मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एएनआयला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं चूक होतं. घरातलाच सदस्य पडला आहे. कुटुंबाच्या दृष्टीने सुनेत्रा यांना तिकीट देणं योग्य नव्हतं, असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला. माझ्या कबुलीबद्दल स्पष्टीकरण देण्यास कोणीही सांगितलं नाही, असंही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीवेळी मी काही बोलून गेलो. शरद पवार हे तेव्हा आमचे प्रमुख नेते होते. त्यामुळे मला त्यांच्यावर टीका केल्याची खंत नक्कीच वाटते. लोकांना देखील त्यांच्यावर टीका केल्याचं आवडत नाही. लोक त्यांना एक मोठे, प्रमुख नेते म्हणून पाहतात. आम्ही त्यांना मान देत होतो, पुढेही मान देत जाऊ. मी त्यांच्यावर टीका करणारं काहीही बोलणार नाही, असं अजित पवार म्हणाले.
संविधानाबाबत फेक नॅरिव्ह समोर आणण्यात आला होता. कोणीही संविधानाला हात लावणार नाही. चंद्र, सूर्य असेपर्यंत घटनेला हात लावला जाणार नाही. लोकसभेमध्ये ४०० चा नारा देण्यात आला होता. अशाप्रकारे लोकांच्या मनात संशय निर्माण करण्यात आला. त्याचा फटका बसला. कारण, यांना ४०० कशासाठी हव्या आहेत, असा लोकांना प्रश्न पडला होता, असं अजित पवार म्हणाले.