Orange Processing Industry : महाराष्ट्रात संत्री प्रक्रिया उद्योग येत्या मार्चपासून - रामदेव बाबा

‘संत्री प्रक्रिया उद्योगात आतापर्यंत सुमारे पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून. विस्तारीकरण गृहीत धरता एक हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.
Orange fruit
Orange fruitsakal
Updated on

हरिद्वार - महाराष्ट्रातील संत्री प्रकिया उद्योग येत्या मार्च महिन्यापासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती ‘पतंजली योगपीठ’चे संस्थापक व योगगुरू बाबा रामदेव, तसेच त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनी ‘सकाळ’शी बोलताना आज दिली. विदर्भातील या प्रक्रिया उद्योगामुळे दोन हजार लोकांना प्रत्यक्ष, तर तीन हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘संत्री प्रक्रिया उद्योगात आतापर्यंत सुमारे पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून. विस्तारीकरण गृहीत धरता एक हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पात दिवसाला एक हजार टन इतक्या संत्र्यांवर प्रक्रिया केली जाईल,’ असे आचार्य बाळकृष्ण यांनी नमूद केले. ‘कोरोना संकट व अन्य कारणांमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला होता. मात्र पुढील वर्षी मार्च महिन्यापासून म्हणजे आगामी संत्री हंगामापासून सदर प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

देशभरातून आलेल्या पत्रकारांशी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी आज संवाद साधला. तसेच विविध सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर मते व्यक्त केली. ‘कोरोना संकट ओसरल्यानंतर अचानक लोकांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. हृदयविकार, कर्करोग, पक्षाघात अशा विविध आजारांनी लोक मरण पावत आहेत यासंदर्भात विचारले असता, ‘कोरोनाची लस, तसेच त्यावेळी देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या औषधांमुळे तर हे मृत्यू होत नाहीत ना, याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे,’ असे आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले. तर, ‘कोरोनाची लस आणि त्याचे परिणाम याबाबत वर्ष २०२४ (लोकसभा निवडणुका) संपेपर्यंत काही बोलणार नाही,’’ अशी टिपणी रामदेव बाबा यांनी केली.

‘पतंजली’ ही विविध क्षेत्रांत कार्यरत असलेली पण, वेगाने विकसित होत असलेली संस्था असल्याचे सांगून आचार्य बाळकृष्ण म्हणाले, ‘सध्याच्या समाजात अनेक दोष आहेत. परंपरेच्या नावावर ऊर्जा संपविण्याचे काम काही घटकांकडून होत आहे. मात्र आम्ही शास्त्रीय दृष्टिकोन ठेवत सनातन धर्म प्रसाराचे काम करीत आहोत. शिक्षण, आरोग्य, अध्यात्म, जनजागृती असे विविधांगी काम सुरू आहे. योग आणि आयुर्वेदाला पाया मानून यापुढेही आमचे काम चालू राहील.’

बद्री गाईंसाठी प्रकल्प

‘गोशाळा, जैविक शेती अशा क्षेत्रांत आम्ही मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे. आता तर विदेशात जाताना लोक आमची उत्पादने घेऊन जात आहेत. जगाच्या बहुतांश भागात ‘पतंजली’ची चार ते पाच उत्पादने प्रसिद्ध आहेत. हिमालय तसेच पहाडी भागात आढळणाऱ्या बद्री जातीच्या गाई वाचाव्यात, यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे,’ असे रामदेव बाबा यांनी सांगितले.

हजारो शाळा जोडणार...

‘आधुनिक आणि वैदिक अशा दोन्हींचा मिलाफ असलेले शिक्षण मुलांना देण्यासाठी भारतीय शिक्षण मंडळ सुरू करण्यात आले आहे. अन्य बोर्डांच्या धर्तीवर पण वेगळ्या पद्धतीने हे मंडळ काम करेल. देशातील हजारो शाळा या मंडळाशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे,’ असे रामदेव बाबा यांनी सांगितले.

गरीब वर्गासाठी काम व्हावे

जातिनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर विचारले असता रामदेव बाबा म्हणाले, ‘हा विषय राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने मी फार काही बोलणार नाही. मात्र सर्व धर्मातील गरीब वर्गासाठी काम होणे, त्यांना आरक्षण मिळणे नितांत आवश्यक आहे. जातिभेद न मानता ‘पतंजली’मध्ये सर्वांना सामावून घेण्यात आले आहे. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, अमली पदार्थ, वेबसाइट तसेच सोशल मीडियाद्वारे पसरवली जात असलेली अश्‍लीलता या बाबी युवकांसाठीच नव्हे, तर देशासाठी देखील अत्यंत घातक आहेत.’’

‘पतंजली’चा विस्तार

‘पतंजली’ समूहाकडून देशभरात मोठ्या प्रमाणात पामच्या झाडांची लागवड केली जात आहे, त्याचे आचार्य बाळकृष्ण यांनी समर्थन केले. ‘खाद्यतेलाच्या आयातीमुळे देशाचे परकीय चलन जात आहेच, पण हाच पैसा विदेशी शक्ती देशविघातक कामासाठी वापरत आहेत,’ असा दावा बालकृष्ण यांनी केला. तर, ‘पतंजली समूहाची सध्या ४५ हजार कोटी रुपयांवर असलेली उलाढाल पुढील वर्षापर्यंत एक लाख कोटी रुपयांवर जाईल,’ असा विश्वास रामदेव बाबा यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.