सोलापूर : सोलापूरकरांचा वर्षानुवर्षांचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा म्हणून सोलापूर ते उजनी अशी ११० किलोमीटर समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. सध्या ८८ किमी काम पूर्ण झाले असून आता राहिलेले काम पूर्ण व्हायला नोव्हेंबर उजाडेल, अशी स्थिती आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूरकरांचा पाणीप्रश्न न सुटल्यास भाजपला या निवडणुकीतही फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपने आत्मचिंतन करीत पराभवाच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मागील लोकसभेला २९ हजारांपर्यंत लीडवर असलेल्या भाजपला याठिकाणी मताधिक्य राखता आले नाही. दुसरीकडे ‘शहर उत्तर’मध्ये देखील काँग्रेसने ७१ हजारांवर मते घेतली. दक्षिण सोलापुरातूनही काँग्रेसला एक लाख पाच हजारांवर मते आहेत. विशेष म्हणजे शहरातील अडीच विधानसभा मतदारसंघावरच भाजपला विजय सोपा वाटत होता. मात्र, तिन्ही ठिकाणी भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यासाठी सोलापूरचा पाणीप्रश्न व रोजगार, विमानसेवा हे तिन्ही मुद्दे कारणीभूत ठरले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा मतदारसंघात भाजप आमदारांना पुन्हा विजय मिळवायचा असल्यास या मुद्द्यांचा प्राधान्याने निपटारा करावाच लागणार आहे. पण, रोजगारासाठी आयटी उद्योगासह अन्य उद्योग सुरू होणे अपेक्षित आहेत.
दुसरीकडे विमानसेवेचे अडथळे दूर होऊन १५ जूनला एक वर्ष पूर्ण होत असतानाही विमानसेवा अद्याप सुरू झालेली नाही. आता विमानतळावरील कामे अंतिम टप्प्यात आहेत, पण केंद्रीय हवाई उडान मंत्रालयाच्या परवानगीशिवाय विमानसेवा सुरू होणे अशक्य मानले जात आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करावा लागणार आहे. दुसरीकडे सोलापूरचा पाणीप्रश्न सोडविताना समांतर जलवाहिनीचे काम विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करून सोलापूरकरांना नियमित तथा किमान एक-दोन दिवसाआड पाणी द्यावेच लागेल. केंद्रात, राज्यात, महापालिकेत सत्ता, सर्वाधिक आमदार असतानाही हे प्रश्न न सुटल्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विधानसभेनंतर महापालिकेची निवडणूक
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीनंतर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये महापालिका, जिल्हा परिषदांची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या दोन्ही निवडणुकांपूर्वी भाजप सत्ताधाऱ्यांना सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावावेच लागतील.
पंप फिटिंग, जॅकवेल, ट्रायलसाठी नोव्हेंबर उजाडणार
समांतर जलवाहिनीचे काम सध्या ८८ किलोमीटरपर्यंत पूर्ण झाले असून आता पावसाळा सुरू होत असल्याने कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. याशिवाय जॅकवेलचे काम, धरणावर १२ एचपीचे सहा पंप बसविण्याच्या कामाला किमान तीन महिने लागणार आहेत. धरणात पाणी आल्यास त्याठिकाणी काम करणे शक्य होणार नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे समांतर जलवाहिनी पूर्ण झाली, तरीदेखील सोलापूरकरांना नियमित पुरेशा दाबाने पाणी देण्यासाठी ‘अमृत-२’चा प्रस्ताव मंजूर करून शहरांतर्गत पाइपलाइन, टाक्यांची कामे पूर्ण करावी लागतील, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.