सोलापूर : अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर पडण्याची धडपड करणाऱ्या शेतकऱ्याच्या कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याची स्थिती आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ३०) १७० गाड्या कांद्याची आवक होती. पण, प्रतिक्विंटल साडेबाराशे ते २९०० रुपयांचाच भाव मिळाला. बाजारात अजूनही जुन्या कांद्याचीच आवक जास्त असल्याने त्याला उठाव नाही.
नाशिक (लासलगाव) बाजार समितीनंतर सर्वाधिक कांद्याची उलाढाल होणारी बाजार समिती म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील ६४ लाख क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. सततच्या पावसामुळे जमिनीतील ओलावा लवकर हटला नाही. त्यामुळे पेरणी, कांदा लागवड उशिराने झाली. नवीन कांदा बाजारात खूपच कमी असून डिसेंबरअखेरीस नवीन कांद्याची आवक वाढेल, असा अंदाज आहे. सध्या बाजारात जुना कांदा मोठ्या प्रमाणावर येऊ लागला आहे. त्यातही खराब कांदा जास्त आहे. कर्नाटक भागातून काही प्रमाणात नवीन कांदा सोलापूर बाजार समितीत येत आहे. त्याला अडीच ते तीन हजारांपर्यंत भाव मिळत आहे. परंतु, जुन्या कांद्याचा भाव खूपच कमी असून सरासरी एक हजार २५० रुपयांचाच दर शेतकऱ्यांना मिळत आहे. अशी स्थिती राज्यभर सर्वत्रच पहायला मिळते. नवीन कांदा बाजारात आल्यानंतर भावात सुधारणा होईल, असा विश्वास बाजार समिती प्रशासनाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात २६ हजार ५४३ हेक्टरवर कांदा
जिल्ह्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लेट खरिपातील २६ हजार ५४३ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. प्रतिहेक्टरी १२ मे.टन कांदा उत्पादन होईल. जिल्ह्यात एकूण तीन लाख १८ हजार ५१३ मे.टन कांदा उत्पादित होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. तो कांदा डिसेंबर-जानेवारीत बाजारात येणार आहे. सध्या सोलापूर बाजार समितीत उरळी कांचन (पुणे), करमाळा (जेऊर), बीड येथून जुना कांदा मोठ्या प्रमाणावर येत आहे.
आवक वाढली, पण भाव जागेवरच
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती दिवाळीपूर्वी दररोज दोनशे-अडीचशे गाड्या कांदा आवक होती. आता पावणेदोनशे गाड्यांची सरासरी आवक आहे. जुना कांदा असल्याने उठाव नाही. सरासरी साडेबाराशे रुपयांपर्यंत दर असून चांगल्या नवीन कांद्याला तीन हजारांचा भाव मिळतोय.
- विनोद पाटील, कांदा विभागप्रमुख, सोलापूर बाजार समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.