सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात अडीच हजार रुपयांचा सरासरी भाव मिळणारा कांदा सध्या १८०० रुपये क्विंटल या दराने विकला जात आहे. कांद्याची आवक वाढल्याने दर कमी झाल्याचे बाजार समितीकडून सांगितले जात आहे. सोमवारी (ता. २८) बाजार समितीत ६२१ गाड्या कांदा आला होता. त्यासाठी सरासरी भाव अठराशे रुपये तर सर्वाधिक दर पाच हजार ६०० रुपयांपर्यंत मिळाला.
सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ३२ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला अनेकांनी कांदा लागवड केली होती, पण सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा जागेवरच खराब झाला. पावसामुळे ज्या शेतकऱ्यांना वेळेत कांदा काढता आला नाही, त्यांचा काळपट पडलेला कांदा २०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल या दराने विकला जात आहे.
सप्टेंबरमध्ये अनेकांनी पावसाचा अंदाज घेऊन कांदा लागवड केली आहे. तो कांदा नोव्हेंबरअखेर बाजारात विक्रीसाठी येईल, त्यावेळी आवक आणखी वाढणार आहे. सर्वाधिक भाव जरी पाच हजार ६०० रुपये असला, तरी तो अगदी थोड्या कांद्यासाठी मिळालेला असतो. मागील आठवड्याच्या तुलनेत सध्या कांद्याचा सरासरी भाव सातशे रुपयांनी कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढल्याची स्थिती आहे.
२० हजार रुपयेच मिळतात रोखीने
सोलापूर बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून अवघे २० हजार रुपये रोखीने दिले जातात. त्यांच्या विकलेल्या कांद्याची किंमत ५० हजार असो की एक लाख, तरीदेखील त्यांना १५ ते २० हजारांपर्यंतच रोखीने दिले जातात. धक्कादायक बाब म्हणजे, व्यापाऱ्यांकडून पणन कायद्यातील तरतुदी पायदळी तुडवून उर्वरित रकमेसाठी १५ ते २० दिवसांच्या मुदतीचा धनादेश दिला जातो.
वाहनांना मध्यरात्री एकनंतर कांदा मार्केटमध्ये प्रवेश
सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असून, शुक्रवारी ४०० तर शनिवारी (ता. २६) ५०३ आणि सोमवारी (ता. २८) ६२१ गाड्यांची आवक होती. या पार्श्वभूमीवर आता कांदा घेऊन येणाऱ्या वाहनांना रात्री १२ ते एकपर्यंत कांदा मार्केटमध्ये वाहने घेऊन जाऊ दिली जात नाहीत. तोवर त्यांना भुसार मार्केटमध्येच थांबावे लागते. पूर्वीचा शेतमाल उचलून जागा झाल्यावर मगच त्या वाहनांना तेथे सोडले जात आहे. सकाळी दहानंतर कांद्याचा लिलाव सुरू होतो, अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.