अनुदानासाठी ऑनलाइन नावनोंदणी  केवळ २३ रुपये ६० पैशांत!

अनुदानासाठी ऑनलाइन नावनोंदणी  केवळ २३ रुपये ६० पैशांत!
Updated on

ऑनलाइन अर्जासाठी (Online registration) वेगवेगळी पोर्टल्स असल्याने शेतकरी संभ्रमात पडतात. त्याचा फायदा दलाल-मध्यस्थ उचलतात. शेतकऱ्यांना (Farmer) कोणाच्याही मदतीशिवाय विविध योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधा मिळण्यासाठी एक ऑनलाइन पोर्टल कृषी विभागाने तयार केले आहे. त्यावर विविध योजना, अनुदानासाठी अर्ज करणे सोपे ठरणार आहे. 

केंद्र व राज्य सरकारच्या कृषी खात्यामार्फत (agriculture department)शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना व अनुदानासाठी लेखी किंवा ऑनलाइन अर्ज करण्याच्या अनेक पद्धती व पोर्टल्स आहेत. परिणामी शेतकरी संभ्रमात पडतात. त्यांच्या गोंधळाचा फायदा दलाल-मध्यस्थ उचलतात. हे टाळण्यासाठी कृषी खात्याचे सचिव एकनाथ डवले, उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी या समस्येचा बारकाईने अभ्यास केला. शेतकऱ्यांना कोणाच्याही मदतीशिवाय विविध योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधा मिळण्यासाठी एक ऑनलाइन पोर्टल कृषी विभागाने तयार केले आहे. कृषी आयुक्त धीरज कुमार व सहकारी या पोर्टलची उपयुक्तता वाढविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. या पोर्टलवर फक्त एकदाच नोंदणी केल्यानंतर शेतकरी वेगवेगळ्या अनुदान योजनांसाठी अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांनी सर्वप्रथम ऑनलाइन नावनोंदणी तातडीने करून घेण्याची आवश्यकता आहे.

योजनेसाठी अर्ज कसा भराल?
आधी सांगितल्याप्रमाणे https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाइटवर तुम्ही तुमची नावनोंदणी केली व शेवटी Success चा संदेश आला, की तुम्ही अर्ज भरण्यासाठी पात्र ठरतात. आता तुम्हाला मिळालेल्या ‘यूझर नेम’द्वारे किंवा ‘आधार क्रमांक’ टाकून देखील ‘लॉग-इन’ करता येईल. (समजा आधार क्रमांक नसला तर केवळ ‘यूझर आयडी’ने देखील  अर्ज भरता येतो. परंतु अनुदानासाठी तुम्ही पात्र ठरलात, तर अनुदान आधार संलग्न बॅंक खात्यात जमा होते. आधार नंबर नसल्यास  गावातील सार्वजनिक सुविधा केंद्रावर चौकशी करावी.

योजनेकरिता अर्ज भरण्यासाठी तुम्हाला आधी ‘नावनोंदणी’ करून मिळवलेला ‘यूझर नेम’ व ‘पासवर्ड’ टाकावा लागेल. त्यानंतर ‘नवीन नोंदणी’ असे पान उघडते. “तुमच्याकडे आधार क्रमांक आहे का,” असा प्रश्न तुम्हाला उजव्या बाजूला विचारला जाईल. आधार कार्ड असल्यास ‘होय’वर क्लिक करावे. त्यानंतर आधार नंबर काळजीपूर्वक टाकावा. या नंबरचे देखील प्रमाणीकरण (Verification) आपोआप होते. ते करण्याचे दोन प्रकार आहे. 

‘बायोमेट्रिक’ पद्धती ः शेतकऱ्याने आधार कार्ड काढताना बोटाचे ठसे दिलेले असतात. त्यांच्या आधारे येथे ‘बायोमेट्रिक’ प्रमाणीकरण होते. ‘बायोमेट्रिक’ करायचे नसल्यास ‘ओटीपी’वर क्लिक करावे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘ओटीपी’ पद्धत ः पूर्वीप्रमाणे मोबाईल येणारा ओटीपी क्रमांक भरावा. 
तुम्ही क्लिक करताच ‘तुमचा आधार क्रमांक व त्यातील वैयक्तिक माहिती साठवली जात आहे. राज्य सरकारच्या नियमानुसार ही माहिती वेळोवेळी वापरण्यास माझी हरकत नाही’, अशी एक ओळ येते. तिथे OK क्लिक करावे. त्यानंतर तुमचे लॉग-इन पूर्ण होते. यानंतर काही वेळा पोर्टलवर ‘तुमचे प्रोफाइल पूर्ण नाही,’ असा संदेश देखील येऊ शकतो. 

अशा वेळी तुमचे पूर्ण नाव, बॅंक खाते क्रमांक, आयएफएससी कोड टाकावा. त्यानंतर बॅंक शाखेचे नाव आपोआप येते. यानंतर “योजनेअंतर्गत शासनातर्फे देण्यात येणारे अनुदान आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. याची कल्पना मला असून मी नमूद केलेले बँक खाते आधार संलग्न केलेले आहे.” अशी एक ओळ दिसते. तेथील बॉक्समध्ये ‘टिक’ क्लिक करावे. खालील ‘जतन करा’ या हिरव्या शब्दांवर पुन्हा क्लिक करावे. त्यानंतर पत्ता विचारला जातो. तेथेही सर्व माहिती व्यवस्थित भरावी.

 वैयक्तिक माहिती भरताना ‘शेतजमिनीचे तपशील’ असे पान उघडते. त्यावर तपशील बिनचूक द्यावेत. सातबारा उतारा, ‘आठ-अ’मधील नोंदी तेथे द्याव्या लागतात. वैयक्तिक मालकीची जमीन, संयुक्त मालकीची जमीन याचीही नोंद करावी. जमिनीनंतर पिकाची माहिती देखील भरावी. आंतरपिके, बारमाही पिके, एकल पिके, नापिक क्षेत्र अशी विविध माहिती द्यावी लागते.

सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला उपलब्ध योजनेपैकी कशाचा लाभ हवा आहे, त्या योजनेवर क्लिक करावे. तुम्ही क्लिक करताच तो अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते. विविध योजनेत आवश्यकतेनुसार वेगवेगळी माहिती विचारलेली असते. ती व्यवस्थित भरून Submit वर क्लिक करावे. येथे एकापेक्षा अनेक योजनेसाठी एकाच वेळी क्लिक करून विविध अर्ज भरता येतात. 

म्हणजेच शेवटी केवळ २३ रुपये ६० पैसे भरून तुम्ही तुमचा ऑनलाइन अर्ज कृषी खात्याकडे देत असतात. तो अर्ज आपोआप हस्तांतरित होतो. ही प्रक्रिया पूर्ण होताच आपला अर्ज लॉटरी प्रक्रियेसाठी पात्र ठरतो. अर्ज लॉटरीला प्राप्त झाला म्हणजे तुम्हाला अनुदान मिळणार असे नसून, लॉटरीत नाव निघाले तरच अनुदान मिळते. पण, समजा लॉटरी नाव निघाले नाही तरी तुमचा अर्ज दुसऱ्या वेळी आहे तसाच पात्र धरला जाऊ शकतो. त्यामुळे ऑनलाइन नावनोंदणी यापुढे महत्त्वाची ठरणार आहे.

अर्ज भरताना शंका आल्यास...
  पोर्टलवर अर्ज भरताना काही शंका येऊ शकते. शेतकरी कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याचे मार्गदर्शन घेऊ शकतात. यासाठी सध्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून शंकानिरसन करण्याची सुविधा अद्याप सुरू झाली नाही. मात्र, ही सुविधा लवकरच उपलब्ध होऊ शकते. 

पोर्टलबाबत काही तक्रार किंवा सूचना असल्यास ती थेट पोर्टलमध्ये मांडता येते. त्यासाठी तुम्ही ‘लॉगइन’ करताच पोर्टलच्या डाव्या बाजूला ‘तक्रार-सूचना’ असे शब्द आहेत. त्यावर क्लिक करून तक्रार मांडता येते. ती थेट मंत्रालय किंवा संबंधित कक्षात जाते. त्यावर कार्यवाही देखील होते.

नावनोंदणी कशी कराल?
  https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ (वेबसाइट) उघडावे. किंवा गुगल सर्चवर केवळ Mahadbt असे टाइप करावे. त्यानंतर संकेतस्थळ उघडते.
  उजव्या बाजूला ‘पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती’ अशी ओळ असून, त्याखाली एक ट्रॅक्टरचे चित्र आहे. त्याखाली ‘शेतकरी योजना’ या शब्दांवर क्लिक करावे.
  आपण कृषी योजनांच्या मूळ पानावर येतो. तेथे पानाच्या उजव्या बाजूला पहिलीच ओळ ‘नवीन अर्जदार नोंदणी’ असून, त्यावर क्लिक करावे.
  या पानावर नवीन नोंदणी अशा मथळ्याखाली अर्जदार शेतकऱ्याने पूर्ण नाव  टाकावे. त्यानंतर शेतकऱ्याला आपले ‘लॉग इन नेम’ म्हणजेच वापरकर्त्याचे नाव (User name) टाकायचे आहे. ते शक्यतो सोपे ठेवावे. त्यानंतर हवा असलेला पासवर्ड टाकावा.
  यानंतर ‘ई-मेल आयडी’ असेल तर तो टाकावा. नसला तरी चालतो. मेलच्या पडताळणीसाठी नंतर शेजारी OTP वर क्लिक करावे लागेल. हा ओटीपी नंबर तुमच्या ‘ई-मेल’वर येतो. मेल उघडून तो नंबर पुन्हा या पोर्टलवर मराठी अक्षरात टाकावा. त्यामुळे तुमच्या ‘ई-मेल’ची पडताळणी अर्थात व्हेरिफिकेशन पूर्ण होईल.
  आता मोबाईल नंबर टाकावा. पडताळणीसाठी पुन्हा शेजारी OTP वर क्लिक करावे. यानंतर तुमच्या मोबाईलवर क्रमांक येतो. तो पुन्हा पोर्टलवर मराठी अक्षरात टाकून ‘OTP तपासा’ या हिरव्या ओळीवर क्लिक करावे.
  त्यानंतर याच पानावर शेवटी एक चौकट असून तेथे पाच इंग्रजी शब्द आहेत. ते जसे दिसतात तसे खालच्या चौकटीत टाकून ‘नोंदणी करा’ या ओळीवर क्लिक करावे.
  या नंतर तुम्हाला Success असा संदेश याच पोर्टलवर दिसेल. तिथे OK वर क्लिक करावे.
  अशा प्रकारे नावनोंदणीची सुविधा नव्या पोर्टलवर सोपी सुटसुटीतपणे उपलब्ध केली आहे. नावनोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ कायमस्वरुपी मिळतो. शेतकऱ्याने   ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ व्यवस्थित लिहून ठेवावा. तसेच, स्वतःचा  
  संगणक, लॅपटॉप असल्यास तेथे ‘सेव्ह’ करून ठेवावा. हाच ‘युजर आयडी’ पुढे विविध कृषी योजनांमधील अनुदान प्राप्तीकरीता अर्ज करण्यासाठी वापरता येईल.


कोणत्या योजनांसाठी तुम्ही अर्ज करू शकता?
  प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन घटक)
  कृषी यांत्रिकीकरण उपअभियान
  राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस
  बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उप योजना व आदिवासी उप योजना बाह्य)
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
  कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम
  भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
  राष्ट्रीय कृषी विकास योजना (रफ्तार)
  मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना


अर्ज भरतेवेळी ही  माहिती आवश्यक
कुटुंबातील सदस्यांची माहिती, शेतीशी निगडित मालमत्ता, सिंचनाची सोय काय आहे, कोणती जनावरे आहेत, फळबाग असल्यास त्याचे तपशील काय आहेत, अशी विविध माहिती पोर्टलमध्ये भरावी लागते.

अर्ज भरताना ही  कागदपत्रे हाताशी ठेवावी
स्वतःचा मोबाईल नंबर, आधार कार्ड, सातबारा उतारा, आठ-अ उतारा, शेतकरी अनुसूचित जाती  किंवा अनुसूचित जमातीमधील असल्यास ‘जातीचा दाखला’, बॅंकेचे पासबुक, उत्पन्न तपशील, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट इ. 

हे लक्षात ठेवा
  प्रत्येक शेतकऱ्याने काळजीपूर्वक नाव नोंदणी (Portal Registration) करून घ्यावी.
  शेतकऱ्याकडे आधार क्रमांक नसला तरी नावनोंदणी करता येते.
  काही योजना गटासाठी असतात. असे शेतकरी गट या पोर्टलवर नावनोंदणी करू शकतात. उदा. अवजार बॅंकेच्या अनुदानासाठी शेतकरी गटाला याच पोर्टलवर नावनोंदणी करता येते.
  सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणीही येथे शक्य आहे
  बिगरसरकारी संस्था (एनजीओ), उद्योजकांना नोंदणीसाठी या पोर्टलची मदत होते.
  नावनोंदणीसाठी आधार नसले तर चालते; पण अनुदान जमा होण्यासाठी आधार सक्तीचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.