राज्यातील सत्ताधारी आघाडीविरोधातील नाराजी हा लोकसभा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी जिथे जिंकण्याची शक्यता तिथे त्या पक्षाला संधी हे महाविकास आघाडीचे धोरण ठरले आहे. जागावाटप चर्चांना अद्याप प्रारंभ झाला नसला तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने १६ लोकसभा मतदारसंघात निर्णायक ताकद असल्याचा निष्कर्ष काढला असून या जागांबाबत आग्रही भूमिका घेतली जाणार आहे.
बारामती, बीड, हातकणंगले, कोल्हापूर, रावेर, सातारा, सांगली, भंडारा, ईशान्य मुंबई, माढा, शिरूर आणि मावळ आणि अहमदनगर या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबाबत अत्यंत सकारात्मक वातावरण आहे. तेथे पक्षाला यश मिळू शकेल अशी चिन्हे आहेत. मराठवाड्यातील बीडबरोबरच परभणी तसेच छत्रपती संभाजीनगरची चाचपणीही केली जाणार आहे. विदर्भातील पक्षाची ताकद पुन्हा अजमावून पाहण्यात येणार आहे. अहमदनगर आणि पुणे येथे निवडणूक लढविण्याची मागणी काँग्रेसकडे करावी का?, याबाबत परिस्थिती पडताळून पाहिली जाणार आहे.
अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील परिस्थिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी अधिक अनुकूल
झाल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाचा निकाल कसाही असला तरी शरद पवार यांच्याबाबत सहानुभूती निवडणुकीचे चित्र बदलवणारी ठरेल, असे एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे.
रावेरमधून खडसे यांना संधी
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे रावेर येथून लढण्यास तयार असले तर त्यांना संधी दिली जाईल. अन्यथा दुसऱ्या नावांचाही विचार होऊ शकेल. सातारा लोकसभा मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांनाच पुन्हा संधी दिली जाणार असल्याची दाट शक्यता आहे. सांगली येथेही पक्षाकडे चांगला चेहरा आहे. काँग्रेस -शिवसेनेच्या उद्धव ठाकर गटाशी योग्य चर्चा झाल्यानंतर ते नाव घोषित होईल, असे सांगण्यात आले.
अजित पवार गटाची २१ला बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक येत्या २१ रोजी मुंबईत होणार आहे. ही बैठक दिवाळीपूर्वीच होणार होती. मात्र, अजित पवार यांची प्रकृती बरी नसल्याने बैठक पुढे ढकलली होती. दिवाळी झाल्यानंतर आता बैठकीचे आयोजन ठरवले गेले आहे. दिल्लीत भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यान अजित पवार गटाने सत्तेतील न्याय्य वाटा मिळवून द्यावा, अशी मागणी केल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार समाधानकारक निधी मिळत नसल्याची तक्रार करत आहेत. या आमदारांना नेमके काय म्हणायचे आहे ते समजून घेणे अन् त्या तक्रारींची दखल घेत काही सुधारणा सुचविणे हा बैठकीचा उद्देश असल्याचे पक्षातर्फे अनौपचारिकपणे सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.