नागपूर : भर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दीड महिन्यात केवळ चारच दिवस पाऊस! हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. मात्र हे खरे आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून गेल्या ४५ दिवसांमध्ये उपराजधानीत फक्त चारच दिवस दमदार पाऊस बरसला. जुलैच्या उत्तरार्धात विदर्भात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता असल्याने तूट भरून निघणार आहे. पावसाळ्यात दरवर्षी नागपूरसह विदर्भात धुवाधार पाऊस कोसळतो. यंदा मात्र वरुणराजाने अनपेक्षित धक्का दिला आहे.
१ जून १५ जुलैपर्यंतच्या दीड महिन्यात उपराजधानीत केवळ चारच दिवस पाऊस बरसला आहे. विशेष म्हणजे, एकही दिवस ३५ किंवा त्यापेक्षा अधिक मिलिमीटर पावसाची नोंद झालेली नाही. शहरात आतापर्यंत एकूण १९८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश पाऊस चार दिवसांतच बरसला आहे. गेल्या काही दिवसांपासून आकाशात ढगांची दाटी होते. मात्र वाकुल्या दाखवून ढग लगेच गायब होतात. कधीकधीच शहरात हलक्या सरी किंवा सडा टाकल्यासारखा पाऊस येतो. अधूनमधून बरसणाऱ्या मॉन्सूनसरींमुळे कसेबसे पिके तग धरून आहे. पुरेशा पावसाअभावी साहजिकच बळीराजाही चिंतेत आहे.
भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीपार पाऊस पडणार असल्याचे भाकीत वर्तवून शेतकऱ्यांच्या आशा वाढविल्या होत्या. मात्र आतापर्यंत तरी वरुणराजाने निराशाच केली आहे. निदान नागपूरकरांच्या बाबतीत तरी असेच म्हणावे लागेल. उर्वरित अडीच महिन्यांमध्ये तुफान पाऊस येऊन बॅकलॉग भरून निघेलही. पण सध्या तरी गरज असताना मॉन्सून सातत्याने हुलकावणी देत आहे. विदर्भापुरता विचार केल्यास, नागपूर वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.
हवामान विभागानुसार, जुलैचा उत्तरार्ध, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही देशात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात विदर्भातही चांगला पाऊस अपेक्षित आहे.
साधारणपणे विदर्भात सर्वाधिक पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे येत असतो. मात्र यावर्षी आतापर्यंत तरी हे चित्र दिसून आले नाही. जो काही पाऊस येतो आहे, तो अरबी समुद्राकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम आहे. आगामी काळात नक्कीच पावसाचा जोर वाढणार आहे.
-प्रा. सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.