Parenting Tips : तिसरीत शिकणारी चिमुकली आजारी असतानाही शाळेला गेली होती. सराव पेपर देताना अचानक तिला झटका आला आणि दवाखान्यात जाईपर्यंत तिने जगाचा निरोप घेतला होता. दुसरीकडे तंत्रनिकेतनचे शिक्षण घेणाऱ्या सोलापुरातील मुलीला परीक्षेपूर्वीच हार्टॲटॅक आल्याची बातमी कानावर धडकली.
एकूणच मुले आजारी असताना पालकांनी त्यांना शाळेत पाठवावे का, आयुष्याच्या परीक्षेची एकएक उतरंड चढताना शाळा-महाविद्यालयीन परीक्षेचा ताण घ्यावा का, एक परीक्षा म्हणजे सगळे जीवन आहे का, या प्रश्नांची उत्तरे आता पालकांनी मुलांना समजून सांगण्याची गरज आहे.
पालकांकडून मुलांवर लादलेल्या अपेक्षांमुळे ताण वाढवत असून नैराश्यग्रस्त मुला-मुलींची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पालकांनी मुलांची आवड-निवड, त्यांची क्षमता ध्यानात घेऊन त्यादृष्टीने त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
मुलांच्या भविष्यासाठी पंचसूत्रीचे करा पालन
१) निसर्गाच्या सहवासात रमू द्या
प्रत्येक मूल स्वतंत्र अभिव्यक्ती असून प्रत्येकाच्या वाढीचा, विकासाचा वेग भिन्न आहे. पालकांनी मुलांच्या शिकण्याच्या वेगावर, वर्तणुकीवर त्यांची हुशारी ठरवू नये. अपेक्षांचे ओझं थोडं कमी करून मुलांना मुक्तपणे निरीक्षण करू द्या.
निसर्गाच्या सहवासात रमू द्या, मग बघा, एका छोट्याशा बदलाने मुलांच्या सुप्तगुणांना, कौशल्यांना वाव नक्की मिळेल. मुले त्यांच्या आकांक्षांचं बळ इवल्याशा पंखात भरून ते स्वतःहून गगनाला गवसणी घालण्यास उद्युक्त होतील.
२) मुलांना प्रगतीसाठी वेळ द्या
पालकांच्या अपेक्षा वाढल्याने पाल्यावर अनेकदा दडपण येते. शिक्षण पद्धतीत आता अमूलाग्र बदल होत आहेत.
आनंददायी शिक्षण, ज्ञानरचनावाद, कृतीयुक्त शिक्षणावर, कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्याच्या गतीनुसार शाळेत शिक्षण दिले जात आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी वेळ द्यायला हवा, उगाच आततायीपणा करू नये.
३) अपेक्षांचे ओझ कमी करा
स्पर्धेच्या युगात आपले पाल्य टिकेल की नाही, या भीतीने पालक मुलांवर अनेक अपेक्षांचे ओझं लादत आहेत. परिसरातील हुशार मुलांकडे, इतर विद्यार्थ्यांकडे पाहत आपल्याही मुलाने अभ्यासात पुढे असावे, असे पालकाला वाटते.
स्वतःला जे जमले नाही, ते आपल्या पाल्याने करून दाखवावे, हा आग्रह धोकादायक ठरत आहे. अपेक्षांचे ओझे वाढल्याने मुलांचे बालपण हरवले आहे.
पालकांच्या अपेक्षांचे ओझ जीवघेणे ठरू लागले आहे. भविष्यात अपेक्षाभंग, आत्महत्या, भांडणतंटा, दु:ख, क्लेश, नैराश्य, अशा गंभीर गोष्टींना सामोरे जायचे नसल्यास मुलांवरील ‘अपेक्षांचे ओझे’ कमी करणे हाच ठोस उपाय आहे.
४) विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखा
घरातील वातावरण दबावाचे नसावे. मुलांना मत मांडण्याचे स्वातंत्र्य असावे. काहीवेळा पालक स्वतःच नवनवीन व्यवसाय पाहतात आणि त्या क्षेत्रामुळे प्रभावित होऊन मुलांना त्यादृष्टीने प्रयत्न करायला भाग पाडतात.
त्यामुळे मुलांमध्ये धरसोड वृत्ती निर्माण होते. विद्यार्थ्यांची क्षमता ओळखणारा शिक्षक असावा, जे तुम्हाला तुमच्या शैक्षणिक क्षमतेबद्दल सांगू शकतील. मुलांना करिअर निवडताना त्याच्या जमेच्या बाजू आणि न जमणाऱ्या बाजू पालकांनी मित्र, पालक म्हणून त्याला सांगाव्यात.
५) मुलांशी मैत्री करा; विश्वासात घेऊन मने जिंका
सर्वच क्षेत्रांत स्पर्धा असल्याने मुलांवर ताण येत आहे. अशावेळी मुलांशी मैत्री करा; त्यांना समजून घ्या. त्यांच्या अडचणी जाणून घ्या. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणू नका.
मुलांवर विश्वास टाकून जर त्यांची मने जिंकता आली, तर त्यांच्या मनातला मोठ्यांविषयी असणारा आदर अजून खूप पटीने वाढेल. जनरेशन गॅपमधील फरक जाणून घेऊन एकमेकांना समजून आणि जाणून घेण्याची वृत्ती प्रत्येक पालकाने आत्मसात करावी.
योगासन, श्लोक, मदानी खेळातून राहिली तंदुरुस्ती
मनाचे आरोग्य व्यवस्थित असल्यास शारीरिक स्वास्थ उत्तम असते. त्यामुळे कुटुंब, शाळा, मित्र-मैत्रिणींमध्ये सुसंवाद हवा. आवडीचा छंद हवा आणि तो आवर्जुन जोपासावा. तसेच प्रणायामातून मनावरील ताण कमी होऊन मनाची स्थिरता वाढण्यास मदत होते.
दररोज किमान १०-१५ मिनिटे ध्यान करावे. श्लोक पठण, स्त्रोत म्हणून देखील मनाची स्थिरता व प्रसन्नता वाढते. त्यातून तणाव कमी होऊन आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होते.
योगासन, चालणे व मैदानी खेळातून शारीरिक तंदुरुस्ती राहील. भविष्याची वाटचाल योग्य होण्यासाठी सर्वांनीच या गोष्टी आवर्जुन आचरणात आणाव्यात, असे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.