खासगी वाहतुकीशी स्पर्धा करताना महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या प्रवाशांची संख्या रोडावल्याने दरवर्षी सरासरी पाचशे कोटींचा फटका सोसावा लागत आहे.
सोलापूर : खासगी वाहतुकीशी स्पर्धा करताना महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या (Maharashtra State Transport Corporation) प्रवाशांची संख्या रोडावल्याने दरवर्षी सरासरी पाचशे कोटींचा फटका सोसावा लागत आहे. एसटी बंदमुळे (ST Strike) खेड्यापाड्यातील सर्वसामान्य प्रवाशांसह शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे विलिनीकरण समितीचा कालावधी 12 ऐवजी सहा आठवडे करू, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास वेतनवाढ देऊ, परंतु, त्यांनी संप मागे घ्यायला हवा, अशी अपेक्षा परिवहनमंत्री अॅड. अनिल परब (Anil Parab) यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने एसटी महामंडळ विलिनीकरणासाठी स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करून ही समिती राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे. तत्पूर्वी, आर्थिक संकटातील एसटी महामंडळ हे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अधिकच अडचणीत सापडले आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर परिवहनमंत्री परब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. त्यावेळी एसटी महामंडळाचे विलिनीकरण केल्यास राज्यातील पोलिस पाटील, आशासेविका, अंगणवाडी सेविका, कोतवाल यांच्यासह 55 महामंडळाचे कर्मचारीदेखील तशी मागणी करु शकतात हा मुद्दा पुढे आला. त्यामुळे एसटी महामंडळ विलीनीकरणाऐवजी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून वेतनवाढीचा विषय मार्गी लावावा, असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे देण्याचा निर्णय झाला आहे. आता कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यासाठी परिवहनमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांसाठी तीन पर्याय दिले आहेत.
सरकारचे एसटी कर्मचाऱ्यांना तीन पर्याय...
बेसिक वेतनात सातव्या वेतन आयोगाप्रमाणे होईल वाढ
विलिनीकरणाचा अभ्यास करणाऱ्या समितीचा कालावधी करू सहा आठवड्यांचा
कर्मचाऱ्यांवरील निलंबनासह अन्य कारवाई तत्काळ मागे घेतली जाईल
खेड्यापाड्यातील लालपरीचा प्रवासी दुरावून त्यांनी पर्यायी मार्ग निवडल्यास महामंडळाचे फार मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे विलिनीकरण समितीचा अहवाल येईपर्यंत त्याशिवाय अन्य मुद्द्यांवर सरकार कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल. परंतु, भूलथापांना बळी न पडता कर्मचाऱ्यांनी तत्काळ संप मागे घेऊन कामावर हजर व्हावे, एवढीच अपेक्षा आहे.
- अॅड. अनिल परब, परिवहनमंत्री
एसटी महामंडळाची स्थिती...
मार्गावर धावू शकणाऱ्या बस : 16,000
सरासरी वार्षिक उत्पन्न : 6,570 कोटी
वेतनासह अन्य वार्षिक खर्च : 6,920 कोटी
वाढीव वेतनाचा वार्षिक भार : 1,800 कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.