मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना काल शनिवारी पितृपक्ष म्हणजे भोंदूगिरी असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलंय. त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधन नियतकालिकातील लेखसंग्रह ग्रंथाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. वाईट रुढी-परंपरांवर बोलताना पितृपक्ष चांगला की वाईट यावर आपली भूमिका मांडताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.
शंभर वर्षापूर्वी चुकीच्या रुढी परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारसाहित्याच्या त्रिखंडात्मक ग्रंथाचे उद्घाटन माझ्या हाताने होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा बहुमान आणि प्रबोधनकरांचा नातू असणे हे भाग्य आहे, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. प्रबोधन नियतकालिकेतील केशव सिताराम ठाकरे यांचे लेख असलेले ‘प्रबोधन’ मधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथांचे प्रकाशन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे या कार्यक्रमात म्हणाले की, “नुकताच पितृपक्ष होऊन गेला. पितृपक्ष चांगला की वाईट? या काळात चांगलं काम करू नये असं म्हटलं जातं. मात्र, मला जेव्हा एखादी गोष्ट करायची आहे आणि पितृपक्ष आहे असं विचारलं जातं, तेव्हा मी माझा पक्ष पितृपक्ष आहे, तो वडिलांनीच स्थापन केल्याचं ठामपणे सांगतो. वडिलांनी स्थापन केलेला पक्ष हा पितृपक्ष नाही का? त्यामुळे ही सर्व भोंदूगिरी आहे,” असं स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
प्रबोधनकार ठाकरे नास्तिक होते?
प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांनी मते मांडली आहेत. ते म्हणाले की, “माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे नास्तिक होते का? तर अजिबात नाही. त्यांची देवीवर प्रचंड श्रद्धा होती. पण ढोंगावर लाथ मार, ढोंगबाजी अजिबात नको, असं ते सांगायचे. त्यांनी केवळ हे लिहून सोडून दिलं नाही, तर जिथं जिथं ढोंग दिसलं तिथं त्यांनी लाथा मारल्यात. काय होईल ते होईल. त्यांना फूटबॉलपटूच म्हणावं लागेल.”, असंही ते मिश्लिकपणे म्हणाले. आपल्या नातवांचे लाड करणारे आजोबा प्रबोधनकार यांच्याविषयी आठवणी जागवतांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, प्रबोधनकार कडक शिस्तीचे होते ते आम्हाला बाळासाहेब सांगायचे. आमच्या लहानपणी आजोबांनी राजा राणीच्या गोष्टी सांगितल्या नाही तर त्यांच्या विचारांच्या गोष्टी सांगितल्या. प्रबोधनकार यांचे विचार जगातील सर्व कानाकोपऱ्यामध्ये पोहचले पाहिजे त्यासाठी त्यांच्या ग्रंथांचे भाषांतर झाले पाहिजे. शंभर वर्ष झाल्यानंतर माझ्या हस्ते या ग्रंथांचे प्रकाशन होत आहे हे माझ्यासाठी समाधान देणारे आहे. हीच भावना बाळासाहेबांवरील ‘फटकारे’ पुस्तकाचे प्रकाशन केले त्यावेळी होती.
नेता म्हणून लोकशाहीत मत महत्वाचे आहे पण लोकांमध्ये काम करीत असतांना हिंमत सुद्धा आवश्यक आहे. प्रबोधनकारांनी ती दाखवली. पूर्वीच्या काळातल्या वाईट चालिरीतींच्या विरोधात प्रबोधनकार ठामपणे उभे राहिले. ते नास्तिक नव्हते मात्र धर्माच्या नावावरील ढोंग त्यांना आवडत नव्हते. देश हाच धर्म अशी शिकवण त्यांनी दिली, परंतू स्वत:च्या धर्माविषयी वाईट विचाराने समोरुन कोणी आला तर मी एक कडवट हिंदू आहे हे लक्षात घ्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आमचं हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटलंय की, “आमचं हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचे हिंदुत्व नाही. प्रबोधनकारांचे ग्रंथ साहित्य देशात सर्व राज्यात पोहचवावे त्यासाठी त्याचे भाषांतर झाले पाहिजे. नवहिंदू प्रकार फार घातक आहे. हत्ती आणि सात आंधळे या गोष्टीसारखे होते आहे. शंभर वर्ष झाल्यानंतर सुद्धा माझ्या हस्ते प्रकाशन होते आहे हे माझ्यासाठी समाधान देणारी गोष्ट आहे. हीच भावना बाळासाहेबांवरील फटकारे पुस्तकाचे प्रकाशन केलं त्यावेळी होती,” असंही त्यांनी नमूद केलंय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.