सोलापूर : जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा तीन लाख २६ हजार ६४० वीज ग्राहकांकडे सध्या ७३ कोटी २४ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील २० लाख ३५ हजार ९४४ ग्राहकांकडे एकूण ४८४ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीतील ‘महावितरण’ने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर थकबाकीची रक्कम व नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी घेतल्याशिवाय वीजपुरवठा सुरू करण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वीजबिलांच्या वसुलीवरच ‘महावितरण’चा संपूर्ण आर्थिक डोलारा अवलंबून आहे. एक दोन महिन्यात वीजबिलांच्या थकबाकीमध्ये वाढ झाल्यामुळे पुन्हा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
प्रादेशिक संचालक अंकुश नाळे स्वतः दौऱ्यावर असून थेट शाखा कार्यालयांपर्यंत वीजबिल वसूलीचा आढावा घेत आहेत. तसेच खंडित केलेल्या वीजजोडण्याची तपासणी करीत आहे. यासोबतच मुख्य अभियंता राजेंद्र पवार (पुणे), सुनील पावडे (बारामती) व धर्मराज पेठकर (प्रभारी-कोल्हापूर) यांच्यासह सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचारी आणि विशेष पथके थकबाकी वसूलीसाठी ‘ऑन फिल्ड’ आहेत. वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई तसेच नियमानुसार पुनर्जोडणी शुल्काचा भरणा, वीज नसल्याने गैरसोय होणे आदी टाळण्यासाठी थकीत वीजबिलाची रक्कम ताबडतोब भरावी, असे आवाहन श्री. नाळे यांनी केले आहे.
घरबसल्या वीजबिल भरण्याची सोय
वीजग्राहकांना केव्हाही व कुठूनही ऑनलाइनद्वारे थकीत व चालू वीजबिल भरण्याची सोय www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच ‘महावितरण’च्या मोबाइल अॅपद्वारे उपलब्ध आहे. पाच हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीजबिल भरता येईल.
कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी बसेल भुर्दंड
‘महावितरण’कडून थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरू आहे. वीजपुरवठा पुन्हा सुरु करण्यासाठी थकबाकीच्या रकमेसोबतच ग्राहकांनी पुनर्जोडणी शुल्क जीएसटीसह भरल्याशिवाय त्यांना पुन्हा कनेक्शन दिले जात नाही. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुनर्जोडणी शुल्क यापूर्वीच निश्चित केलेले आहे. यामध्ये लघुदाब वर्गवारीतील सिंगल फेजसाठी २१० रुपये व थ्री फेजसाठी ४२० रुपये तसेच उपरी व भूमिगत वीजवाहिन्यांद्वारे दिलेल्या वीजजोडण्यांच्या पुनर्जोडणीसाठी सिंगल फेजसाठी प्रत्येकी ३१० रुपये व थ्री फेजसाठी प्रत्येकी ५२० रुपये शुल्क आहे. तर उच्चदाब वर्गवारीसाठी तीन हजार १५० रुपये शुल्क लागू आहे. या सर्व शुल्कांवर १८ टक्के जीएसटी कर लागू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.