परभणी : परभणी लोकसभा मतदार संघाच्या वाटणीवरून आता भाजप- शिवसेनेत जुंपणार असल्याची शक्यता दिसू लागली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या आमदाराने परभणी लोकसभा भाजप लढविणार असल्याचे घोषित केले होते. आता परत शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी ही ही जागा शिवसेनेच्या हिश्याची आहे, असे म्हणत हक्क सांगितला आहे. सतत आठ वेळा या मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार विजयी होत आलेला आहे.
परभणी लोकसभा मतदार संघात नवव्या लोकसभेपासून शिवसेनेने आपले स्थान पक्के केलेले आहे. १९८९ साली शिवसेनेकडून प्रा. अशोक आनंद देशमुख यांनी पहिल्यांदाच खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश केला. त्यानंतर १९९१ साली परत त्यांना शिवसेनेने संधी दिली. त्यातही ते विजयी झाले. त्यानंतर १९९६ साली अॅड. सुरेश रामराव जाधव हे शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभेत पोहचले. परंतु, त्यांचा कार्यकाळ केवळ २ वर्षांचाच राहील.
मध्यावधी निवडणुका लागल्या होत्या. १९९८ साली कॉंग्रेसचे सुरेश वरपुडकर हे पहिल्यांदाच खासदार म्हणून लोकसभेत गेले. परंतु, त्यांचाही कार्यकाळ केवळ १ वर्षाचाच राहिला. त्यानंतर १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत परत एकदा शिवसेनेच्या तिकिटावर अॅड. सुरेश जाधव हे खासदार पदी विराजमान झाले. तेव्हापासून आतापर्यंत शिवसेनेच्या उमेदवाराने या मतदार संघात पराजय पाहिलेलाच नाही. २००४ ते २००९ या काळात अॅड. तुकाराम रेंगे पाटील हे या मतदार संघाचे खासदार म्हणून विजयी झाले. २००९ ते २०१४ या काळात अॅड. गणेशराव दुधगावकर हे शिवसेनेचे खासदार होते. २०१४ ते २०१९ आणि २०१९ ते आजपर्यंत
संजय जाधव हे शिवसेनेचे खासदार मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सलग आठ वेळा या मतदार संघावर वर्चस्व असलेल्या शिवसेनेला आता परत या मतदार संघात निवडणूक लढवायाची आहे. परंतु, शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट वेगळा झाला आहे. सध्या ठाकरे गटाचे संजय जाधव हे या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
त्यामुळे शिवसेनेला (शिंदे गट) आता त्यांचा उमेदवार या मतदार संघातून निवडून येऊ शकतो, अशी शक्यता वाटू लागली आहे. असे असले तरी ठाकरे गट वेगळा झाल्यामुळे भाजप ही या मतदार संघावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे ही जागा कुणाच्या वाट्याला जाणार हे दोन्ही पक्षाचे श्रेष्ठी ठरवतील. परंतु, आता मात्र त्यावरूनच वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खोतकर काय म्हणाले…
परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे परभणी लोकसभेची जागा शिवसेनाच लढविणार आहे. या जिल्ह्यातील मतदार हा शिवसेनाप्रमुखांच्या विचारांवर व धनुष्यबाण चिन्हावर प्रचंड प्रेम करणार आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह परभणीतील शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या मतदारांनी शिवसेनेला मिळून दिले आहे. म्हणून येणारी लोकसभा निवडणूक ही शिवसेना लढवणार असून, यासाठी बूथ प्रमुख, शिवदूत नेमणुकीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, असे शिवसेनेचे उपनेते तथा परभणी लोकसभा संपर्क प्रमुख अर्जुन खोतकर म्हणाले.
आतापर्यंत यांनी केले प्रतिनिधित्व
एन. के. पांगरकर - १९५७ ते १९६२ (कॉंग्रेस)
शिवाजीराव देशमुख - १९६२ ते १९७७ (कॉंग्रेस)
शेषराव देशमुख - १९७७ ते १९८० (शेकाप)
आर. एन. यादव - १९८० ते १९८९ (कॉंग्रेस आय)
अशोक आनंद देशमुख - १९८९ ते १९९६ (शिवसेना)
सुरेश रामराव जाधव - १९९६ ते १९९८ (शिवसेना)
सुरेश वरपुडकर - १९८९ ते १९९९ (कॉंग्रेस आय)
सुरेश रामराव जाधव - १९९९ ते २००४ (शिवसेना)
तुकाराम रेंगे पाटील - २००४ ते २००९ (शिवसेना)
गणेशराव दुधगावकर - २००९ ते २०१४ (शिवसेना)
संजय जाधव - २०१४ ते आजपर्यंत (शिवसेना, ठाकरे गट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.