पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : ‘‘मी दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या राजकीय भूमिकेवरून माझ्यावर विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत. वेषांतर करून मी दिल्लीला दहा फेऱ्या मारल्याच्या लोकसभेपासून राज्यापर्यत करण्यात आलेल्या वक्तव्यामध्ये तथ्य नाही. मी पस्तीस वर्षांपासून राजकारणात असून जबाबदारीचे भान आहे. झालेले आरोप पुराव्यासह सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेईन, ते सिद्ध नाही झाले तर आरोप करणाऱ्यांनी राजकारण सोडावे,’’ असे सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता दिले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी अजित पवार वेषांतर करून दिल्लीला गेले होते, या विरोधकांच्या आरोपाला त्यांनी प्रत्युत्तर दिले. महायुतीच्या माध्यमातून मायभगिनी, शेतकरी, युवक यांच्यासाठी सुरू असलेल्या कल्याणकारी योजना विरोधकांच्या डोळ्यात खुपत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पवार यांच्या उपस्थितीत आज कळवण- सुरगाणा मतदारसंघात विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण झाले. त्यानंतर त्यांनी येथे आमदार दिलीप बनकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
पवार म्हणाले,‘‘मी जी भूमिका घेतो, ती उजळमाथ्याने घेतो. स्पष्टवक्तेपणा हा माझा स्थायीभाव संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. माझ्या कथित दिल्लीवारीचा फेक नरेटिव्ह सेट करताना अगदी लोकसभेतही तथ्यहीन वक्तव्ये केली गेली. हे खरे असेल तर मी राजकारणाला कायमचा रामराम ठोकेन, अन्यथा केलेले आरोप सिद्ध न झाल्यास त्यांनी (सुप्रिया सुळे) राजकारण सोडावे. सकाळी नऊचा भोंग सुद्धा पुरावा नसताना उचलली जीभ, की लावली टाळूला, असा वाजतो अशी टीका त्यांनी खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता केली.
पवार म्हणाले, राजकीय नौटंकी करणाऱ्यांना महायुतीच्या माध्यमातून घोषणा झालेल्या योजना खुपत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण, मोफत गॅस सिलिंडर, वीज माफी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती या योजनांमध्येही अर्थमंत्री म्हणून माझी बदनामी
केली जात आहे. जीएसटी कर संकलनासह वाढत असलेले उत्पन्नाचे स्रोत यामुळे घोषित केलेल्या योजनांसाठी ४९ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
वाचाळवीरांच्या भडक वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा दर्जा खालावत असल्याचा टोला त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लावला. अजित पवार यांना पाहून घेऊ, अशी भाषा करणाऱ्यांनी कायदा हातात घेतल्यास कारवाई अटळ असेल, असा इशारा त्यांनी दिला.
एका पक्षाची सत्ता अशक्य
महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहता कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे. एका पक्षाची सत्ता येणे अशक्य असल्याने वेगवेगळ्या विचारधारा असल्या तरी महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यावर विविध पक्ष एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, असेही राजकीय भाकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. जागा वाटपाबाबत महायुतीची प्राथमिक चर्चा झाली आहे. त्या-त्या पक्षाच्या विद्यमान जागा कायम ठेवल्या जातील. निवडून येण्याची क्षमता असेल तर एखादी जागा बदलली जाईल. युवा नेतृत्वाला येत्या विधानसभा निवडणुकीत संधी देणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.