डोंबिवली/कल्याण : बदलापूर आंदोलनप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी ६८ जणांना अटक केली आहे. यात कल्याण रेल्वे पोलिसांनी २८ जणांना, तर बदलापूर पूर्व-पश्चिम पोलिसांनी ४० जणांना अटक केली. ३०० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. बुधवारी अक्षयला पोलिस बंदोबस्तात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
या प्रकरणात मंगळवारी (ता. २०) बदलापूर बंदची हाक देत शाळेसमोर निदर्शने करण्यात आली. शाळेची तोडफोडदेखील करण्यात आली. यानंतर आंदोलनकर्त्यांनी ‘रेल रोको’ करत आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली होती.
या घटनेतील आरोपी शाळेतील शिपाई अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. २१ ऑगस्टला त्याची पोलिस कोठडी संपत होती. यामुळे बदलापूर पोलिसांनी बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर केले. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मोठ्या पोलिस बंदोबस्तात कल्याण न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. आरोपीने अशा प्रकारची आणखी काही कृत्ये केल्याचा संशय व्यक्त करत आरोपीची पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी केली. पोलिसांच्या या मागणीनंतर कल्याण न्यायालयाने २६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र घेण्यास वकिलांनी नकार दिला आहे. कल्याण न्यायालयातील वकिलांनी त्याचे वकीलपत्र घेण्यास नकार देत तसा निर्णय घेतला असल्याची माहिती पुढे येत आहे.
३०० जणांविरुद्ध गुन्हा; ६८ जणांना अटक
आंदोलकांवर रेल रोको, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, पूर्वनियोजित गुन्हेगारी कट रचणे असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २२ आंदोलकांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या आंदोलकांना सोडवण्यासाठी कल्याण व बदलापूर वकील संघटनेच्या वतीने कोणताही मोबदला न घेता न्यायालयात त्यांची बाजू मांडण्यात आली. दरम्यान, कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात रेल्वे पोलिस आणि आंदोलनकर्त्यांच्या वकिलांमध्ये वाद झाला.
समाजकंटकांकडून फायदा
बदलापूर शाळेतील घटनेनंतर जनतेच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर ‘रेल रोको’ करत आंदोलन केले. या आंदोलनप्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक असा खुलासा झाला आहे. आंदोलनाच्याआधी, आंदोलनावेळी आणि नंतरचे काही फोन्स कॉल्सचे रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागले आहेत. बदलापूरच्या आंदोलनाला नेतृत्व नव्हते; पण याचा फायदा काही समाजकंटकांनी घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी आता या आंदोलनाच्या तपासासाठी विशेष पथके नेमली आहेत. अनेक आंदोलक बाहेरचे होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.