उद्धव ठाकरे यांनी एकट्याच्या बलबुत्यावर आणि विशेषत: दिल्लीतून आलेल्या ‘मोगली फौजां’च्या विरोधात लढून हे यश मिळवलं होतं! काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांना या निवडणुकीत अर्धशतकही गाठता आलं नव्हतं...
महाराष्ट्रात पाच वर्षांपूर्वी झालेली विधानसभेची निवडणूक ही सर्वार्थाने अभूतपूर्व ठरली; कारण या निवडणुकीत प्रथमच भारतीय जनता पक्ष तसंच शिवसेना या दोन उजव्या आणि मुख्यत्चे हिंदुत्ववादी पक्षांनीच जवळपास सारा राजकीय अवकाश व्यापून टाकला! या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष अर्थातच भाजप ठरला आणि दुसरा क्रमांक शिवसेनेनं पटकावला. त्या निवडणुकीच्या आधी सलग १५ वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेस तसंच राष्ट्रवादी या दोन पक्षांची या निवडणुकीत पुरती दाणादाण उडाली आणि त्या पराभवाच्या छायेतून हे दोन पक्ष आता पाच वर्षं झाली तरीही बाहेर येऊ शकलेले नाहीत.
हिंदुत्ववादी तसंच उजव्या विचारांची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात १९९० मध्ये झालेल्या निवडणुकीनं रोवली होती आणि त्या निवडणुकीस अर्थातच १९८७ मध्ये मुंबईच्या विलेपार्ले मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी होती. त्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या विजयामुळेच प्रमोद महाजन यांनी पुढाकार घेऊन, भाजपला शिवसेनेशी हातमिळवणी करण्यास भाग पाडलं आणि त्यांची ती खेळी कमालीची यशस्वी ठरली. मात्र, त्यानंतर ही शिवसेना-भाजप ‘युती’ २०१४ मधील निवडणुकीत तुटली आणि काँग्रेस तसंच राष्ट्रवादी यांची १५ वर्षं टिकलेली आघाडीही दुभंगली! त्यामुळे एका अर्थानं समविचारी पक्षांचीच ही आपापसातील झुंज होती. शिवसेना आणि भाजप या दोन समविचारी पक्षांनी एकमेकांविरोधात लढण्याचा निर्णय घेतल्यावर नेहमीप्रमाणे आता मतविभागणी होईल आणि त्याचा फायदा हा त्याविरुद्ध उभ्या ठाकलेल्या काँग्रेस तसंच राष्ट्रवादी या दोन ‘सेक्युलर’ पक्षांना होईल, ही भाष्यकारांची अटकळ मात्र महाराष्ट्राच्या जनतेनं खोटी ठरवत या दोन पक्षांना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फेकून दिलं. ‘आम्हाला आता हे दोन पक्ष नकोच आहेत!’ असा स्पष्ट निर्वाळा या निवडणुकीनं इतक्या ठामपणे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पाच दशकांनी दिला होता.
भाजपबरोबरची युती तुटणं, हा शिवसेनेला खरं तर जबर धक्का होता. १९८९ मध्ये या ‘युती’नं प्रथम लोकसभेच्या निवडणुका लढवल्या आणि पुढे लगेच १९९० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण ९४ आमदार निवडून आणत, मोठं यश मिळवल्यापासून भाजप महाराष्ट्रात शिवसेनेच्या कलानंच राजकारण करत होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द प्रमाण मानणं भाजपला भाग पडत होतं. मात्र, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या निवडणुकीत लोकसभेत निखळ बहुमत मिळवल्यानंतर भाजपनं कधी काळी गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलेलं ‘शतप्रतिशत भाजप!’चं स्वप्न खरं करून दाखवण्याचा चंग बांधला आणि ‘युती’ तोडली! मात्र, भाजपला लोकसभेसारखं यश विधानसभेत काही मिळवता आलं नाही आणि १२२ जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं. याच निवडणुकीतून देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व खऱ्या अर्थानं पुढे आलं आणि नंतरच्या पाच वर्षांत कारभारात नसलं तरी फोडाफोडीच्या राजकारणात त्यांनी दणदणीत यश मिळवलं! मात्र, खरी कमाल उद्धव ठाकरे तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावान शिवसैनिकांनी केली होती. शिवसेनेनं या निवडणुकीत केवळ भाजपच नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधातही कडवी झुंज दिली आणि तब्बल ६३ जागा जिंकल्या. उद्धव ठाकरे यांनी एकट्याच्या बलबुत्यावर आणि विशेषत: दिल्लीतून आलेल्या ‘मोगली फौजां’च्या विरोधात लढून हे यश मिळवलं होतं! काँग्रेस तसंच राष्ट्रवादी यांना या निवडणुकीत अर्धशतकही गाठता आलं नव्हतं. तर २००९ मध्ये १३ जागा जिंकणारी ‘मनसे’ केवळ एकमेव आणि तोही उसना उमेदवार विजयी करू शकली होती.
या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रथम विरोधी बाकांवर स्थानापन्न झालेली शिवसेना नंतरच्या महिनाभरातच विरोधी पक्षनेतेपदाबरोबर मिळालेल्या लाल गाडीत बसून, थेट सत्ताधारी छावणीत निघून गेली. मात्र, गेले पाच वर्षं आणि विशेषत: चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा अमित शहा यांची गळाभेट घेतल्यानंतरही विरोधी पक्षाचीच भूमिका वर्तवत राहिली! खरं तर शिवसेनेनं सत्ताधारी भाजपला पाठिंबा देत, फडणवीस सरकारला स्थैर्य दिलं नसतं तर आज महाराष्ट्राचं राजकारण नेमक्या कोणत्या दिशेनं गेलं असतं, या प्रश्नाचं उत्तर काळाच्या भागात गडप झालं आहे.
आता महाराष्ट्राच्या जनतेपुढे एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे लोकसभेत झालेली शिवसेना-भाजप युती विधानसभेतही कायम राहील का? की, पुन्हा एकमेकांविरोधात लढून ते सत्ताधारी राजकीय अवकाशाबरोबरच विरोधी अवकाशही व्यापून टाकतील काय? या प्रश्नाचं उत्तर मिळण्यास आता फार वाट बघायला लागणार नाही. आणखी एक प्रश्न म्हणजे काँग्रेस तसंच राष्ट्रवादी आपले आघाडीचे नेते भाजप-शिवसेनेत दाखल झाल्यावर निवडणुकीत कितपत यश मिळवतात? या साऱ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला दिवाळीपर्यंत वाट बघावी लागणार आहे!(समाप्त)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.