंच्या जन्माआधी दोन अपत्ये गमावली होती. त्यामुळे त्यांचे नाव कडूबाई ठेवण्यात आले. लहान असताना कडूबाई आपल्या वडिलांसोबत जलशाच्या कार्यक्रमाला जात असत. "वडिलांचे गाणे ऐकूनच मी गाणे शिकले," असे कडूबाई सांगतात.

त्याचे लग्न झाल्यानंतरही नवऱ्याला घरजावई करून घेऊन त्या आई वडिलांना सांभाळत संसार करत होत्या. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांच्या पतीच्या निधनाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला आणि पाठोपाठ त्यांच्या आईवडिलांच्या मृत्यूचे दुःख ओढवले. कडूबाई आपल्या तीन मुलांसह एकट्या पडल्या. मुलांचे आणि स्वतःचे पोट भरण्यासाठी त्यांनी एकतारा हाती घेतला व बाबासाहेबांना आपले दैवत मानून त्यांनी गाणे गाऊन भिक्षा मागायला सुरूवात केली.

बाबासाहेबांबद्दल कडूबाईंना खूप आदर आहे. "बाबासाहेब नसते तर माझी मुले आणि मी मेलो असतो," अशा शब्दांत त्या बाबासाहेबांचे त्यांच्या आयुष्यातले महत्त्व सांगतात. छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ गायरान जमिनीवर पत्र्याच्या घरात कडूबाई खरात राहत होत्या.

त्याच्या घरात त्यांची मुले, फक्त एक पलंग आणि एकतारी एवढाच त्यांचा संसार होता. त्यांची चूलदेखील घराबाहेर मांडलेली होती. त्यांचे पत्र्याचे हे घर महानगपलिकेच्या अतिक्रमणात तोडण्यात आले आणि त्या पुन्हा बेघर झाल्या. अशाच परिस्थितीत त्या मागासवर्गीयांसाठी आयोजित एका कार्यक्रमात गेल्या असता त्यांची भेट महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी झाली.

कडूबाई यांनी नाना पटोलेंना आपली समस्या सांगितली. पटोलेंनी त्यांची सगळी अडचण ऐकून घेऊन त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्याचे आश्वासन दिले. अवघ्या दोन महिन्यांतच पटोले यांनी कडूबाई खरात यांच्यासाठी छ्त्रपती संभाजी नगरमध्ये घर आणि संसारोपयोगी वस्तूंची सोय करून दिली. कडूबाईंच्या गृह प्रवेशाच्या वेळी नाना पटोले व अनेक मंत्रीमंडळातील लोक उपस्थित होते. कडूबाईंना गृहप्रवेश करताच आनंदाश्रू आवरेनात. त्यांनी नाना पटोले यांना मनापासून धन्यवाद देत त्यांचे आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.