एसटी महामंडळाचे राज्यात ५८० पेक्षा जास्त बस स्थानके आहेत. त्यापैकी अनेक बस स्थानकांवरील चौकशी खिडकीतील दूरध्वनी सेवा बंद असल्याचे वास्तव आहे.
कऱ्हाड : एसटी वेळेवर मिळत नाही, एसटीच्या फेरी अचानक रद्द केली जाते, रस्त्यातच एसटी बस (ST Bus) बंद पडते, एसटीच्या आरक्षणासंदर्भात योग्य ती माहिती मिळत नाही, एसटीच्या फेऱ्या वेळेत सोडल्या जात नाहीत यासह अशा अनेक तक्रारी एसटी बससंदर्भात वाढल्या आहेत.
त्यावर तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळाने विविध पातळ्यांवर प्रयत्न केले. मात्र, त्याला अपयशच येत होते. त्यावर आता एसटी महामंडळ (ST Corporation) प्रशासनाने एसटीच्या त्या-त्या आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे, मोबाईल नंबरच बस स्थानकात लावण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता प्रवाशांच्या तक्रारीचा निपटारा जागेवरच केला जाणार आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाकडून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या बससेवेत अनेक गैरसोयी निर्माण होत आहेत. एसटी महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या एसटी बस या अनेक वर्षांपूर्वीच्या आहेत.
त्यातील बहुतांश बसचे रिपासिंग करून त्या वापरण्यात येत आहेत. त्यातच एसटी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना ५० टक्के सवलत यासह अनेक पुरस्कारप्राप्त नागरिक, महिला, खेळाडू, स्वातंत्र्यसैनिक आदींना सवलत दिली आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. मात्र, एसटी बसची संख्या आहे तेवढीच आहे.
उलट कालमर्यादेनुसार एसटी बसची संख्या कमी-कमी होत आहे. त्यातच उपलब्ध असलेल्या एसटी बसपैकी काही बस या नादुरुस्त असल्याने त्या दुरुस्तीसाठी ठेवाव्या लागतात. सुटीदरम्यान मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव यासह कोकणात जादा बस सोडाव्या लागतात. त्याचा फटका दैनंदिन बसफेऱ्यांवर होतो. त्यातच एसटीकडे नवीन बसची उपलब्धताच होत नाही. झाली तरीही ती प्रवाशांच्या तुलनेत हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच असते.
त्यामुळे एसटी बसच्या प्रवाशांना फेऱ्या रद्दच्या समस्येला सामोरे जावे लागते. अनेकदा एसटी बसच उपलब्ध नसल्याने, काही बस नादुरुस्त झाल्याने आणि काही बस या प्रवाशांच्या मागणीनुसार लांब पल्यासाठी पाठविल्यामुळे एसटीच्या दररोजच्या गावी होणाऱ्या फेऱ्या या रद्द कराव्या लागतात. अलीकडे रस्त्यातच एसटी बस बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळेही प्रवाशांची गैरसोय होते. यासह अन्य समस्यांना एसटीच्या प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.
त्याचा विचार करून एसटी महामंडळाच्या प्रशासनाने मध्यंतरी काही उपाययोजना केल्या. मात्र काही कालावधीनंतर पहिले पाढे पंचावन्न अशीच स्थिती झाली. त्यावर आता उपाय म्हणून प्रवाशांच्या तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यासाठी एसटीच्या त्या-त्या आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे आणि मोबाईल नंबरचा फलक बस स्थानकावर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगली सेवा मिळेल, अशी शक्यता आहे.
एसटी महामंडळाचे राज्यात ५८० पेक्षा जास्त बस स्थानके आहेत. त्यापैकी अनेक बस स्थानकांवरील चौकशी खिडकीतील दूरध्वनी सेवा बंद असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अडचणीदरम्यान ऐन वेळी कोणाशी संपर्क साधायचा? हा प्रवाशांसमोर प्रश्न असतो. त्याचबरोबर अनेकदा दूरध्वनी सुरू असूनही तो उचलण्यासाठी टाळाटाळ केली जाते. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर दिल्याने हा ही प्रश्न सुटणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.