अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आरोप केला होता की, शरद पवार भाजपशी हातमिळवणी करण्यास '50 टक्के' तयार होते. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने प्रफुल पटेल यांचे आरोप फोटाळून लावत ते "निव्वळ खोटे" असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, पटेल यांचे वक्तव्य म्हणजे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे.
"शरद पवार यांनी भाजपला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देण्याची कल्पना ठामपणे नाकारली. आणि हेच शरद पवार यांच्या राजकीय ठामपणाचा पुरावा आहे," असे तपासे म्हणाले.
राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) प्रवक्ते म्हणाले की, शरद पवार यांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि इतर नेत्यांचा भाजपबरोबर जाण्याचा प्रस्ताव नाकारणे हे त्यांच्या निराशेचे कारण आहे.
बुधवारी, एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी असा आरोप केला होता की, महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांचे पुतणे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा शरद पवार भाजपसोबत जाण्यासाठी "50 टक्के" तयार होते.
"2 जुलै 2023 रोजी, अजित पवार आणि आमच्या मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारची शपथ घेतली, त्यानंतर आम्ही 15-16 जुलै रोजी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांना आमच्याबरोबर येण्याची विनंती केली. नंतर अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात भेट झाली. तेव्हा देखील ते आमच्यासोबत येण्यास 50 टक्के तयार होते. शरद पवार नेहमी शेवटच्या क्षणी संकोच करतात,” असे पटेल यांनी एएनआयशी बोलताना म्हणाले होते.
"1996 मध्ये, पवार साहेबांनी एचडी देवेगौडा यांचा सल्ला ऐकला असता तर ते पंतप्रधान होऊ शकले असते. शरद पवार यांनी संकोच केला नसता तर ते 1996 मध्येच पंतप्रधान होऊ शकले असते," असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले होते.
राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी यावेळी आरोप केला की, भ्रष्टाचाराच्या चौकशीची प्रकरणे भाजप सरकारने अलिकडेच बंद केल्याने अजित पवार गटाचे भाजपशी जुळवून घेण्यामागील खरे हेतू उघड होतात. यामध्ये विकासाचा काही संबंध नाही.
तपासे म्हणाले की, अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण त्यांनी शरद पवार यांच्या पाठीत वार करून पक्षाचे नाव आणि 'घड्याळ' चिन्ह मिळवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.