मुंबई पालिका आयुक्त इकबाल चहल यांचे स्पष्ट मत
मुंबई: लोकल ट्रेन संदर्भात सुरू असलेल्या गेल्या अनेक दिवसांपासूनच्या मागणीला अखेर न्याय मिळाला. मुंबईतील लोकल सेवा स्वातंत्र्यादिनापासून सर्वसामान्यांसाठी सुरु होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. "लोकल सेवा १५ ऑगस्टपासून सुरु होईल. मात्र, ही सुविधा फक्त दोन डोस घेतलेल्यांसाठी आणि त्याला १४ दिवस पूर्ण झाले असलेल्यांसाठीच उपलब्ध असेल. तसेच, यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पद्धतीचे पास मिळतील", असे ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे मुंबई पालिका आयुक्तांनी स्वागत केले. त्याचवेळी त्यांनी एक सूचक वक्तव्यदेखील केले.
"मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी नक्कीच मिळेल. पण लस न घेतलेल्या लोकांना मात्र कोरोना संकट जाईपर्यंत लोकल प्रवास करता येणार नाही. दोन डोस घेतलेल्यांनाच मॉल, रेस्टॉरंटमध्येही प्रवेश देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे लसीकरणासाठी पुढाकार घ्या", असं स्पष्ट वक्तव्य मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले.
"लसीकरण सर्टिफिकेटवरील नंबरच्या आधारे ऑनलाईन पासची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुंबईसह एमएमआर परिसराचाही यासाठी विचार केला जाईल. लोकांची गैरसोय होवू नये, यासाठी वॉर्ड ऑफिसमध्येही ऑफलाईन पद्धतीने पास मिळतील. लसीकरणाची संख्या रोज वाढत आहे. त्यामुळे पास सिस्टीम ही रेग्यूलर प्रोसेस म्हणून सुरू राहिल", अशी माहिती त्यांनी दिली.
"खाजगी रूग्णालयांमधील शिल्लक लसींचा उपयोग सीएसआरमार्फत लसीकरणासाठी वापरला जात आहे. रोज आम्हाला २५ ते ३० हजार लस प्राप्त होत असल्या तरी रोज मुंबईत १ लाख लसीकरण होतंय. यात खाजगी रूग्णालयांचाही वाटा मोठा आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्टय आहे. दोन्ही डोस पूर्ण करण्याचे हे लक्ष्य आहे. तिसरी लाट थोपवण्याची मुंबईने पूर्ण तयारी केली आहे", असे चहल यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.