सोलापूर : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाची क्षमता ७६३ खाटांची आहे, पण सद्य:स्थितीत रुग्णालयात तब्बल ९५० ते एक हजारांवर रुग्ण उपचार घेत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. दुसरीकडे पाच वर्षांपूर्वी मंजूर झालेले २०० खाटांचे रुग्णालय अजूनही सुरु झाले नाही, दुसरीकडे ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयाची स्थिती तेवढी उत्तम नसल्याने सर्वोपचार रुग्णालयावरील भार वाढल्याची स्थिती आहे.
सोलापूर, धाराशिव व पुणे (इंदापूर) जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातूनही श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण येतात. सर्पदंश झालेले, अपघातात गंभीर जखमी झालेले, सर्दी, ताप, खोकला यासह सर्वच प्रकारच्या आजाराचे रुग्ण त्याठिकाणी येतात. दररोज ओपीडीत बाराशे ते दीड हजारांपर्यंत रुग्ण असतात.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालय असल्याने डॉक्टरांची संख्या पुरेशी आहे, पण रुग्णालयातील स्वच्छता व सुरक्षिततेवर कायम प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. अनेकदा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांमध्येच वादाचे प्रसंग यापूर्वी घडले आहेत. दुसरीकडे ओपीडीत रुग्णांना लिहून दिलेल्या चिठ्ठीवरील महागडी औषधे बाहेरून विकत घ्यावी लागतात, अशीही सर्वोपचार रुग्णालयातील स्थिती असल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. तर जिल्हा आरोग्य विभागाकडील औषध निर्माण अधिकाऱ्यांची २१ पदे रिक्त असून ३५५ आरोग्यसेविका कमी आहेत.
सोलापूर सर्वोपचार रुग्णालयाची स्थिती
दररोज सरासरी बाह्यरुग्ण
१५००
रुग्णालयातील खाटा
७६३
रुग्णालयात सध्या दाखल रुग्ण
१०१३
एकूण डॉक्टर्स
५९०
ग्रामीण आरोग्याची स्थिती
उपजिल्हा रुग्णालये
३
ग्रामीण रुग्णालये
१४
आरोग्य केंद्र
७७
उपकेंद्रे
४३१
कर्मचारी रिक्त पदे
५४८
‘डीपीसी‘चे नुसतेच पत्र, पण औषध खरेदीला निधी नाही
जिल्हा नियोजन समितीकडे यंदा जिल्हा आरोग्य विभागाने औषध खरेदीसाठी तीन कोटींचा निधी मागितला आहे. तीन महिन्यांपूर्वी निधी मंजुरीचे पत्र नियोजन समितीकडून आले, मात्र अद्याप निधी मिळालेला नाही. आता डिसेंबरपर्यंत पुरतील एवढाच औषधसाठा शिल्लक आहे. जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळाल्यानंतर औषध खरेदी केली जाणार आहेत. दरम्यान, नवीन निकषांनुसार दहा टक्के औषधे आरोग्याधिकारी स्तरावर खरेदीचा अधिकार आहे तर उर्वरित ९० टक्के पैसे सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठवून त्यांच्याकडून औषधे घ्यावी लागतात. त्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेचे बंधन आहे. दरम्यान, रुग्ण कल्याण समितीलाही राष्ट्रीय आरोग्य अभियानातून पावणेदोन लाखांपर्यंत औषध खरेदी करता येतात. तुर्तास आरोग्य विभागाला जिल्हा नियोजन समितीच्या तीन कोटींची प्रतीक्षा करावी लागत आहे.
साडेचार वर्षानंतरही जिल्हा रुग्णालय सुरु होईना
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी आणि दुसरीकडे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालयांची स्थिती, याचा अनुभव वाईट असल्याने २०१९ मध्ये तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्यातून सोलापूरसाठी स्वतंत्र २०० खाटांचे जिल्हा रुग्णालय मंजूर झाले. त्यात १०० खाटा महिला व बालकांसाठी तर १०० खाटा सर्वोपचारसाठी आहेत. मात्र, अद्याप ते रुग्णालय सुरु झालेले नाही. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयावरील ताण वाढल्याची वस्तुस्थिती आहे.
सर्वोपचार रुग्णालयात नाही ‘सिटी स्कॅन’ची सोय
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचा सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांसाठी खूप मोठा आधार आहे. अपघातासह अन्य गंभीर आजाराचे रुग्ण मृत्यूशी संघर्ष करत याठिकाणी येतात. पण, हॉस्पिटलमधील सिटी स्कॅन मशिन मागील काही महिन्यांपासून बंद आहे. खासगी रुग्णालयाशी सामंजस्य करार केला असून त्या परिस्थिती रुग्णास त्याठिकाणी न्यावे लागते. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटनांनी त्या मशिनची मागणी केली, हॉस्पिटलकडून पत्रव्यवहार झाला. मात्र, अद्याप त्याची दखल घेतली गेलेली नाही.
दररोज ओपीत बाराशे ते चौदाशे रुग्ण
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात डॉक्टरांची संख्या पुरेशा प्रमाणात असून दररोज बाराशे ते चौदाशे रुग्ण ओपीडीत असतात. औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. हॉस्पिटलची बेडची संख्या ७६३ असून सध्या एक हजारापर्यंत रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. दररोज त्यांच्याकडे मी स्वत: लक्ष देतो.
- डॉ. सुधाकर देशमुख, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय रुग्णालय, सोलापूर
--------------------------------------------------------------
डिसेंबरपर्यंत पुरेल औषधसाठा
जिल्ह्यात १४ ग्रामीण रुग्णालये असून ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र व ४३१ उपकेंद्रे आहेत. आता डॉक्टर्स भरण्याचे अधिकार आपल्याकडे असल्याने दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी आपण रिक्त पदे भरतो. पण, कर्मचाऱ्यांची पदे मात्र रिक्त आहेत. डिसेंबरपर्यंत पुरतील एवढा औषधसाठा आहे, पुढील वर्षातील औषध खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्याधिकारी, सोलापूर
-------------------------------------------------------------------
मंत्र्याच्या निवसस्थानी रुग्णाला नेऊ
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सर्वोपचार रुग्णालयास सिटी स्कॅन मशिन द्यावी, अशी सातत्याने मागणी केली आहे. काही दिवसांत मशिन न मिळाल्यास रुग्णांना घेऊन मंत्र्यांच्या निवासस्थानी जाईन.
- आनंद गोसकी, सामाजिक कार्यकर्ते
----------------------------------------------------------------
...अन्यथा तीव्र आंदोलन करून
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील सिटी स्कॅन मशिन बंद पडली आहे. त्यासाठी राखीपौर्णिमेला आंदोलनही केले होते. मात्र, अद्याप मशिन मिळालेली नसून काही दिवसांत त्याची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.
- श्याम कदम, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
---------------------------------------------------------------------
सिटी स्कॅन मशीन गरजेचीच
सर्वोपचार रुग्णालयातील सिटी स्कॅन मशिन बंद असल्याने अनेकांचा जीव धोक्यात गेल्याची उदाहरणे आहेत. रुग्णांचा जीव वाचावा, त्यांच्यावर तत्काळ उपचार होण्यासाठी ती मशिन जरुरी आहे. खासगी रुग्णालयातून सिटी स्कॅन केल्याने आर्थिक भुर्दंड सर्वसामान्यांना सोसावा लागतोय.
- शुभांगी लचके, सोलापूर
----------------------------------------------------------------------
...तर मंत्र्यांच्या दारात आंदोलन करू
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील सिटी स्कॅन मशिन सुरु करावी, यासाठी पाठपुरावा केला. रुग्णांचे हाल होत असतानाही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. दुसरीकडे जिल्हा रुग्णालयही अजून सुरु झाले नाही. आरोग्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावे, अन्यथा आगामी काळात रुग्णांना घेऊन दोन्ही मंत्र्यांच्या दारात आंदोलनाला बसू.
- श्रीकांत डांगे, संस्थापक अध्यक्ष, संभाजी आरमार, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.