मुंबई : साधारण १८७०च्या सुमारास मुंबईतील गिरण्या मँचेस्टरच्या गिरण्यांशी स्पर्धा करू लागल्या होत्या. त्यामुळे मुंबईच्या गिरण्यांवर निर्बंध घालण्याच्या दृष्टीने त्यांना फॅक्टरी अॅक्ट लागू करण्याची मागणी जोर धरू लागली.
सरकारने १८७५ साली नेमलेल्या आयोगात गिरण्यांचे मालक आणि संचालक होते. या सर्वांमध्ये चर्चा झाल्यानंतर फॅक्टरी अॅक्टचे विधेयक सरकारपुढे मंजुरीसाठी आली.
कामाच्या तासांवर मर्यादा घालण्याची तरतूद या विधेयकात असल्याने यामुळे गिरण्यांचे आणि कामगारांचे नुकसान होईल असा नाराजीचा सूर उमटू लागला. (narayan meghaji lokhande leader of mill workers labour movement )
याच काळात ९ मे १८८० रोजी दीनबंधू वृत्तपत्र सुरू झाले. नारायण मेघाजी लोखंडे हे त्याचे संपादक होते. लोखंडे यांना गिरणीतील कामाचा अनुभव असल्याने त्यांना गिरणी कामगारांची अवस्था माहीत होती.
त्यांनी वृत्तपत्रीय लेखनाच्या माध्यमातून गिरणी कामगारांना संघटित करायला सुरुवात केली. १८८१ साली फॅक्टरी अॅक्ट अस्तित्त्वात आला.
या कायद्यानुसार लहान मुलांना कामावर घेण्याचे वय ७ वर्षे होते. लोखंडे यांनी त्याला विरोध करत ते १६ वर्षे असावे असे सुचवले. नोकरीमुळे शिक्षण सोडावे लागणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था सरकारने करावे, गिरणी कामगारांचा पगार वाढवावा अशा मागण्या केल्या.
लोखंडे यांनी कामगारांना संघटित करून १८८४ साली 'बॉम्बे मिल हॅण्ड्स असोसिएशन' ही देशातील पहिली कामगार संघटना सुरू केली. २३ सप्टेंबर १८८४ रोजी परळच्या सुपारीबाग येथे गिरणी कामगारांची पहिली ऐतिहासिक सभा झाली.
४ हजार कामगारांच्या या सभेत लोखंडे यांनी कामगारांसाठी साप्ताहिक सुट्टीची मागणी केली. महिन्याच्या १५ तारखेला पगार व्हावा, कामावरून काढण्याआधी १५ दिवसांची पूर्वसूचना द्यावी, फॅक्टरी कमिशनवर कामगार प्रतिनिधी असावेत, अशा मागण्या केल्या.
१८८७मध्ये कुर्ल्याच्या स्वदेशी मिलमधील कामगारांनी संप केला. बहुतांश गिरणी कामगार खंडोबाचे भक्त असून रविवार हा खंडोबाचा वार असल्याने साप्ताहिक सुट्टी रविवारीच असावी ही मागणी लोखंडे यांनी लावून धरली.
२४ एप्रिल १८९० रोजी रेसकोर्सवर सुमारे १० हजार कामगारांची भव्य सभा झाली आणि जनमताचा हा वाढता रेटा पाहून अखेर १० जून १८९० रोजी रविवारची साप्ताहिक सुट्टी मंजूर झाली. १३० वर्षांपूर्वी कामगारांनी केलेल्या या संघर्षाचे फळ म्हणून आपण आज रविवारच्या सुट्टीचा उपभोग घेऊ शकत आहोत.
लोखंडे यांनी फक्त कामगारांसाठीच काम केले असे नाही. समाजकारणात त्यांचा विविधांगी वावर होता. विधवा महिलांच्या केशवपनालाही त्यांनी विरोध केला.
अखेर ९ फेब्रुवारी १८९७ रोजी वयाच्या ४८व्या वर्षी लोखंडे यांचे ठाणे येथे प्लेगने निधन झाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.