Chhagan Bhujbal: खोट्या रितीने कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. जे कुणबी सर्टिफिकेट घेतील त्यांच्यावर नजर ठेवा, गावागावात हा लढा सुरू करा. सरकारने फक्त मतांसाठी हे करु नये मते आमच्याकडे देखील आहेत, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला.
ओबीसी आरक्षणाचा बचाव केला पाहिजे. तुमचं रक्त खवळलं पाहिजे, अशी भूमिका देखील आज पंढरपूर येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मांडली. यावेळी त्यांनी नाव न घेता मनोज जरांगेवर देखील हल्लाबोल केला.
छगन भुजबळ म्हणाले, आज चित्र बदललेलं आहे, संदर्भ बदललेले आहेत, अन्याय करणारे बदललेले आहेत. आपण सर्वांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्यावर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात उभं रहावं लागेल, एकमुखाने बोलावं लागेल. जेसीबीने फुले उधळत आहेत. हेलिकॉप्टरने फुले उधळतात हे गरीब आहेत का? यात एकाचा मृत्यू होतो त्याची दखल पण घेत नाहीत.
आता तो ओबीसी आयोग आहे की मराठा समाज आयोग आहे या बदल मला शंका आहे. मात्र मी ठामपणे सांगतो मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही. मराठा आरक्षणाच्या नावाखाली झुंडशाही सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज मराठा सैनिक कधी म्हणत नव्हते ते मावळे म्हणत होते. कारण महाराजांकडे सगळ्या जातीचे मावळे होते, असे छगन भुजबळ म्हणाले.
आरक्षण हे श्रीमंत आणि गरीब यावर नाही आहे. आरक्षण मिळालं म्हणून कुणी श्रीमंत झालं नाही. सामाजिक दृष्टीने तुम्ही किती मागास आहे त्यावर आरक्षण असतं. मी मंत्रीपद आणि आमदारकीची पर्वा करत नाही. आपल्या लोकांवर हल्ले करा हे शिवाजी महाराजांनी तुम्हाला शिकवलं का?, असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.
भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्र्यांना सुद्धा एकच सांगायचे आहे की, ओबीसीमधून आरक्षण मागणे चूक आहे, हल्ले करणे चूक आहे. अनेकांना मारहाण झाली, दगडफेक झाली हे चूक आहे. शासनाला धमकी देणे चूक आहे. ज्या पद्धतीने आरक्षण मागताहेत ते देखील चुकीचे आहे असे त्यांना (मराठा समाज) सांगा.
छगन भुजबळ यांनी नाव न घेता मनोज जरांगे यांना इशारा दिला. धमकी मला देऊ नये. मला चप्पल मारली तर माझ्या पायात बुट आहेत. आम्ही नामर्द नाही, असे भुजबळ म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.