केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक होताना पाहायला मिळतं. नितीन गडकरी हे राजकारणात अजातशत्रू व्यक्तीमत्व मानलं जातं. मात्र गडकरी यांना जाणूनबुजून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची शंका राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.
'कॅग'च्या अहवालात मोदी सरकारकडून राबवण्यात आलेल्या सहा योजनांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. या सरकारच्या सहा योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये नितीन गडकरींच्या खात्यावर देखील अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. या आरोपानंतर नितीन गडकरी यांना मागे खेचण्याचा प्रयत्न होत असल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहे.
"केंद्र सरकारची एकमेव जमेची बाजू आणि सर्वाधिक कार्यक्षम मंत्रालय म्हणजे आदरणीय नितीन गडकरी साहेबांचं रस्ते निर्माण मंत्रालय. सध्याच्या केंद्र सरकारमधील कुठला मंत्री सर्वाधिक आवडतो, असा प्रश्न देशातल्या नागरिकांना केला तर प्रत्येकाचं उत्तर नितीन गडकरी हेच असेल, यात कुठलीही शंका नाही." असे रोहित पवार म्हणाले आहेत.
"कॅग अहवालाच्या बातम्या वाचनात आल्या असल्या तरी याचा विस्तृत अभ्यास केलेला नाही, परंतु कॅग अहवालाच्या निमित्ताने केवळ गडकरी साहेबांच्या विभागावर लक्ष केंद्रित करून त्यांना जाणूनबुजून अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे, असं वाटतं." असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
"शेवटी मराठी माणसाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न दिल्लीत होणारच आहे. केंद्र सरकारच्या अपयशी कारभारामुळं येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपा विजयी होणार नाही हे स्पष्ट असून त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास गडकरी साहेब सर्वाधिक पसंतीचा चेहरा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्पूर्वीच त्यांचा पत्ता कट करुन त्यांना दूर सारण्याचा तर हा कट नाही ना, अशी शंका येते." असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
"असो! महाराष्ट्र भाजपा गडकरी साहेबांसोबत असेल की नाही हे माहीत नाही, परंतु विकासाची दूरदृष्टी असलेल्या गडकरी साहेबांसोबत मराठी माणूस म्हणून मी नक्कीच उभा राहीन!" असेही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.