Nana Patole: महायुतीकडून महामानवांचा अवमान ठरवून होतोय का ?

Maharashtra Congress: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.
Nana Patole President Maharashtra Pradesh Congress Comittee
Nana Patole Slams MahayutiEsakal
Updated on

देशातील सर्व राज्यांच्या नावांवर एक नजर टाकली तर असे एकमेव राज्य आहे ज्याच्या नावात राष्ट्र आहे ते म्हणजे महाराष्ट्र. या राज्याला राष्ट्राची उंची देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी आणि त्यांच्या पुरोगामी विचारांनी केले.

अशा महामानवांच्या विचारांनी राज्याला पुढे नेण्याची गरज असताना गेल्या १० वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपकडून त्यांचा नेहमी अपमान झाला आहे. यातील सर्वात ताज्या दोन घटना म्हणजे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची आणि नाशिकमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांच्या पुतळ्यामधून “गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले” या दोन ओळी नाहीशा होणे या आहेत. संपूर्ण देशाचे आदर्श असणाऱ्या या महामानवांचा भाजप पक्षाकडून, त्यांच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून अपमान होण्याच्या या घटना बरेच काही सांगतात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय असलेले भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. “समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?” असे वक्तव्य करून कोश्यारी यांनी तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या होत्या. यावर माफी मागणे तर दूरच, कोश्यारी यांनी स्वत:चे विधान प्राथमिक माहितीच्या आधारे होते अशी सारवासारव केली. कोश्यारी फक्त शिवाजी महाराजांचा अपमान करून शांत बसले नाहीत. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचे लग्न झाले तेव्हा त्यांचे वय अनुक्रमे 13 आणि 10 वर्षांचे होते. त्या वयात मुलगा मुलगी काय करतात, असे कोश्यारी म्हणाले होते. राज्यपाल पदावर असताना कोश्यारी यांनी पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा अपमान केला. मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बोलताना- “शिवाजी तर जुन्या काळातील आदर्श आहेत,” असा उल्लेख कोश्यारी यांनी केला होता. भाजपमध्ये असलेल्या सर्वोच्च पदावरील नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत हा अपमान सुरूच आहे.

महामानवांच्या या अपमानाचा एक अंक राज्याने आणि देशाने पाहिला तो २६ ऑगस्ट २०२४ रोजी होय. मालवण येथील राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करून ४ डिसेंबर २०२३ रोजी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर अवघ्या ८ महिन्यात तो कोसळला. महाराजांचा यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो? या पुतळ्याच्या उभारणीसाठी पाच कोटी रूपये इतका निधी खर्च करण्यात आला होता. महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील महायुतीच्या नेत्यांना माफी मागण्यासाठी देखील काही दिवस लागले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर हा पुतळा नौदलाने बांधला होता असे सांगत जबाबदारी झटकली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेत झालेला भ्रष्टाचार आणि राजकारण यावर जोरदार प्रहार केला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे जे डोके होते त्यात शिल्पकार जयदीप आपटेने कागद आणि कापड भरले होते असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला. पेशवाईच्या काळात जसा छत्रपती शिवरायांचा अपमान केला जात होता तसाच अपमान आता या महायुती सरकारने केल्याचे नाना पटेले म्हणाले. हा पुतळा उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने घाई केली. राज्यातील सरकारकडून महाराजांचा हा झालेला जाणू्नबुजून अपमान आहे. कोट्यवधी खर्च करून पुतळा फक्त ८ महिन्यात कोसळत असेल तर ही फक्त मूर्तीकाराची चूक नाही. ज्या व्यक्तीला हे काम देण्यात आले तो संघाचा माणूस होता. अनुभव नसलेल्या व्यक्तीला हे काम देण्यात आल्याची टीका नाना पटोले यांनी केली.

त्यानंतर अलीकडेच नाशिकमध्ये मोठ्या दिमाखदार कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. परंतु त्यात असलेल्या शिलालेखावर “गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले” या ओळीच नसल्याचे दिसून आले. हा पुतळा बनवला तेव्हा यातल्या ओळी नीट तपासण्याची जबाबदारी कोणाची होती? ज्यांनी ही जबाबदारी नीट पार पाडली नाही त्यांच्यावर काय कारवाई झाली? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत जनतेची क्षमा का मागितली नाही? सामान्य बहुजन समाजाचा हा असा अपमान, महापुरूषांचा वारंवार होणारा अपमान ठरवून केला जात असल्याची शंका आहे, असे नाना पटोले यांना वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.