Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन;विधान परिषदेसाठी भाजपकडून पाच नावे

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे अखेर राजकीय पुनर्वसन झाले असून भाजपने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित केली आहे. विधान परिषदेतील ११ जागांसाठी भाजपने आज पाच उमेदवार घोषित केले. या नावांमध्ये सामाजिक समीकरणांचा विचार केला आहे.
Pankaja Munde
Pankaja Mundesakal
Updated on

मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे अखेर राजकीय पुनर्वसन झाले असून भाजपने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित केली आहे. विधान परिषदेतील ११ जागांसाठी भाजपने आज पाच उमेदवार घोषित केले. या नावांमध्ये सामाजिक समीकरणांचा विचार केला आहे.

पुणे जिल्ह्यातील योगेश टिळेकर आणि अमित गोरखे या दोघांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मित्रपक्षातील सहकारी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील माजी विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनाही उमेदवारी घोषित झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाने उमेदवारांची सामाजिक मोट बांधली आहे.

योगेश टिळेकर हे माळी समाजातील आहेत. चेतन तुपे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे विधानसभेत टिळेकर यांना उमेदवारी देणे कठीण आहे. मात्र, टिळेकर यांचे ओबीसी समाजातले स्थान लक्षात घेत त्यांना वरिष्ठ सभागृहात पाठवण्यात येणार आहे. अमित गोरखे हे मातंग समाजातले युवा कार्यकर्ते असून पिंपरी चिंचवड परिसरात ते सक्रिय आहेत.

सोशल मीडियाद्वारे ते अनेकवेळा पक्षाची बाजू चांगल्या पद्धतीने उचलून धरतात. पंकजा या वंजारी समाजाच्या नेत्या असून राज्याच्या राजकारणातही त्यांना मोठे स्थान आहे. काही वर्षांपासून महत्त्वाच्या जबाबदारींपासून दूर राहिलेल्या पंकजा यांना पक्षाने लोकसभेसाठी संधी दिली होती. मात्र, त्यांचा बीडमधून पराभव झाला होता. राज्यसभेसाठी त्यांच्या नावाचा विचार झाला नव्हता. आता मात्र विधान परिषदेसाठी त्यांना संधी देऊन पक्षाने त्यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे मानले जात आहे. परिणय फुके यांना भंडारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढायची होती. मात्र, ती संधी नाकारली गेली होती. पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर आणि परिणय फुके उद्या (ता .२) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

पंकजा यांना मंत्रिपद शक्य

पंकजा मुंडे यांना संधी मिळणे महत्त्वाचे मानले जात असून त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. फडणवीस यांचे सध्या महाराष्ट्र भाजपमध्ये एकछत्री नेतृत्व आहे. आता मुंडेंमुळे आणखी एक नेतृत्व समोर येणार आहे. अन्य चारही उमेदवार फडणवीस यांच्याशी संबंधित आहेत. अर्थात, मुंडे यांच्या पुनर्वसनाचा प्रस्तावही फडणवीस यांनीच ठेवला होता.

काँग्रेसकडून प्रज्ञा सातव

संख्याबळानुसार काँग्रेसला अकरापैकी एकाच जागेवर विजय शक्य आहे. या जागेसाठी पक्षाने प्रज्ञा सातव यांचे नाव जाहीर केले आहे. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या त्या पत्नी आहेत.

असे आहेत उमेदवार

भाजप : पंकजा मुंडे,

सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर, परिणय फुके

काँग्रेस : प्रज्ञा सातव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.