मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नवाब मलिक बाहेर पडत आहेत. कोर्टाने त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन दिला असून पासपोर्ट जमा करुन घेतला आहे.
किडनीच्या आजाराने त्रस्त असलेले नवाब मलिक हे मागील अनेक महिन्यांपासून कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार घेत आहेत. गोवावाला कंपाऊंडमधील मनी लँडरिंगप्रकरणी नवाब मलिकांना ईडीने 23 फेब्रुवारी 2022 ला अटक केली होती. नवाब मलिकांना 11 ऑगस्टला जामीन मंजूर झाला आहे.
नवाब मलिकांवर नेमके आरोप काय?
1993 बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली खान आणि हसीना पारकर यांचा जवळचा व्यक्ती सलीम पटेल यांचे नवाब मलिकांशी व्यवसायिक संबंध असल्याचा आरोप मलिकांवर आहे. तसेच नवाब मलिक यांच्या नातेवाईकांच्या कंपनीला त्या दोघांनी करोडोची जमीन कवडीमोल भावाने विकल्याचा आरोप आहे.
दाऊद नंतर हसीना पारकर प्रॉपर्टी खरेदी करत होत्या आणि त्यामधे पावर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल यांना लावत होत्या. तीच प्रॉपर्टी नवाब मलिक यांच्या नातेवाईकांनी खरेदी केली, हा गंभीर आरोप मलिकांवर आहे. या प्रकरणी ईडीने त्यांच्यावर कारवाई केली होती.
यासह कुर्ला येथील एलबीएस रोडला असलेल्या गोवा कंपाऊंड येथील करोडोची साडेतीन एकर जमीन 20 ते 30 लाखांत मलिकांच्या नातेवाईकांना दिल्याचं प्रकरण आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना फेब्रूवारी २०२२ मध्ये नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दीड वर्षानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. अजित पवार गटाच्या बंडानंतर नवाब मलिक यांच्या सुटकेच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर मलिकांना प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर झाला.
जामीन दिला, अटी फार...
नवाब मलिकांना जामीन देताना कोर्टाने काही अटी घालून दिल्या आहेत. मालिक यांना ५० हजारांच्या वैयक्तिक बाँडवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मलिक यांच्या प्रकरणातील साक्षीदार व अधिकारी यांच्याशी संपर्क ठेवायचा नाही.
त्याचबरोबर मलिक यांच्याशी संपर्क होईल तो नंबर ईडीच्या अधिकाऱ्यांना दिला जावा. तसेच मलिकांचा पासपोर्ट ईडीकडे जमा करण्याची अट देखील घातली आहे. त्याचबरोबर कुठल्याही माध्यमाशी संवाद साधायचा नाही, अशी अट देखील घालण्यात आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.