सोलापूर विमानतळावर नाही नाईट लॅण्डिंग! प्रचाराला येणारे 'व्हीआयपी' दिवस मावळण्यापूर्वीच करतात उड्डाण; सूर्यास्तानंतर विमान उड्डाणास नाही परवानगी; विमानाला तासाला 2.50 ते 6 लाखांचे भाडे

सोलापूर विमानतळ पुन्हा एकदा सेवेसाठी सज्ज झाले आहे, पण विमानतळावर नाईट लॅण्डिंगची सोय नाही. त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी आलेल्या व्हीव्हीआयपी, व्हीआयपी नेत्यांसह, काही कामानिमित्त आलेल्या उद्योजकांना दिवस मावळण्यापूर्वीच सोलापुरातून उड्डाण करावे लागत आहे. थोडा जरी उशिर झाला तर मुक्कामच करावा लागतो.
solapur airport
solapur airportsakal
Updated on

सोलापूर : येथील विमानतळ पुन्हा एकदा सेवेसाठी सज्ज झाले आहे, पण विमानतळावर नाईट लॅण्डिंगची सोय नाही. त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी आलेल्या व्हीव्हीआयपी, व्हीआयपी नेत्यांसह, काही कामानिमित्त आलेल्या उद्योजकांना दिवस मावळण्यापूर्वीच सोलापुरातून उड्डाण करावे लागत आहे. थोडा जरी उशिर झाला तर मुक्कामच करावा लागतो. सूर्य मावळल्यानंतर गेल्यावर विमानतळावरून उड्डाणास परवानगी नसल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सध्या रणधुमाळी सुरू असून सभेच्या निमित्ताने आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर हे वरिष्ठ नेते सोलापुरात विमानाने येऊन गेले. आता १६ नोव्हेंबरला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि त्याच दिवशी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची तर १७ नोव्हेंबरला तेलंगणाचे मुख्यमंत्री अनुमुला रेवंत रेड्डी यांची सोलापुरात सभा होणार आहे. याशिवाय देखील अन्य काही बड्या नेत्यांच्या सभा आगामी चार दिवसांत होण्याची शक्यता आहेत. पक्षाचे स्थानिक नेते त्यांच्या तारखा उपलब्ध करून घेण्यात व्यस्त आहेत. सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोरील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात देखील चार हेलिपॅड आहेत.

सोलापुरात उतरू शकतात एकाचवेळी चार विमाने

मार्ग निश्चित नसल्याने सोलापुरातील होटगी रोड विमानतळावरून अद्याप नियमित सेवा सुरू झालेली नाही. सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देश व राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांची विमाने सोलापुरात येत आहेत. एकावेळी सोलापूर विमानतळावर चार विमाने उतरू शकतात, एवढी क्षमता आहे. एका तासासाठी विमानतळावर उतरलेल्या विमानास अडीच ते सहा लाखांपर्यंत भाडे असते. दरम्यान, आगामी काळात सोलापूर विमानतळावरून सेवा सुरू होण्यासाठी मार्ग निश्चित करताना नाईट लॅण्डिंगचाही प्रश्न सोडवावा लागेल.

ॲड. आंबेडकरांना करावा लागला मुक्काम

नाईट लॅण्डिंगची सोय नसल्याने सोलापुरात प्रचारसभांसाठी आलेल्या व्हीव्हीआयपी, व्हीआयपी नेत्यांच्या विमानांना सूर्यास्तापूर्वीच उड्डाण करावे लागत आहे. मंगळवेढ्यातील सभेसाठी आलेले ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे यांना त्याच दिवशी अमरावतीला सभेसाठी जायचे होते. सोलापूर विमानतळावर नाईट लॅण्डिंगची सोय नसल्याने आणि अमरावती विमानतळावरही अशीच स्थिती असल्याने पावणेपाच वाजताच त्यांनी सोलापुरातून उड्डाण केले. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मंगळवारी (ता. १२) सभा संपल्यावर लगेचच विमानतळ गाठावे लागले. त्यांनी पावणेसहाच्या सुमारास (दिवस मावळण्यापूर्वी) उड्डाण केले. तत्पूर्वी, वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विमानाने सोलापुरात आलेले पक्षप्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनाही नाईट लॅण्डिंगअभावी मुक्काम करावा लागला होता. उद्धव ठाकरे यांनाही मंगळवारी त्यामुळेच सोलापुरात मुक्कामी थांबावे लागले.

वरिष्ठ नेत्यांच्या आणखी सभा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नियोजित सोलापूर दौरा वेळेअभावी रद्द झाला आहे, पण पुढील तारीख मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. १६ नोव्हेंबरला सकाळी जुळे सोलापुरातील भंडारी मैदान येथे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची सभा होणार आहे. तसेच आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याच दिवशी सायंकाळी शहरातील तिन्ही मतदारसंघात पदयात्रा निघणार आहे.

- नरेंद्र काळे, शहराध्यक्ष, भाजप, सोलापूर

--------------------------------------------------------------------------------------------------

विमानतळावर एकाचवेळी चार विमाने उतरू शकतात

सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी सोलापूर विमानतळावरून विमान उड्डाणास परवानगी आहे. सूर्यास्तानंतर विमान उड्डाणास परवानगी नाही. सोलापूर विमानतळावर एकाचवेळी चार विमाने उतरू शकतात.

- चंद्रेश वन्झरा, विमानतळ अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.